जगात कुठेही जा, आजच्या माणसाचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्याची सेल्फीमग्नता. सेल्फी काढून, तो सोशल नेटवर्किंग साइट्सवर टाकून पुरेसे लाइक्स मिळवल्याशिवाय त्याला अर्थपूर्ण वाटतच नाही जणू. हा सगळा काय प्रकार आहे? सेल्फीचं हे वेड नवं म्हणायचं की माणसाच्या मूलभूत स्वप्रेमाचा, आत्ममग्नतेचा तो टेक्नोविष्कार आहे? सेल्फीमग्न समाजाचं पोट्र्रेट टिपण्याचा एक प्रयत्न-

एकदा स्टेजजवळ, एकदा सभागृहाच्या बाहेर लॉनमध्ये, मध्येच कधी तरी पायऱ्यांजवळ तर काही वेळा एखाद्या खिडकीजवळ अशा त्या दोघी इकडून तिकडे बागडत होत्या. हे सभागृह होतं लग्नाचं. लग्न सोहळ्याच्या उत्साही वातावरणात सगळे रमले होते. कशी आहेस, हा काय करतो सध्या, तो काय म्हणतो या टिपिकल गप्पा रंगल्या होत्या. काहींचा घोळका ग्रुप फोटो काढण्याच्या नादात होता. तर काही आजीआजोबा कौतुकाने सगळ्यांची विचारपूस करत होते. या सगळ्यापासून त्या दोघी मात्र दूर होत्या. एकमेकींचे फोटो आणि विशेषत: सेल्फी काढण्यासाठी सुयोग्य लोकेशन, लाइट्स, बॅकग्राऊण्ड या सगळ्याच्या शोधात फिरत त्या स्टेजपासून अगदी सभागृहच्या लॉनमध्ये जाऊन पोहोचल्या होत्या. मग त्यांच्या सेल्फीचंही जरा निरीक्षण केलं. ओठांचा चंबू करत त्यांनी एकाच ठिकाणी पाच मिनिटांत किमान १५ ते १७ सेल्फी काढले असतील. आता ठिकाण बदललं. लग्न समारंभ असल्यामुळे खिडक्यांचीही सजावट केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांचा मोर्चा तिथे वळवला. तिथे डोळे बारीक करून, एक भुवई उंचावून पुन्हा तसंच. पाच मिनिटांत दहा सेल्फी! यावर समाधान होत नाही म्हणून दोघींनी आपापले फोन काढले आणि लागल्या ‘क्लिक क्लिक’ करायला.

लग्न सोहळा, नातेवाईक वगैरे सोडून या मुली सेल्फीच्या आनंदात रममाण झाल्या होत्या. याचा राग किंवा वाईट वगैरे अजिबात वाटत नाही. उलट एक विचार डोक्यात घर करून बसला. माणूस स्वत:वर किती प्रेम करतो असतो ना. बरं, हे स्वत:च्या प्रेमात असणं वगैरे आताचं नवं काहीच नाही, हे लक्षात आलं होतं. सेल्फीमुळे, ‘काय ते सारखं मोबाइलमध्ये डोकं खुपसायचं आणि इकडून तिकडून फोटो काढायचे,’ असं तरुण पिढीला ऐकायला मिळत असेल. पण, सेल्फी काढून तो न्याहाळत बसणं ही प्रक्रिया नवीन आणि आधुनिक असली तरी त्याचं मूळ हे पूर्वीच्या काळात दडलेलं आहे. लग्न सोहळ्यातल्या त्या दोघींमुळे विचारांचं चक्र डोक्यात सुरू झालं. त्यानिमित्ताने मानवी भावना, स्वभाव, प्रतिसाद देण्याची त्यांची पद्धत, त्यांचे विचार यांचा आढावा घ्यावासा वाटला. यासाठी इतिहासात डोकावल्याशिवाय पर्याय नव्हता.

स्वत:ची प्रतिमा न्याहाळणे हा मानवी स्वभाव. प्रत्येकालाच वाटतं आपण सुंदर दिसावं आणि इतरांनी आपलं सौंदर्य बघावं. आणि असं का वाटू नये? हासुद्धा मानवी स्वभावाचाच एक पैलू. माणसाच्या या स्वभावाची ओळख आता झालेली नसून फार पूर्वी झाली आहे. माणसाचं स्वत:वरचं असलेलं प्रेम हे त्याच्या तासनतास आरशात न्याहाळण्यातून प्रकर्षांने दिसून येतं. आता तर सेल्फीमुळे ते आणखी अधोरेखित होऊ  लागलंय. स्वत:च्या प्रतिमेच्या प्रेमात असण्याचा स्वभाव पूर्वीपासूनचा आहे. स्वत:ची प्रतिमा बघण्याचे विविध टप्पे मानवी आयुष्यात येऊन गेले आणि त्याच्या मानसिकतेत आणि विचारांमध्ये बदल होऊ  लागले. सेल्फीमुळे माणूस स्वत:च्या किती प्रेमात आहे हे अगदी सहज बोललं जातं पण त्याच्या या प्रेमात असण्याला इतिहास आहे. ते आता अलीकडे सुरू झालेलं नाही. सेल्फीच्याही आधी स्वत:ची प्रतिमा बघता येतील अशा टप्प्यांचा विचार करताना थोडं आधीच्या काळात जायला हवं. आरसा, पाण्यात दिसणारं प्रतिबिंब, चित्र, शिल्पकृती आणि आता सेल्फी अशा विविध टप्प्यातून माणसाने स्वत:च्या प्रतिमेचं दर्शन घेतलेलं आहे.

