स्त्रिया, मुलींना ब्लॅकमेल करून त्यांचे शोषण करणाऱ्या, जळगाव वासनाकांडाची पुनरावृत्ती इतर अनेक ठिकाणी सुरू असल्याचे १९९३ नंतर समोर आले. तर दुसरीकडे एकतर्फी प्रेमातून तरुण मुली बळी पडू लागल्या. त्याविरोधात स्त्री संघटनांनी आंदोलने छेडली, मोर्चे काढले, उपोषणाचे हत्यार उपसले, विचारमंथनाची एक निरंतर प्रक्रिया सुरू झाली, पण अनेकींना न्याय मिळालाच नाही.
नव्वदच्या दशकात दोन बातम्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हादरा दिला. महाराष्ट्रासारख्या स्वत:ला पुरोगामी समजणाऱ्या राज्याच्या लौकिकाला काळिमा फासणाऱ्या या घटना- जळगाव आणि मालेगाव वासनाकांड आणि एकतर्फी प्रेमातून तरुण मुलींची हत्या. ही कृत्ये क्रूर, निर्घृण आणि अमानवी होती. त्यात कित्येक स्त्रियांचा शारीरिक आणि मानसिक बळी दिला गेला होता.
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील एका आरोपीच्या चौकशीतून जळगाव वासनाकांडाचा शोध लागला. अंदाजे तीनशे ते पाचशे स्त्रिया, तरुणी, मुली, यांच्यावर सुमारे दहाएक वर्षे अत्याचार चालू होते, पण आपलीच नाचक्की होईल, अब्रू जाईल या भीतीने या सगळय़ाजणी गप्प बसल्या. वाच्यता केली तर जिवे मारण्याच्या धमक्या त्यांना होत्याच, शिवाय या प्रकरणात अनेक धनदांडगे, सुशिक्षित, प्रतिष्ठित नागरिकही गुंतलेले होते, त्यामुळे हे प्रकरण दाबून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला.
या प्रकरणात मुलींना आमिष दाखवून हॉटेलात नेले जायचे. कधी त्यांना गुपचूप गुंगीची औषधे दिली जायची, नंतर त्यांच्यावर बलात्कार केला जायचा. त्यांच्या नकळत त्याचा व्हिडीओ काढला जायचा. ते चित्रण दाखवून त्यांना ब्लॅकमेल करत लैंगिक छळ चालू व्हायचा. या मुलींमार्फत नवनवीन मुली या जाळय़ात ओढल्या जायच्या. या ब्लू फिल्मस्मधून आरोपींना हजारो रुपयांची कमाई व्हायची. बळी पडलेल्या काही स्त्रियांनी आत्महत्या केली तर तीन मुलींना तोंडे बंद ठेवण्यासाठी ठार मारण्यात आले.
स्त्री संस्थांनी या घटनेच्या विरोधात महाराष्ट्रभर प्रचंड निदर्शने केली. जळगावपाठोपाठ भुसावळ, मालेगाव, सावंतवाडी आदी अनेक ठिकाणी अशी प्रकरणे चालू असल्याचे उघड झाले. या प्रकरणातील गुन्हेगारांना जामिनावर सोडू नये, तसेच सर्व साक्षीदार व कुटुंबीयांना शासकीय संरक्षण मिळावे, खास न्यायालयात ‘इन कॅमेरा’ खटले चालवावेत, अत्याचारात बळी पडलेल्या स्त्रियांचे पुनर्वसन शासनाने करावे आणि गुन्हेगारांना कडक शासन करावे अशा मागण्यांसाठी ‘महिला दक्षता समिती’तर्फे कोल्हापुरातील बिंदू चौकात २० ऑगस्ट १९९४ रोजी धरणे आंदोलन आयोजित केले गेले. या आणि अन्य काही प्रश्नांची विविध बाजूने चर्चा करण्यासाठी एका जिल्हाव्यापी परिषदेचे आयोजन करण्यात आले, त्यात अहिल्या रांगणेकर, प्रमिला दंडवते, मृणाल गोरे, किरण मोघे इत्यादी नेत्यांनी मार्गदर्शन केले. जळगावात स्त्रियांचे मोर्चे, सभा सुरू झाल्या. धुळय़ाहून स्त्रियांचा मोर्चा आला, नागपूरहून सीमा साखरे आणि सहकारी आल्या. मुख्य आरोपी पंडित सपकाळे फरार होता, त्याला पकडल्याशिवाय आत्याचारग्रस्त मुली बाहेर येऊ शकत नव्हत्या. पाच-सहा स्थानिक कार्यकर्त्यांबरोबर सीमाताईही उपोषणाला बसल्या. हजारो लोक मंडपाबाहेर जमू लागले. सभा, भाषणे, घोषणा, नारे देण्यात सर्व पक्षांचे लोक, माध्यमांचे प्रतिनिधी होते. एक मोठे जन आंदोलनच तिथे झाले.
विद्या बाळ यांनी या प्रकरणी ‘नारी समता मंचा’तर्फे अनेकदा जळगावचे दौरे केले. असंख्य पालक, विद्यार्थिनी, श्रोते यांच्यापुढे त्यांनी प्रश्न उपस्थित केले की, जळगावमधल्या मुलींबाबात जे घडलं ते आपल्या मुलींबाबत घडलं तर आपण कसे वागू? आपण तिला आधार देऊ का टाकून देऊ? बलात्कारानं स्त्री दुखावते, पण भ्रष्ट होत नाही हे आपण मानणार की नाही? योनिशुचितेचा आग्रह धरणाऱ्या पुरुषप्रधान व्यवस्थेला आपण प्रतिप्रश्न करणार की नाही? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा होता. कारण लैंगिक अत्याचार बाईवर होतात आणि त्यात बाईलाच बदनाम केलं जातं, अत्याचार करणारे नराधम मात्र मोकाट उजळ माथ्याने जगू शकतात.
