गावातल्या कोणाच्याही मृत्यूची बातमी कळताच, आपल्या खास वेशात हे मृताच्या अंत्ययात्रेत सामील होतात. मृताच्या वारसदाराकडून भिक्षा हक्काने मागून घेतात. भिक्षा घेण्याच्या परंपरागत प्रथेमुळे त्यांना भिकारी किंवा मागतकरी असाच सामाजिक दर्जा मिळाला आहे. साधनविहीन, अस्थिर व पोरका असलेला हा समाज विकासाच्या परिघाबाहेर आहे. मसणातलं आयुष्य जगणाऱ्या या मसणजोगी समाजाविषयी..
‘‘तु म्ही आलात तसं गेल्या काई वर्सात लई माणसं येऊन भेटून गेली. शंभराहून जास्त आले असतील. आमचा पोशाख, आमची पालांची वस्ती, आमची बिनकपडय़ाची पोरंटोरं, आमच्या बायाबापडय़ा, त्यांचं बोलणं, याचं श्युटिंग केलं, फोटो काढले. आमच्या इच्छा-गरजा विचारल्या. तुमचं दु:ख सरकारकडं मुंबई-दिल्लीला पाठवू, लोकांत प्रचार करू असं काय काय लई आश्वासनं दिली. परंतु आत्तापत्तोर ‘रिझल्ट’ आमच्यापत्तोर आलाच न्हाई. जाऊ  त्या गावात परवानगी मिळाली तर मसनवाटय़ात, नाहीतर गावाभाहिर दूर मोकळ्या जागेत पाल टाकून तात्पुरतं राहायचं हे बापजाद्यापासून चालू हाय ते आजबी चालूच हाय. काई बदल न्हाई. घरासाठी जागा किंवा घर मिळायचं लांबच राहिलं, पण आमच्या मेलेल्या माणसाच्या मुडद्याला रिवाजाप्रमाणं पुरायला मसनवाटा न्हाई आणि गावाच्या शिवारात जागा मिळत न्हाई. गाववाल्यांशी भांडणं किंवा विरोध करणं आम्हास परवडत न्हाई. त्यामुळं काई मुडद्यांना रिवाजाप्रमाणं पुरण्याऐवजी नाइलाजानं सरकारी स्मशानभूमीत जाळावं लागलं. त्यासाठी मुडदा घेऊन दहा दहा कि.मी. चालावं लागलं. असलं फुटकं नशीब घेऊन आमचं दर कोस दर मुक्काम भटकणं चालूच असतं. तरीही आपण आपलं कर्तव्य करत राहावं म्हणून तुमच्यासारख्या आलेल्या लोकांपुढं आमचं सांगणं-रडणं आम्ही बंद करीत न्हाई.’’ सांगत होत्या मसणजोगी समाजाच्या पारुबाई शामराव कडविंचे, चंद्रकला रामचंद्र शिंदे आणि त्यांच्या इतर नातेवाईक महिला. औरंगाबाद-चिकलठाणा परिसरातील सावित्रीबाई नगरजवळील मसणजोगी जमातीच्या पालवस्तीत आमिनभाई जामगावकर आणि साहेबराव शिंदे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत  आम्ही बोलत होतो.मसणजोगी समाज हा मुळातला आंध्र-तेलंगणातला. तेलगूचा प्रभाव असलेली परंतु तमीळ, उर्दू, हिंदी, कन्नड, मराठी या भाषांतील शब्दांचे मिश्रण असलेली त्यांची एक स्वतंत्र बोलीभाषा बनली आहे. महाराष्ट्रात या जमातीस सुडगाडसिद्ध (मसनवाटय़ातला साधू) किंवा ‘मसणजोगी’ असे म्हणतात. मुळात परंपरेनुसार ही जमात भटक्या प्रवृत्तीची भिक्षेकरी जमात आहे. भुताखेतासारखा दिसणारा वेश धारण करून ते गावात भिक्षा मागायला जातात. जाईल त्या गावात गावप्रमुखाच्या परवानगीने तेथील मसणवाटय़ात पाल ठोकून मुक्काम करायचा. गावातील एका घरापुढे एकदाच भिक्षा मागायची, गाव मोठं असेल तर तीन दिवसापेक्षा जास्त दिवस एका गावात भिक्षा मागायची नाही, एका गावात वर्षांतून एकदाच भिक्षा मागायची, दिवसभरात मिळालेली भिक्षा रात्रीपर्यंत सर्व कुटुंबीयांना पुरून उरली तर तिचा साठा न करता त्याच रात्री गाई-गुरे किंवा इतर प्राण्यांना चारून ताट-वाटय़ा, भांडी स्वच्छ धुऊन उशाखाली पालथी घेऊन झोपायचं असे त्यांचे कांही परंपरागत नियम आहेत. साठेबाजी केली तर पाप लागतं, असा समज आहे. बदलत्या काळात हे नियम शिथिल झाले असले तरी त्यांच्यातली बरीच वयोवृद्ध माणसे आजही हा नियम पाळताना दिसतात. जमातीअंतर्गत दिल्या जाणाऱ्या छोटय़ा कर्जावर दरमहा दोन टक्केपेक्षा जास्त व्याज आकारणे पाप समजले जाते. म्हणून जात पंचायतीतर्फे त्यासही बंदी आहे.