आरशावरून हिंदी, मराठी गाणी सांगा असं म्हटलं तर अशा गाण्यांची एक यादी लगेच डोक्यात तयार होईल. ‘आईना’या सिनेमातलं ‘आईना है मेरा चेहरा’ हे आणि ‘बन्या बापू’ या जुन्या मराठी सिनेमातलं ‘मी कशाला आरशात पाहू गं’ ही गाणी तर अगदी ओठांवर असतात. याशिवाय ‘ओळख पहिली गाली हसते; सांग दर्पणा कशी मी दिसते’, ‘पुन्हा पुन्हा का पाहशील तू आरशात मुखडा, तुझे तुला प्रतिबिंब सांगते तू माणूस वेडा’, ‘आईने के सौ टुकडे कर के हमने देखा’, ‘शिशा हो या दिल हो’ अशी या गाण्यांची यादी वाढतच जाईल. आपण कसे दिसतो या कुतूहल आणि गरजेपोटी आरसा निर्माण झाला. त्याचा वापरही पुढे मोठय़ा प्रमाणावर झाला. आता तर विविध सार्वजनिक ठिकाणीही आरशाने स्वत:चं अस्तित्व प्रस्थापित केलंय. दुकानांमध्ये विकत घेतलेले कपडे आपल्याला चांगले दिसत आहेत की नाहीत यासाठी ते तिथल्या तिथे घालून आरशात बघून त्याचा निर्णय घेता येतो. हे एक प्रातिनिधिक उदाहरण. त्यामुळे आरसा हा माणसासाठी महत्त्वाचाच ठरतो. स्वत:ची प्रतिमा बघण्याचं आणखी एक साधन आरशानंतर अस्तित्वात आलं. ते म्हणजे शिल्पकृती. मृत लोकांच्या प्रतिमा आठवण म्हणून घरात ठेवाव्यात अशी परंपरा पूर्वी होती. त्यामुळे मृत व्यक्तीचा मुखवटा तयार करून घेणे ही गरज त्या परंपरेतूनच निर्माण झाली. आता आपण मृत व्यक्तींचे जसे फोटो घरात लावतो तसेच त्याकाळी मृत लोकांचे मुखवटे ठेवले जायचे. यातून व्यक्तीच्या प्रतिमेच्या सादरीकरणाचं आणखी एक माध्यम खुलं झालं. पूर्वीच्या काळाचे राजे, राजकीय नेते समाजात आपली प्रतिमा प्रस्थापित करण्यासाठी पोटर्र्ेट म्हणजे स्वत:चं चित्र काढून घेऊ  लागले. तेव्हापासून पोटर्र्ेट म्हणजे व्यक्तिचित्र या कलेचाही विकास झाला.

स्वत:च्या प्रतिबिंबात मशगूल होणं किंवा प्रेमात पडणं हा मानवी मानसिकतेचा भाग आहे. व्यक्तिचित्र ही कला पाश्चात्य देशांमध्ये जास्त दिसून येते. या कलेच्या सुरुवातीच्या काळात स्तुतीपर चित्र काढलं जायचं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं कौतुक, स्तुत्य कामगिरी याचा आनंद म्हणून चित्र काढलं जायचं. कालांतराने व्यक्तिस्वातंत्र्य आल्यानंतर एखाद्या व्यक्तीची आठवण म्हणून व्यक्तिचित्र काढण्याचं प्रमाण वाढलं. आधुनिक काळात कलाकारांनी स्वत:चीसुद्धा व्यक्तिचित्रं काढली आहेत. व्हॅन गॉग या चित्रकाराने स्वत:ची अवस्था व्यक्त करण्यासाठी स्वत:चीच व्यक्तिचित्रं काढली. त्याआधी रँब्रॉ या डच चित्रकाराने बऱ्याचदा स्वत:ची व्यक्तिचित्रं काढली. त्याने त्याच्या व्यक्तिचित्रांमध्ये विविध प्रयोगही केले आहेत. स्वत:चा चेहरा त्याने मॉडेल म्हणून वापरला. वेगवेगळ्या भावनांचं चित्रण करण्यासाठी आणि वेगवेगळ्या पोशाखांमध्ये व्यक्तिमत्त्वं कशी दिसतात याचा अभ्यास करण्यासाठी त्याने अनेक व्यक्तिचित्रं काढली.

व्यक्तिचित्र काढताना तीन महत्त्वाचे प्रकार येतात. एक; स्वत:चाच वापर विशिष्ट अभ्यासासाठी करणं. दुसरं; समाजाच्या अवस्थेचा स्वत:कडे एक प्रतिनिधी म्हणून बघत वापर करणं. आणि तिसरं; अभिव्यक्ती म्हणून खऱ्या अर्थाने विचार करणं. म्हणजे स्वत:पेक्षा इतर प्रतिमांचाही वापर करणं. आतापर्यंत या सर्व प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रक्रिया खूप वेळखाऊ  होत्या. आता प्रत्येकाच्या हातात मोबाइल आणि आधुनिक तंत्रज्ञान असल्यामुळे कमी वेळात स्वत:ची किंवा इतरांची प्रतिमा टिपली जाते. या टिपण्याला आजच्या जगात फार महत्त्व येऊ  लागलंय. पुर्वीच्या काळी राजे, महाराजे, राजकीय नेते, संस्थानिक स्वत:ची प्रतिमा प्रस्थापित करण्यासाठी व्यक्तिचित्रांचा वापर करीत. ही चित्रं काढून देण्यासाठी तत्कालीन चित्रकारांनाही भरपूर पैसा मिळे. म्हणून त्यावेळी सामान्य माणसांची व्यक्तिचित्रं फारशी दिसली नाहीत. नंतर मधल्या कालखंडात चित्रकार व्यक्तिचित्र काढण्यासाठी सामान्य लोकांकडेही वळू लागले. तसंच भारतात प्राचीन काळी पोट्र्रेटची संकल्पनाच नव्हती. कारण आपल्याकडे ईश्वरामध्ये एकरूप होण्याची संकल्पना मानत असल्यामुळे व्यक्तीच्या दिसण्याला फारसं महत्त्व नाही. त्यामुळे आपल्याकडे पोट्र्रेट नाही. पण परदेशात ही संकल्पना आहे. तिथे व्यक्तिस्वातंत्र्य आल्यानंतर प्रत्येक माणूस स्वत:ला उच्चतम स्थानावर असल्याचं समजून स्वत:चं पोटर्र्ेट करून घेण्याचा विचार करू लागली. त्यामुळे मुबलक पैसे असणारे सामान्य लोक पोट्र्रेट करून घेऊ  लागले.

परवा तर ट्रेनमध्ये एक किस्साच झाला. एका बाईला जिथे उतरायचं होतं ते स्टेशन यायला दहा मिनिटं होती. त्यामुळे तिने तिचा अवतार ठीक करण्यासाठी पर्समधून कंगवा काढून केस सारखे केले. हे करण्यासाठी तिला आरशाची गरज भासली नाही. पण पुढे प्रश्न होता चेहऱ्याचा. आता आरसा हवाच. पर्समध्ये या कप्प्यातून त्या कप्प्यात ती आरसा शोधू लागली. या सगळ्यात तिच्या पर्सचं काय झालं असेल हा विचारही नको! यात तिची तीनेक मिनिटं गेली. अजून पावडर, काजळ, लिपस्टिक, टिकली हे राहिलं होतं. आरशाशिवाय हे सगळं कसं करणार असा प्रश्न तिच्या डोळ्यात दिसत होता. पण, तिच्या समोर बसलेल्या एका तरुणीने तो चटदिशी सोडवला. म्हणाली, ‘अहो काकू, कॅमेऱ्यातला सेल्फी मोड ऑन करा ना’. ती बाई तिच्याकडे बघतच राहिली. भानावर येऊन तेच केलं. तिचं काम झालं. स्टेशन आलं आणि ती उतरली. स्वत:चं प्रतिबिंब दिसू शकत नव्हतं म्हणून ती बाई किती बेचैन झाली होती. आपण चांगले किमान नीटनेटके दिसतोय की नाही याची खात्री तिला पटत नव्हती तोवर तिच्या कपाळावरच्या आठय़ा काही कमी झाल्या नव्हत्या. स्वत:च्या चेहऱ्यावरचं प्रेम, काळजी या मानवी भावना पूर्वीपासूनच्या तशाच आहेत.