अन्यायग्रस्त तरुणींशी बोलून अनेक स्त्री कार्यकर्त्यांनी त्यांना धीर दिला. त्यांची हिंमत वाढवली. शासनाने तपासासाठी अरविंद इनामदार, दीपक जोग व मीरा बोरवणकर यांना जळगावला पाठवले. सेशन जज मृदुला भाटकर यांच्यासमोर पुण्याला केस चालली. न्यायालयात १३ पैकी फक्त ४ केसेस चालल्या. मुलींच्या बदनामीच्या भीतीने काही पालक पुढे आले नाहीत. ‘महिला संघटनांनी आम्हाला तक्रारी करायला लावल्या’ असाही आरोप काहींनी केला. परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपीला १८ वर्षांची सजा मिळाली, पण कायद्याच्या चाकोरीत त्या सिद्ध करता आल्या नाहीत, ही स्त्रीच्या आत्मसन्मानाची शोकांतिका.
३१ मार्च १९९०. उल्हासनगरचा वर्ग. भूमितीचा पेपर चालू असताना हातात चाकू, सुऱ्या घेऊन काही तरुण मुले वर्गात घुसली, त्यांनी धमकावून सगळय़ांना वर्गाबाहेर काढले आणि अंगावर पेट्रोल ओतून रिंकू पाटीलला पेटवून दिले. तिची बहीण आणि इतर विद्यार्थी मदतीसाठी ओरडत होते, पण सर्वजण पळून गेले. दुसऱ्या दिवशी रेल्वे ट्रकवर आरोपीने आत्महत्या केली.
१८ वर्षांच्या अमृता देशपांडेला सांगलीला भर बाजारात सर्वासमक्ष भोसकून मारण्यात आले. लोकांनी पटापट दारे व दुकाने लावून घेतली.
पुण्याची महाविद्यालयीन विद्याíथनी नीता हेंद्रे हिला स्वारगेटजवळ प्रथम तिचा गळा आवळून, मग तिचा गळा चिरून अत्यंत क्रूर व अमानुष पद्धतीने ठार मारण्यात आले.
फग्र्युसन कॉलेजच्या आवारात जान्हवी तुपेवर प्रसन्न पंडित या मुलाने गोळय़ा झाडून हत्या केली व नंतर स्वत:ही आत्महत्या केली. बत्तीस शिराळय़ाची आरती जोशी, कागलची मानसी शहा, जळगावची सारिका मुनोत, मनमाडची शोभा तांदळे अशा कितीतरी कोवळय़ा तरुण मुली नव्वदीच्या दशकात एकतर्फी प्रेमाच्या शिकार झाल्या.
नकार देणं म्हणजे हिंसेला निमंत्रण आणि नकार न देणं म्हणजे हिंसक नातं चालू ठेवणं अशा कात्रीत अनेक मुली सापडल्या. या घटनांचे पडसाद  सर्व महाराष्ट्रभर उमटले आणि चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये खूपच अस्वस्थता निर्माण झाली. अनेकींनी आपापल्या गावात विचारमंथनाचे कार्यक्रम आयोजित केले. पुण्यात एक मोठी सभा झाली, त्यात तरुण हिंसाचाराला का प्रवृत्त होतात? प्रेमाविषयी, पुरुषार्थाविषयी त्यांच्या काय कल्पना असतात? वगैरे विषयावर तज्ज्ञांनी ऊहापोह केला. २ ऑक्टोबर १९९९ मध्ये मोर्चा काढण्यात आला आणि जाहीर सभेत त्याचा शेवट झाला. आपल्या भोगलालसेपायी निष्पाप तरुणींचा बिनदिक्कतपणे खून करणारे तरुण याबद्दल उदासीन, बेपर्वा असणारा समाज आणि सामान्य माणसाच्या मनातील भय याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. या बाबतीत शासनाची, पोलीस यंत्रणेची, न्याय व्यवस्थेची जी काही जबाबदारी असेल त्याला जाब जरूर विचारा, पण आपण सर्वजण हे मुकाटय़ाने पाहात राहणार का, असे आवाहन समाजवादी महिला सभा, नारी समता मंच, म. फुले समता प्रतिष्ठान, साद युक्ती मंच, श्रमिका महिला मोर्चा यांच्याबरोबर अनेक संघटनांनी एकत्र येऊन केले.
नारी समता मंचच्या ‘सख्य’ या हिंसाविरोधी प्रकल्पाच्या प्रमुख पुष्पा रोडे यांनी आणि साद युवती मंचाने ठिकठिकाणी महाविद्यालयीन युवक-युवतींशी या संदर्भात संवाद साधला. नकार पचवायलाही ताकद लागते असा संदेश सर्वत्र पोचवला गेला. आमिर खान यांच्या उपस्थितीत ‘दोस्ती झिंदाबाद’ हा प्रचंड मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात हिंसाचार स्वत: न करण्याची व होणारा हिंसाचार थांबवण्याची शपथ सर्वानी घेतली.
हिंसाचाराच्या अशा प्रेमाच्या जबरदस्तीतून आलेल्या घटना पूर्णपणे बंद झाल्या आहेत असे नाही तर अजूनही तुरळकपणे चालू आहेत. पण त्या मानाने आता मुला-मुलींच्या मैत्रीचे वातावरण खूपच मोकळे झाले आहे.
डॉ. अश्विनी धोंगडे -ashwinid2012@gmail.com

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!