बहुतेक पुरुष साधुमहाराजाप्रमाणे जटा, दाढी, मिशा वाढवितात. अंग भरून भगव्या रंगाचा ‘कलिबट्टा’(झगा), डोक्यावर एक खास प्रकारचा मुकुट जो मोरपिसाने व वनस्पतीच्या हिरव्या काडय़ा-फाटय़ाने सजवलेला आणि त्याला पितळेचे छोटे छोटे लोलक लावलेले, गळ्यात झंकारणाऱ्या घंटय़ांच्या माळेसह रुद्राक्षांची माळ, शिवाय या माळांपेक्षा मोठी असलेली मानवी कवटय़ांची माळ किंवा किमान एका कवटीची माळ, कपाळाला शेंदूर, विभूती व राख, एका हातात शंख आणि दुसऱ्या हातात मोठी नंदी घंटा असा वेश धारण करून ते भिक्षा मागतात. पीठ, ज्वारी, गहू आणि जुने कपडे, रोख पैसे या वस्तूंची ते भिक्षा घेतात. कवटी, नंदीघंटा, शंख या वस्तू पूर्वजांकडून परंपरेनुसार वारसा हक्काने मिळतात. त्यांना जास्त वर्षे टिकविण्याचे तंत्रही वडीलधाऱ्यांकडून मिळते.आजूबाजूच्या गावात झालेल्या कोणाच्याही मृत्यूची बातमी कळताच, आपल्या खास वेशात शंख फुंकीत व नंदीघंटा वाजवीत हे मृताच्या अंत्ययात्रेत सामील होतात. परंपरागत नियमाप्रमाणे मृताच्या वारसदाराकडून किमान दोन आणे (आत्ताचे बारा पैसे) भिक्षा हक्काने मागून घेतात. शिवाय अंत्यविधीस जमलेल्या मृताच्या नातेवाईकांकडून मिळेल ती भिक्षा घेण्याच्या परंपरागत प्रथेमुळे त्यांना भिकारी किंवा मागतकरी असाच सामाजिक दर्जा मिळाला आहे. यांच्या महिला व लहान पोरीबाळी प्रेतावरून उधळलेले पैसे जमा करण्यात गुंग असतात. प्रेत दहन केल्यानंतर ती जागा दुसऱ्या प्रेतासाठी तातडीने मिळणे गरजेचे असेल तर पहिल्याची रक्षा सांभाळून वारसदारांकडे सुपूर्द करण्याचे काम हे विनामोबदला करतात. प्रेतवस्त्र व तिरडीचे बांबू हक्काने घेतात. प्रेतवस्त्र, लहान मुलां-मुलींचे कपडे व काखेच्या झोळ्या इ. शिवण्यासाठी तर बांबू, पाऊस-वाऱ्याने उडून जाणारी पालं-झोपडय़ा मजबूत करण्यासाठी व गरजेप्रमाणे सरपणासाठीही वापरले जातात. प्रौढ व वयस्कर महिला हातात परडी व परडीत देवीची मूर्ती ठेवून घरोघर जाऊन भिक्षा मागतात. यांना पीठ, मीठ व क्वचित पैसे मिळतात. शिवाय शिंदींच्या फरक्यापासून चटया बनविण्याचे कामही या महिला करतात. हे पूर्वी अस्पृश्यांचेही पुजारपण करायचे आणि आजही त्यांच्याकडून दान/भिक्षा स्वीकारतात. त्यामुळे ते केवळ अस्पृश्य नव्हे, तर अस्पृश्यापेक्षाही खालच्या दर्जाचे समजले जातात.