सेल्फीचा ट्रेण्ड अतिशय वेगाने सर्वत्र पसरला. लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांनाच सेल्फीबद्दलची माहिती आहे. कुठे जाताय, काय करताय, कोणाला भेटताय हे सगळं सेल्फीच्या माध्यमातून इतरांना समजत असतं. कोणत्याही नवीन गोष्टीला लगेच स्वीकारणं हे मानवी स्वभावात नाही. ती नवीन गोष्ट थोडी रुजावी लागते. माणसाच्या आयुष्यातलं तिचं महत्त्व त्या त्या व्यक्तीला जाणवावं लागतं. मगच ती व्यक्ती हळूहळू नव्या गोष्टीला स्वीकारते. सेल्फीचं तसंच झालंय. सेल्फी हा प्रकार सुरुवातीला अनेकांना माहीतही नव्हता. आपल्याच कॅमेऱ्याने स्वत:चाच फोटो काढायचा, तेही स्वत:ला बघूनच, हे पचणं जरा अवघडच होतं. तरी नंतर सेल्फीचं वेड अनेकांना लागलं. एखाद्यासोबत कोणीही नसतानाही त्याला विशिष्ट फोटो काढायचा असेल तर त्यासाठी सेल्फीमुळे पर्याय उपलब्ध झालेला होता. प्रत्येक क्षणाचं डॉक्युमेण्टेशन करण्याची संधी या सेल्फीने दिली होती. आणि ही संधी मोबाइलमध्ये असलेल्या आधुनिक तंत्रज्ञान आणि कॅमेरा यांच्यामुळे होती. त्यामुळे सेल्फी हा आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे हे अनेकांना पटू लागलं आणि त्यांनी ते तंत्र स्वीकारलंही.

फोटोग्राफीची निर्मिती झाली तेव्हा ते तंत्र सगळ्यांना उपलब्ध झालं नव्हतं. आता मोबाइलमध्ये कॅमेरा असल्यामुळे ते तंत्रज्ञान सगळ्यांना उपलब्ध झालं आहे. त्यामुळे आता सगळेच फोटो काढतात. सध्याची ती समाजातील एक वृत्ती बनत चालली आहे. सेल्फी ही प्रथा असल्यासारखं सगळ्यांच्या मनात त्याचं महत्त्व वाढू लागलंय. आपली जीवनपद्धती कशी आहे हे दुसऱ्यांना दाखवणं ही वृत्ती सगळ्यांमध्ये भिनत चालली आहे. त्याचं सेल्फी हे प्रतिनिधित्व करतं. स्वत:ची प्रतिमा टिपणं हा परंपरागत भाग आहे; असं म्हटलं तरी त्याची आवर्तनं वेगळी आहेत. आताच्या प्रतिमा टिपण्यामध्ये अनेकदा फक्त बहिर्मुखता दिसून येते. ‘मी कोणासोबत होतो, काय मजा करतो, अमुक ठिकाणी होतो,’ अशा प्रकारे स्वत:ची जीवनपद्धती दुसऱ्यांना दाखवण्यासाठी टिपलेला तो सेल्फी टिपलेला असतो.

ग्रुपचा फोटो काढून झाल्यावरही तो कसा आलाय यासाठी सगळ्यांची फोटो काढणाऱ्याकडे धाव असते. त्यातही आपण कसे दिसतोय, स्माइल चांगली आलीये की नाही, केस कसे दिसताहेत वगैरे तपासणंही सुरू होतं. एखाद्या ग्रुप फोटोची अशी अवस्था आहे तर विचार करा सेल्फीमध्ये काय होत असेल. सेल्फीचं एक बरं असतं. फ्रण्ट कॅमेरा सुरू करून त्यात फोटो काढण्याआधी आपण कसे दिसतोय हे बघता येतं. सेल्फी काढण्याच्या आधी अनेक मुलं-मुली फ्रण्ट कॅमेरा ऑन करून ते कसे दिसताहेत हे बघण्यासाठी त्याचा आरशासारखा वापर करतात. पुन्हा इथे आरशाचा संदर्भ येतोच. सेल्फी हा सेल्फ ऑबसेस्ट असण्याचं प्रतिबिंब आहे. हे पूर्वीच्या पोटर्र्ेटमध्ये नव्हतं. जरी असलं तरी ते आत्मशोध या अर्थी होतं. आताचं सेल्फ ऑबसेशन मी कशी किंवा मी कशी दिसते माझे कपडे कसे आहेत या अर्थी आत्मकेंद्री आहे.

एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपल्या आधीच्या रांगेत बसलेल्यांपैकी कोणाचं नृत्य किंवा गाणं सुरू असेल तर ती अख्खी रांगच्या रांगच आपापल्या मोबाइलचा व्हिडीओ मोड ऑन करते. का तर ज्याचा किंवा जिचा परफॉर्मन्स सुरू आहे तो मोबाइलच्या मेमरीमध्ये साठवून ठेवायला. मग तो माणसांच्या मेमरीतून डिलीट झाला तरी चालेल, पण मोबाइलची मेमरी मस्ट! असा अनुभव अनेकांना असेलच. पण, ते परफॉर्मन्स तिथे एकदाच लाइव्ह होणार असतात. त्याचा प्रत्यक्ष अनुभव न घेता मोबाइलवर शूट करताना त्या छोटय़ा स्क्रीनवर तो परफॉर्मन्स बघितला जातो. ते शूटिंग करणं अत्यंत गरजेचं असतं त्यांच्यासाठी. कारण अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलियामध्ये बसलेल्या त्यांच्या आत्या, मावशी, काकांना लगेचच्या लगेच ते दाखवायचं असतं. पण त्याच वेळी मोठय़ा स्वरूपात तोच परफॉर्मन्स रंगमंचावर रंगत असताना तो बघण्याची संधी मात्र ते गमवतात. काही कला प्रदर्शन सोहळ्यांमध्येही असं होत असतं. तिथेही तिथली कला बघण्यापेक्षा फोटो, सेल्फी काढत असतात. मोबाइलमुळे लोक चांगल्या कलाकृती प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यांनी बघतच नाहीत. त्यांचे फोटो काढण्यात मग्न असतात. आता टिपणं वाढलंय आणि बघणं कमी झालंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

लहान असताना आम्ही सगळी भावंडं सुट्टीत एकत्र जमायचो. मग सकाळच्या चहापासून ते रात्री जेवणापर्यंत आमचा दंगा चालायचा. त्यावेळची एक गंमत आठवते. नाश्ता किंवा जेवण वाढण्याआधी घरातल्या आई, काकू, मावशींनी ताटं पुढे सरकवली की त्या रिकाम्या ताटाशी सगळं वाढेस्तोवर आम्ही खेळ खेळायचो. खेळ असायचा; ताटात स्वत:चा चेहरा बघणं! मग कोणाचा चेहरा स्पष्ट दिसतोय, कोण त्यातही सुंदर दिसतंय ही चढाओढ असायची. ताटात पोळी-भाजी, आमटी असे एकेक पदार्थ येऊ लागले की या खेळाचं हक्काचं साधन जायचं. मग मोर्चा वळायचा तो तांब्या-भांडय़ाकडे. तांब्यात किंवा पाणी पिण्याच्या भांडय़ात चेहरा थोडा फुगीर दिसायचा. त्याची गंमत वाटायची. मग त्यातच आणखी तोंडं वेडीवाकडी करून हसून लोटपोट व्हायचो. आता ताट, तांब्या किंवा पाणी पिण्याच्या भांडय़ाऐवजी हातात मोबाइल दिसतो. ही साधनांची रिप्लेसमेंट झाली. तोंडं वेडीवाकडी करून स्वत:चं प्रतिबिंब बघण्याला मात्र काहीच रिप्लेस करू शकलं नाही. ते आहे तसंच आहे. म्हणजेच मानवी स्वभाव, भावना यांची मुळं आजही तशीच आहेत.

पूर्वीच्या काळी लोकांना मृत्युनंतरही आपलं अस्तित्व टिकून राहावी असं वाटे, यासाठी ते त्यांची व्यक्तिचित्रातून प्रतिमा तयार करायचे.   आता लोकांना वर्तमानातील जगण्याचा आनंद लुटायचा असतो. ते काय करतात, त्यांच्या प्रत्येक वर्तमानातील क्षणात काय सुरू आहे हे लोकांना दाखवायचं असतं. म्हणूनच ते प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात बंद करण्यात मग्न असतात आणि वर्तमानातील क्षणाचा आनंद घेण्याला प्राधान्य देतात. पुढच्या क्षणाचं मला काही माहीत नाही, त्यामुळे आता आहे त्या स्थितीचं मी टिपण करतोय, हा विचार प्रकर्षांने दिसून येतो.

सेल्फीचा प्रसार अनुनयातून झाला आहे. सेल्फीचं प्रस्थ अनुनयातून वाढलं आहे. वेडेवाकडे चेहरे, हावभाव करून बघणं हे सगळं आपल्यासाठी नवीन आहे. आपल्या देशात आपल्याला मटेरिअलिझमची सवय नाही. त्यामुळे हा प्रकार होतो. अनुकरण करण्याचा माणसाचा स्वभाव तसा जुना आहे. पूर्वीपासून तो कोणत्या ना कोणत्या गोष्टींचं अनुकरण करत आला आहे. इतर काही गोष्टींप्रमाणेच हेसुद्धा अनुनयातून आलेलं आहे, कारण आपल्या समाजातील बहुतांशी लोक अनुनयातून काम करतात. मोबाइलमुळे प्रत्येकाचं असं एक खासगी जग तयार झालंय. त्या जगात प्रत्येकाची समाजात, कुटुंबात जी मूल्यं असतात त्याहीपेक्षा ती मूल्यं वेगळी असू शकतात, याचा विचार केला जात नाही. तो व्हायला हवा. मग त्याच छोटय़ा कुपीमध्ये राहायचं आणि बाहेर वेगळं वागायचं, अशा प्रकारची वृत्ती तयार होताना दिसून येते.

आपण एकविसाव्या शतकात आहोत, असं म्हटलं की, अनेक गोष्टींचा स्वीकार करणं आपल्याला अपरिहार्यच आहे असं वाटू लागतं. तंत्रज्ञानाचा आणि आधुनिकतेचा स्वीकार जरूर करावा. हे गरजेचंही आहे; पण त्यामुळे हातून काही सुटतंय का, याचाही विचार व्हायला हवा. या संपूर्ण तंत्रज्ञानामुळे आता लोक बहिर्मुखतेत जास्त अडकत चालले आहेत. त्यामुळेच ना फोटोग्राफीमध्ये कोणी फार चांगलं काम करताना दिसतं, ना लोकांना काही चांगलं काही पाहायची सवय राहिलीय. यामुळे सगळ्यांमध्ये तटस्थपणा येत चाललाय. या तंत्रज्ञानाच्या वापरातूनच हा तटस्थपणा तयार होऊ लागलाय. ही तटस्थता घातक असल्याचं काही कला अभ्यासकांनी अनेकदा नमूद केलं आहे. पूर्वी आतासारखं तंत्रज्ञान विकसित नव्हतं. त्यामुळे सामान्य माणसाच्या हाती त्या वेळी आजसारखे मोबाइलही नव्हते. त्या वेळी परदेशात किंवा इतर ठिकाणी काय घडतंय हे समजून घ्यायला इतरांवर अवलंबून राहावं लागायचं. आता ते एका क्लिकवर मिळतं. या एका क्लिकवर कोणी फोटो काढतं तर कोणी व्हिडीओ. त्यामुळे लोकांना आता कोणत्याही गोष्टीत थरार, मनोरंजन, विनोद, रहस्य असेल असं वाटण्याची आणि बघण्याची सवय झाली आहे. यामुळे काही जण फक्त दर्शक झालेत. त्याला प्रतिसाद देण्याची प्रक्रिया खूप मंदावली आहे. सेल्फी, फोटोच्या माध्यमातून स्वत:चं मनोरंजन करायचं आणि इतरांचं करून घ्यायचं, हेच अनेकांना महत्त्वाचं वाटू लागलंय. सेल्फीच्या अतिवापरामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. म्हणूनच आता सरकारला ‘सेल्फी डेंझर झोन्स’ असे फलक ठिकठिकाणी बघायला मिळतील. विशिष्ट ठिकाणी ‘पुढे अपघाती वळण आहे’, ‘धोक्याचे वळण’ अशा अर्थाचे फलक असतात तसेच आता सेल्फीसाठी धोकादायक असलेल्या विभागांसाठी फलक लावण्यात येणार आहेत.