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Solapur, Son-in-law cuts mother-in-law finger,
सोलापूर : शिळे जेवण दिल्याच्या कारणावरून जावयाने वृद्ध सासूचे बोट छाटले
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल

यांच्यात उपासतापास, व्रतवैकल्ये करण्याची प्रथा नाही. हा आजही मांसाहारी समाज आहे. मांस वाळवून साठवायचे आणि रोजच्या स्वयंपाकात वापरून खायचे अशी त्यांची सवय आहे. जमातीतील पूर्वज ‘रामाबाबा’ यालाच सर्व जण मूळ पुरुष समजतात. संपूर्ण जमातीचे ते श्रद्धास्थान आहे. यांनी चिलारीच्या झाडाच्या बुंध्याशी दगडाला शेंदूर फासून रामबाबांची स्थापना केली आहे त्यालाच ते मंदिर म्हणतात. भटकंती करताना कसलीही अडचण येऊ  नये म्हणून बाहेर पडताना अगरबत्ती, साखर, एक नारळ आणि दारूचा नैवेद्य देण्याची प्रथा आजही पाळली जाते. नवसाप्रमाणे रामाबाबाला दारूबरोबरच कोंबडे किंवा बकरेही कापण्यात येते.
अन्नाची गरज भागविण्यासाठी ते पूर्वी शिकार करायचे. सरडे, खारी, घोरपडी व इतर सरपटणारे प्राणी, रानमांजर, सायाळ, कोल्हे आदी प्राण्यांची व रानातल्या पक्ष्यांची शिकार करणे हे त्यांच्या आवडीचे व नेहमीचे काम असायचे. वरचेवर जंगले व जंगलाचे क्षेत्र कमी होत गेले. शिवाय शिकारबंदीचे नवनवीन कायदे आले. भिक्षाप्रतिबंधक कायदा पण आला. स्वराज्यात या कायद्यांमुळे त्यांची जगण्याची परंपरागत साधने हिरावून घेतली गेली. त्यांना सन्मानाने जगण्याचा पर्याय देण्याचा प्रयत्न झाला नाही. त्यांची कटी पतंगासारखी अवस्था झाली व त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष चालू झाला.
स्मशानभूमीत ज्या कुटुंबाला राहायला जागा व काम मिळते, त्यास थोडासा तरी आधार मिळतो. संपूर्ण औरंगाबाद शहरात असा आधार मिळालेली सुमारे ४० कुटुंबे आहेत. ज्यांना असा आधार नाही, उघडय़ावर आहेत अशी हजारो कुटुंबे आहेत. चिखलठाणा, औरंगाबाद येथे यांची सुमारे ५० निराधार कुटुंबे गेल्या ३० वर्षांपासून दुसऱ्यांच्या जागेवर पालात राहतात. घर किंवा घरासाठी जागा मिळावी ही मागणी घेऊन अनेक अर्ज-विनंत्या केल्या, मोर्चे काढले. उपयोग झालेला नाही. वस्तीत वीज, रस्ते, गटारी, पाणी या मूलभूत सुविधांची सोय नाही. भोवतीच्या पक्क्या घरांच्या वस्तीत पाणी मागायला गेल्यावर एक किंवा दोन हंडे पाणी देतात. आंघोळीला, कपडे धुवायला पाणी हवे असेल तर २०० लिटरचा एक ड्रम रुपये पन्नासला विकत घ्यावा लागतो. महिन्याला एका कुटुंबाला किमान ६ ड्रम पाण्यासाठी ३०० रुपये खर्च येतो.
बीड जिल्ह्य़ात शिरुर कासार येथे भिक्षा मागण्याचा परंपरागत व्यवसाय सोडून भंगार गोळा करण्याचा कष्टाचा व्यवसाय करणारी ५० कुटुंबांची पालवस्ती गेल्या २५ वर्षांपासून आहे. कसलीच मूलभूत सुविधा नाही. तिथेही रोज पाणी विकत घ्यावे लागत असे. शहरातील राम कांबळे यांनी गेल्या महिन्यात स्वखर्चाने विंधन विहीर खोदून संपूर्ण वस्तीला मोफत पाणीपुरवठा सुरू केला तेव्हा कुठे त्यांची पाण्यासाठीची वणवण थांबली. सिल्लोड येथील अनुभव वेगळाच आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीतले मसनजोगी समाजाचे पराभूत उमेदवार साहेबराव शिंदे यांच्या माहितीप्रमाणे ५० वर्षांपासून तिथे पालात-झोपडीत राहणारी या भटक्यांची सहाशेपेक्षा जास्त कुटुंबे आहेत. १९८१-८२ मध्ये त्यांच्यापैकी २४ जणांना घरकुले मिळाली. बाकीच्यांना पण टप्प्याटप्प्याने घरकुले मिळतील ही आशा आजपर्यंत सफल झालेली नाही. मात्र येथील बहुतांशी लोकांना मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड मिळालेली आहेत. सिल्लोडची ओळखपत्रे असली तरी यांना उपजीविकेसाठी गावोगावी भटकावे लागतेच. त्यामुळे त्यांची ‘ना घर का, ना घाट का’ अशी अवस्था झाली आहे.