स्वत:ची प्रतिमा, प्रतिबिंब बघणं, न्याहाळणं हा माणसाचा छंद, आवड आणि प्रेम. स्वच्छ, स्पष्ट अशी प्रतिमा नेहमी आरशातून बघता येते या समजुतीवर त्या काळचे लोक ठाम होते. कालांतराने चित्रातून स्वत:ची प्रतिमा बघता येते हे त्यांच्या लक्षात आलं; पण चित्र काढणे या प्रक्रियेत बराच वेळ जायचा. तसंच काहीसं शिल्पकृतीचं. त्यासाठी वेळ लागायचा; पण आरसा, चित्र, शिल्पकृती या सगळ्यातून माणसाला त्याची प्रतिमा बघण्याचा आनंद मिळायचा. पण, प्रत्येकाची प्रक्रिया आणि परिणाम वेगवेगळे होते. आरशासमोर उभे आहोत तोवरच माणसाला त्याचं प्रतिबिंब, त्याची प्रतिमा पाहता येते. चित्र आणि शिल्पकृतीच्या माध्यमातून त्याला त्याची प्रतिमा दीर्घकाळ जपून ठेवता येते; पण चित्र काढण्याच्या प्रक्रियेला वेळ लागतो. सेल्फीमुळेही माणसाला त्याची प्रतिमा मोबाइलमध्ये दीर्घकाळ जपून ठेवता येते; पण ती काढायला अतिशय कमी वेळ लागतो. एकंदरीत काय, तर स्वत:ची प्रतिमा बघण्याला ठरावीक काळाच्या अंतराने वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले. प्रत्येक टप्प्यावर त्याची नवी ओळख, सवय माणसाला होऊ लागली. काळ बदलतो तसं नवनवीन गोष्टी माणूस स्वीकारत गेला आणि आता तो सेल्फीपर्यंत येऊन पोहोचला आहे. आरसा ते सेल्फी हा प्रतिमेचा प्रवास माणसाला आनंद देणाराच आहे. या प्रवासाची सुरुवात ‘आईना है मेरा चेहरा’ इथून झाली असली तरी आता तो प्रवास ‘सेल्फी है मेरा चेहरा’ इथवर येऊन पोहोचला आहे. हा प्रवास माणसाला सुखावणारा आहे. त्याच्यासाठी ध्येय एकच आहे- स्वत:ची प्रतिमा बघण्याचं, न्याहाळण्याचं; मग माध्यम कोणतेही असो!

(या लेखासाठी रचना संसद अ‍ॅकेडमी ऑफ फाइन आर्ट्स अ‍ॅण्ड क्राफ्ट्सचे प्रमुख महेंद्र दामले यांच्याशी झालेली चर्चा उपयुक्त ठरली.)

तरुण पिढीमध्ये सेल्फीचा ट्रेण्ड आहे. प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करणाऱ्या पिढीचं सेल्फीबद्दलचं मत त्यांच्याच शब्दांत.

  •  एखाद्याला भेटलो की ती भेट लक्षात राहावी म्हणून सेल्फी घेतला जातो. नातेवाईक, मित्रपरिवार यांना खूप दिवसांनी भेटल्यावर त्या आनंदात त्यांच्यासोबत एक सेल्फी काढला जातो. सेल्फीसाठी स्नॅपचॅट, रेट्रिका, नॉर्मल कॅम, ब्युटी प्लस अशी काही खास अ‍ॅप्स आहेत. पाउट करुन सेल्फी काढणं मला आवडत नाही. लायनर चांगलं दिसतंय का, पिंपल दिसत नाही ना, चेहरा मोठा दिसतोय का असे विचार मुलं-मुली करतात. तोंड वेडेवाकडे करून फोटो काढणाऱ्यांना नावं ठेवतात. पण, थोडी मजा घेत फोटो काढले तर काहीच हरकत नाही. ट्रेनमध्ये दरवाजात किंवा समुद्रकिनारी उभं राहात सेल्फी काढण्याचा अतिरेक करून जीव धोक्यात घालण्यापेक्षा तोंडं वेडीवाकडं करत, मजा घेत सेल्फी काढलेले केव्हाही बरे.
    जान्हवी कुलकर्णी, बारावी आर्ट्स
    के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड कॉमर्स, विद्याविहार
  • माझे फोटो काढायला कोणी नसलं मी सेल्फी काढते. सेल्फी काढताना विशिष्ट अ‍ॅप न वापरता मी मोबाइलमध्ये असणाऱ्या सेटिंग्जचा वापर करते. चेहऱ्यापासून कॅमेरा शक्य तितक्या लांब धरण्याचा मी प्रयत्न करते. ब्युटी मोडने काम खूप सोपं केलंय. सेल्फी काढणाऱ्यांना आत्मकेंद्री, स्वत:वर प्रेम करणारे, स्वार्थी असं म्हटलं जातं पण एका मर्यादेपर्यंत याचा वापर करणं वावगं नाही. थोडं स्वत:वर प्रेम करायला काय हरकत आहे. डोंगराच्या कडय़ावर, समुद्र किनारी अशा ठिकाणी सेल्फी काढताना भान असायलाच हवं. सेल्फीसारखेच ग्रुप्फीसुद्धा काढले जातात. ग्रुपमधल्या सगळ्यात उंच व्यक्तीला सेल्फी काढण्याची जबाबदारी दिली जाते. ग्रुप अगदीच मोठा असेल तर थोडं पुढे जाऊन किंवा टेबल, खुर्चीवर चढून ग्रुप्फी घेतला जातो.
    कोमल आचरेकर, द्वितीय वर्ष, मास्टर्स इन कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नालिझम,
    मुंबई विद्यापीठ
  • सेल्फी हा प्रकार मला उमगला नसल्यामुळे मी तो फारसा काढत नाही. दुसऱ्यांना सांगून उत्तम फोटो येऊ  शकतो मग कशाला उगाच सेल्फीचा अट्टहास. आपण कुठे आहोत याचं अजिबात भान न ठेवता सतत सेल्फी काढणं हे न पटणारं आहे. वेडेवाकडे चेहरे करून सेल्फी काढणारे लोक त्यांचं गोड हसू विसरत चालले आहेत. या सेल्फीमुळे कॉलेजमध्ये अतिशय विचित्र वातावरण झालंय. काहींना मी खातोय, टीव्ही बघतोय, फिरतोय अशा आशयाचे स्टेटस सोशल साइटवर टाकायचे असतात. त्यामुळे ते प्रत्येक क्षणाचे फोटो काढतात. सेल्फी काढण्याचा अनेकांना आनंद मिळतो, पण त्यात कसला आनंद हेच मला समजलं नाही.
    तेजश्री गायकवाड, टीवायबीएस्सी
    बीएमएन कॉलेज ऑफ होम सायन्स, माटुंगा
  • मी सेल्फी अ‍ॅडिक्ट नाही. इतरांच्या सेल्फीत मात्र डोकवायला मी चुकत नाही. जेव्हा मी सेल्फी काढते तेव्हा तो परफेक्ट असेल याची पुरेपूर काळजी घेते. परफेक्ट सेल्फी येण्यासाठी आरशासमोर उभं राहून फ्रण्ट कॅमेऱ्यामध्ये सेल्फी घेणं कधीही चांगलं. आपल्या चेहऱ्यावरचे खाचखळगे दिसू नयेत म्हणून मोबाइलच्या कॅमेऱ्यामध्ये फिल्टर्स आणि काही अ‍ॅप्लिकेशन्सही असतात. ग्रुप्फी काढणारे अनेकदा सेल्फी स्टिकचा वापर करतात. सेल्फी स्टिक मिळत नाही तेव्हा ग्रुपमधल्या एखाद्या उंच मुलाला सेल्फी स्टिक बनावं लागतं. ग्रुप्फी काढताना बरेचदा फ्रण्ट कॅमेराच वापरला जातो. बॅक कॅमेराने सेल्फी काढणं हे एक कौशल्य मानलं जातं.  कॉलेजमध्ये सेल्फी काढण्यासाठी हल्ली कोणत्या विशेष डेजची गरज नसते. लेक्चरमध्ये असताना शिक्षकांच्या लक्षात न येता सेल्फी काढणं या कौशल्याचं मित्रपरिवारात कौतुक केलं जातं.
    वेदवती चिपळूणकर, टीवायबीए
    साठय़े कॉलेज, विलेपार्ले
  • येईल त्या ट्रेण्डला फॉलो करण्याची आजच्या पिढीची मानसिकता आहे. सेल्फीही त्यापैकीच एक. विनाकारण काढलेले ढीगभर सेल्फी पाहताना कधी कधी मला स्वत:वरच हसूही येतं. एकाच व्यक्तीचे किती वेडेवाकडे चेहरे असतात हे एका सेल्फीद्वारेच उत्तम कळते. काही सेल्फी मात्र चांगले येतात. काहीजण त्यांच्या सेल्फीला चांगल्या कमेंट्स मिळाव्यात यासाठीही सेल्फीचा घाट घालतात. सहसा हात उंचावत टॉप अँगलने काढलेले सेल्फी चांगले येतात हे मी अनुभवावरून सांगते. आरशासमोर उभं राहून एकदम सुरेख सेल्फी येतो. टिपिकल ‘स्वॅग’वाला सेल्फीच म्हणा ना. सेल्फी काढताना डबल चीन, केसांचं स्ट्रक्चर या साऱ्यांचा विचार सहसा मी करत नाही. आता घरातल्या सगळ्याच सदस्यांवर हे ‘सेल्फीश वारे’ स्वार आहेत. सेल्फीसाठी सगळे एकत्र आले की, त्यातले किमान अर्धे जण न चुकता पाउट करतात. आमच्या ग्रुपमध्ये उंचीने सर्वात जास्त असल्यामुळे ‘सेल्फी स्टिक’चा बहुमान सध्या तरी माझ्याकडेच असतो. पण, कधी कधी मला मात्र सेल्फी काढताना काही अतरंगी पोझ देण्याची संधी तशी कमीच मिळते. पण संधी मिळाली की त्याचा मी वापर करते.
    सायली पाटील, पत्रकारिता अभ्यासक्रम
    एमडी कॉलेज, परळ
  • सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्यासाठी मी सेल्फी काढतो. सेल्फी काढताना विशेष अशी टेक्निक काहीच नसते. सेल्फी चांगला यायला हवा एवढीच काय ती अपेक्षा असते. त्यासाठी अँगल महत्त्वाचा आहे. सेल्फी काढताना लुक, चेहरा, केस, डोळे कसे दिसतात याचा विचार केला जातो. ग्रुपमध्ये उंच असलेला एखादा ग्रुप्फी काढतो.
    चारुहास शेळके
    द्वितीय वर्ष, मेकॅनिकल इंजिनीअरिंग
    नवजीवन एज्युकेशन सोसायटी पॉलिटेक्निक, भांडुप
  • मला सेल्फी काढायला प्रचंड आवडतं. स्नॅपचॅट, ३६०, कॅण्डी कॅमेरा, रेट्रिका अशा काही अ‍ॅप्समध्ये विशेष इफेक्ट्स आणि फोटोंचे पर्याय असल्यामुळे सेल्फी काढायला आणखी मजा येते. स्नॅपचॅटवर दिवसभरातल्या काही गोष्टी सेल्फीद्वारे सांगता येतात. सेल्फी काढताना कोणती बाजू जास्त चांगली दिसेल, केस कोणत्या बाजूने जास्त चमकतील, प्रकाश कसा येतोय, कानातले दिसताहेत का असा सगळा विचार केला जातो. कधी कधी पाउट आणि एक डोळा बंद करून ओठ दाबूनही सेल्फी काढला जातो. अशा प्रकारचे सेल्फी काढण्यात मजा येते. काही मुली ट्रेनमध्ये गर्दीत आणि दरवाजात उभं राहून सेल्फी काढत असतात. हा गैरवापर आहे. अतिरेक न करता मी सेल्फी काढण्याचा मनमुराद आनंद घेते.
    सानिका धुरी, बारावी कला शाखा
    एसके सोमय्या विद्या मंदिर, विद्याविहार
  • विविध आउटफिट्स आणि मेकअप्स करून बघताना मी सेल्फी काढते. तसेच रोजचा दिनक्रम स्नॅपचॅट किंवा इंस्टाग्राम स्टोरी या माध्यमातून सेल्फी शेअर करायला मला आवडतात. सेल्फी काढताना विशिष्ट तंत्रज्ञान नक्कीच वापरलं जातं. केसांचा आकार चांगला, चेहरा बारीक दिसावा यासाठी सेल्फी कॅमेरा थोडा वर आणि लांब धरला जातो. कॉलेजमध्ये सेल्फीप्रमाणे ग्रुप्फी काढण्याचं प्रमाणही जास्त आहे. अगदी वर्गामध्ये लेक्चर चालू असतानाही ग्रुप्फी काढले जातात. सगळ्यांना सामावून घेण्यासाठी ग्रुप्फी काढताना कॅमेरा उंचावर धरला जातो आणि त्यामुळे सेल्फी काढणाऱ्याचा चेहरा सेल्फीमध्ये खूप मोठा दिसत नाही.
    प्राची परांजपे, द्वितीय वर्ष
    मास्टर्स इन कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नालिझम, मुंबई विद्यापीठ
  • तरुणाईतला ट्रेण्ड आणि अ‍ॅडिक्शनमुळे मी सेल्फी काढतो. मी एका वेळी दहा सेल्फी काढले तर त्यातले नऊ सेल्फी डिलीट करतो. सेल्फी काढताना अँगल अतिशय महत्त्वाचा आहे. कोणत्या अँगलने तुम्ही सुंदर दिसता हे महत्त्वाचं आहे. बॅक्ग्राउण्ड कशी आहे आणि फोटोत माझी खळी दिसतेय का याचा विचार मी सेल्फी काढताना करतो. ग्रुपमध्ये सगळ्यात उंच असणाऱ्या मुलाने ग्रुप्फी काढावा कारण तो ग्रुपमधल्या सगळ्यांना त्या फोटोमध्ये सामावून घेऊ शकतो.
    अक्षय साठे
    प्रिटिंग प्रेस व्यवसाय
  • मी सेल्फी अजिबात काढत नाही. स्वत:चे फोटो काढायला मला आवडतही नाही. ग्रुप्फीमध्ये मात्र मी असतो. उगाचच स्वत:चे फोटो काढण्याचे फॅड मला फारसं आवडत नाही. मी सेल्फी काढत नसल्यामुळे त्यासाठी काय विचार केला जातो, काय तंत्रज्ञान, अ‍ॅप्स वापरले जातात याची मला फारशी माहिती नाही. ग्रुप्फी काढताना ग्रुपमधली या विषयातली तज्ज्ञ मंडळी असतातच.
    आदित्य फडके, डिप्लोमा इंजिनीअरिंग
    फादर अ‍ॅग्नेल, वाशी
  • मी सेल्फीपेक्षा ग्रुप्फी जास्त काढतो. मी सेल्फी काढले तरी ते माझे स्वत:चे नसतात; तर इतरांसोबत काढलेले असतात. ते फोटो मी कधी कधी शेअर करतो किंवा नको असतील तर डिलीट करतो. फक्त फ्रण्ट कॅमेऱ्याचाच वापर करतो. सेल्फी काढताना कसा दिसेन वगैरे विचार मी करत नाही. आजूबाजूला कोणी नसेल, एकटे असू तेव्हा स्वत:चा फोटो काढण्यासाठी सेल्फीचा पर्याय उत्तम ठरतो. उंच असल्यामुळे ग्रुपचा सेल्फी काढणारा मीच असतो. पण त्यातही वेगळं असं काही विशेष टेक्निक नाही. एका वेळी १५-२० जणसुद्धा एका फ्रेममध्ये बसवण्यासाठी विशिष्ट अँगल अ‍ॅडजस्ट करावा लागतो.
    अभिजीत जोग, बायोटेक इंजिनीअर
    अ‍ॅटोस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
  • इतर काहींसारखे भरमसाट नाही, पण मोजके सेल्फी काढून मनी ते सेव्ह करतो. सेल्फी काढण्याचे विशेष अ‍ॅप्स आहेत. सेल्फी काढण्यासाठी हात ताठ राहणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी अनेक जण सेल्फी स्टिकचा पर्याय निवडतात. फोनची पोझिशन लक्षात ठेवून सेल्फी काढला जातो. स्नॅपचॅटवर मात्र तशी गरज भासत नाही. कॉलेजमध्ये एकंदरीत सेल्फी वेड आता कमी होत चाललंय असं माझं निरीक्षण आहे. पण आजही काही ग्रुप अजूनही सेल्फी काढताना दिसतात. मी स्वत: सेल्फी काढतो तरीही त्याचा अतिवापर करणं मला खटकतं. ग्रुप्फीसाठी ग्रुपमधला उंच आणि ज्याचा हात लांब आहे असा मित्र एका कोपऱ्यात उभं राहून ग्रुप्फी काढतो आणि हेच सेल्फी आणि ग्रुप्फीचं टेक्निक आहे.
    प्रसाद पवार, टीवाय बीएमएम
    रुईया कॉलेज, माटुंगा
  • कोणत्याही खास क्षणाची आठवण ठेवण्यासाठी फोटो काढताना नेहमीच कोणी सोबत असेल असं नाही. त्या वेळी सेल्फी हा उत्तम पर्याय ठरतो. सेल्फी आताचा ट्रेण्ड आणि फॅडसुद्धा आहे. मुलांपेक्षा मुली जास्त सेल्फी काढतात. उंच आणि लांब हात असणाऱ्या माणसांचे सेल्फी चांगले येतात. सेल्फीमध्ये आपण पूर्ण येतोय की नाही याचा आणि आपण जास्तीतजास्त गोरे कसे दिसू याचा विचार करतात. त्यासाठी मुद्दाम सो कॉल्ड सनकिस्ड फोटोंना जास्त पसंती असते. कॉलेजमध्ये सेल्फी काढायला विशिष्ट कारण लागत नाही. काहीजण मात्र सेल्फी काढण्याचा अतिरेक करतात.
    सौरभ नाईक, एमए पॉलिटिकल सायन्स
    मुंबई विद्यापीठ