परिस्थितीच्या रेटय़ामुळे यांचे व्यवसाय परिवर्तन होत आहे. परंतु मार्गदर्शन, प्रशिक्षण व साधनांचा अभाव असल्याने कमजोर परिवर्तन होत आहे. बँकांकडून यांना कर्ज मिळत नाही. महिला पिना, सुया, कंगवे, फण्या आदी मालाची दहा किलो वजनाची डाल डोक्यावर घेऊन दिवसभर फिरतात. सकाळी सात वाजता घराबाहेर पडावं लागतं. रात्री एकदाच चूल पेटते. रात्री खाऊन उरलेलं सकाळी लेकरं खातात. चंद्रकला शिंदे म्हणाल्या की, रोज २० कि.मी.पेक्षा जास्त चालणं होतं. पाठ, पाय खूप दुखतात. साऱ्या महिला रोज वेदनाशामक गोळ्या बरोबर घेऊनच बाहेर पडतात. गोळी नसेल तर काहीजणी आजारीच पडतात. पुष्कळसे पुरुष गावोगाव फिरून ‘बुढ्ढी के बाल’ विकून कुटुंब पोसण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा माल वेळेवर विकला गेला पाहिजे नाही तर पाणी होऊन खराब होतो व नुकसान होते. काहींजण ‘बुढ्ढी के बाल’च्या मोबदल्यात भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करतात. असा दिवसभराचा खर्च वजा करता पती-पत्नी दोघांचे मिळून रोजचे उत्पन्न दोनशे रुपयांच्या वर जात नाही. नाइलाजाने लहान मुला-मुलींनाही खायला मागायला जावे लागते.
रानकुळ, डोंगरकुळ, भोईकुळ, महादेवकुळ अशी यांच्या कुळांची नावे आहेत. एका आडनावाच्या मुला-मुलीचे लग्न होत नाही. पूर्वी पाळण्यातच लग्ने लावली जात असत. परंतु आता मुलगी १३/१४ वर्षांची झाली की लग्न लावतात. लग्नात हुंडा पद्धत नाही. लग्नाची परंपरागत पद्धत फार साधी व सोपी आहे. नातेवाईक व पंचांच्या साक्षीने नवरा-नवरीने एकमेकांच्या हातात धागा बांधायचा व एकमेकाला कुंकू लावायचे. झाले लग्न. उपस्थित सारे आशीर्वाद देतात. परंपरागत रूढीप्रमाणे लग्नात नवा कपडा हा अधर्म मानला जातो. प्रेतवस्त्र आणि भिक्षा मागून आणलेले कपडे नेसवून लग्न लावले जाते. लग्नानंतर तीन वर्षे नवरदेवाने मुलीच्या कुटुंबासोबत राहण्याची प्रथा आहे. पुरुषाचा पुनर्विवाह होऊ  शकतो. महिलेचाही होऊ  शकतो, पण त्याला ‘गंधुरं’ म्हणतात. महिलांची बाळंतपणे ही साधारणपणे पालातच जमातीतल्या अनुभवी महिलेद्वारे केली जातात.
साधनविहीन, अस्थिर व पोरका असलेल्या या समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात सुमारे ४० हजार असावी. हा समाज विकासाच्या परिघाबाहेर आहे. स्पर्धात्मक परीक्षा पास होऊन स्थापत्य अभियंता म्हणून शासकीय सेवेत नुकताच रुजू झालेला एकमेव तुळजापूरचा तरुण संजय विभुते, नांदेडची नुकतीच एम.बी.बी.एस. झालेली जमातीतील पहिली एकमेव डॉक्टर कल्पना मारुती कोळी, यंदाच्या मॅट्रिकच्या परीक्षेत ९१ टक्के गुण मिळवणारी बीडची एकमेव पूजा घनसरवाड, जमातीतल्या लहान मुला-मुलीसाठी स्वकष्टाने व जिद्दीने शाळा चालविणारा उमरग्याचा एकमेव दुसरा संजय विभुते, पोरक्या युवक-युवतींना जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी वाहून घेतलेला सोलापूरचा समाज कार्यकर्ता मल्लेश सूर्यवंशी ही सारी युवक मंडळी पालात जन्मलेली, मसणवाटय़ात वाढलेली असली तरी जिद्द, सचोटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर साऱ्या समाजाला दिशा दाखविणारे काही दीपस्तंभ निर्माण झाले, ही ६७ वर्षांच्या लोकशाहीची मोठी देणगी आहे.  ल्ल अ‍ॅड. पल्लवी रेणके pallavi.renke@gmail.com