सेल्फीच्या टिप्स :

सध्याच्या स्मार्टफोनच्या जमान्यात फोटोग्राफी आणि फोटोग्राफर ही काय पूर्वीसारखी दुर्मीळ गोष्ट मुळीच राहिलेली नाही. सेल्फी हे उत्तमच असायला हवे, सध्या सोशल साइट्सवर गाजणारी किम कार्डेशिअन आणि तिच्या सेल्फी टिप्स बऱ्याच गाजत असल्या तरी सध्या त्या भारतात कामी येतील याबाबत शंकाच आहेत; पण किम कार्डेशिअनपेक्षाही आपण उत्तम सेल्फी काढू शकतो. त्यासाठी आम्ही जमविलेल्या काही टिप्स.

***

उत्तम प्रकाश : लाइट आणि कोणताही फोटो यांचं अतूट नातं असतं. सेल्फीच्या बाबतीतही ही गोष्ट खोटी नाही. उत्तम लाइट्स तुमच्या सेल्फीला वेगळा लुक बहाल करतात. यल्लो फिशी लाइट्समधले फोटो चांगले वाटत असले तरी फार कमी आणि डल लाइट्समधले सेल्फीची क्लिअ‍ॅरिटी कमी असते, त्यामुळे सेल्फी काढताना उत्तम लाइट्स असतील याची काळजी घ्यावी. कृत्रिम प्रकाशापेक्षा नसíगक प्रकाशात काढलेले सेल्फी जास्त चांगले येतात. सेल्फी काढताना फ्लॅश वापरणे शक्यतो टाळावेत.

***

बॅकग्राऊण्ड आणि योग्य अँगल : बॅकग्राऊण्डच्या रंगसंगतीवरही सेल्फीची आकर्षकता ठरते. त्यामुळे बॅकग्राऊण्ड निवडणे महत्त्वाचे ठरते. ठळक रंगसंगतीच्या बॅकग्राऊण्डवर सेल्फी काढणे टाळावे किंवा जाणूनबुजून तसे काढत असताना कॅमेऱ्याच्या फेस लायटिनग फीचरचा नक्की योग्य वापर करावा. त्याचबरोबर सेल्फी काढताना साधला जाणारा कोन हा योग्य असायला हवा; नाही तर सेल्फीमध्ये आपण अतिजास्त जाड किंवा बारीक दिसू शकतो. योग्य अंतरावरून योग्य कोन साधून सेल्फी काढता आला पाहिजे.

***

योग्य फिल्टर आणि फोन फीचर्स : आपण काढलेल्या सेल्फीला योग्य प्रकारे थोडंसं एडिट करण्यात काहीही गर नाही. त्यासाठी प्लेस्टोअरवर भरपूर अ‍ॅप्लिकेशन्स असतात. यातही रेट्रो फिल्टर्स वापरून काढले जाणारे सेल्फी सध्या सर्वाधिक चच्रेत आहेत. ब्युट फीचर्स म्हणजेच चेहऱ्यावरचा ग्लो वाढवणे, चेहऱ्यावरील डाग झाकणे, चेहरा जरा बारीक करणे, डोळे मोठे करणे यांसारख्या सुविधा ब्युटिफाइंग फीचरच्या नावाने प्रत्येक फोनमध्ये हल्ली असतातच आणि नसल्या तर तसे करणारे अ‍ॅप्लिकेशन्स नक्की वापरावेत. यामुळे आपला सेल्फी हा उत्तम सेल्फी ठरू शकतो.

***

सेल्फी मानसिकता : सेल्फी काढण्यासाठी मुळात उत्तम मानसिकता असायला हवी. सेल्फी काढताना लाजरेबुजरे असून चालत नाही, विनासायास योग्य ठिकाणी आपल्याला सेल्फी काढता यायला हवेत. साध्या हसऱ्या चेहऱ्याच्या सेल्फीपेक्षा क्रेझी सेल्फी काढण्यात आणि त्यासाठी पोझ करण्यात वेगळी मजा असते. त्यामुळे तो प्रयत्न नक्की करून पाहा. सेल्फी काढण्यासाठी पेशन्स तेवढेच महत्त्वाचे असतात, कारण पहिल्याच प्रयत्नात बेस्ट क्लिक करणे अजिबात शक्य नसते. त्यामुळे जितके क्लिक्स अधिक तितका उत्तम सेल्फी मिळण्याचे प्रमाण वाढते, प्रयत्नांती परमेश्वर सो गो सेल्फी.

सेल्फीसाठी उपयुक्त अ‍ॅप्स –

सेल्फी काढण्यासाठी हल्ली प्रत्येक फोनमध्ये काही ब्युटी इफेक्ट्स समाविष्ट केलेले असतात, पण या व्यतिरिक्तही अ‍ॅण्ड्रॉइड मार्केटवर तुमच्या सेल्फीला परफेक्ट सेल्फी बनविणारी अनेक अ‍ॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत.

***

परफेक्ट ३६५ : हे अ‍ॅप  सध्या ट्रेण्डमध्ये आहे. यामध्ये चेहऱ्यावर आफ्टर क्लिक मेकअप करू शकतो. यामध्ये डोळ्यांचा, केसांचा रंग बदलू शकतात, स्किन टोन, आय लॅशेसमध्ये चेंज करू शकता, स्किन टोन सुधरवू शकतात. परफेक्ट सेल्फीच्या मेकअपसाठी हे अ‍ॅप उत्तम पर्याय आहे.

***

प्रिझ्मा : खरं तर याबद्दल काही वेगळे सांगायला नकोच. आपल्या सेल्फीजना परफेक्ट आर्टिस्टिक लूक देणारे अ‍ॅप्लिकेशन म्हणून सध्या सर्वाधिक ट्रेण्डमध्ये असणारे हे अ‍ॅप्लिकेशन सेल्फीचा आणि पर्यायाने आपला चेहरामोहराच बदलून टाकते.

***

यु कॅम परफेक्ट : हे नावाप्रमाणेच परफेक्ट सेल्फी अ‍ॅप आहे. यातून सेल्फी क्लिक करता येतोच, परंतु यासोबतच असतात ते सेल्फी एडिटिंग टूल्स ज्यामध्ये ब्युटिफाइंग इफेक्ट्स, ऑब्जेक्ट रिमूव्हर म्हणजेच नको असलेल्या बॅकग्राऊण्डच्या गोष्टी वस्तू, माणसे काढून टाकता येण्याची सोय, तसेच अनेक फिल्टर्स उपलब्ध आहेत.

***

रेट्रिका : अनेक उत्तम फिल्टर्स वापरण्यासाठी आणखी एक उत्तम सेल्फी अ‍ॅप्लिकेशन म्हणजे कॅण्डी कॅमेरा ज्यात अनेकविध प्रकारचे फिल्टर्स पुरविण्यात आलेले आहेत. याद्वारे आपण वेगवेगळ्या ढंगांचे सेल्फी क्लिक करू शकतात. याखेरीज रेट्रो इफेक्ट आवडणाऱ्यांसाठी रेट्रिका हेसुद्धा उत्तम सेल्फी अ‍ॅप्लिकेशन ठरू शकते याचा सोपा इंटरफेस याची उपयुक्तता नक्कीचच वाढवितो. याशिवाय स्नॅपचॅट, एमएसक्यूआरडी (टरदफऊ) बी ६१२ (इ ६१२) हीदेखील उत्तम सेल्फी अ‍ॅप्लिकेशन्स आहेत. या साऱ्यामध्ये थोडय़ाफार फरकाने बरेचसे साम्य जाणवीत असले तरी यांची उपयुक्तता तपासून पाहाण्यासाठी एकदा वापरून पाहायला काहीच हरकत नाही.
– प्रशांत जोशी

चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com
@chaijoshi11