मुंबईत तरुणांसाठी शिफू संक्रिती नावाचा समूह चालवणाऱ्या तथाकथित बोगस डॉक्टरच्या बातम्या यायला लागल्या आणि जाणकार चक्रावले. आजच्या तरुणाईला हे काय झालंय? शिफू संक्रितीच्या चकव्यात ती का अडकते आहे?

कुटुंबातील ताणतणाव, आईवडिलांशी न पटल्यामुळे होणारे वादविवाद, बंधमुक्त आयुष्य जगायची ओढ आणि त्यातून आलेलं नैराश्य यावर रामबाण उपायांसाठी म्हणून मुंबईतील एका तथाकथित डॉक्टराने एका संस्कृतीला जन्माला घातलं. शिफू संक्रिती. त्याचे लक्ष्य होते महाविद्यालयीन तरुण-तरुणी. हा वयोगट १८ ते २५. म्हणजे बंडखोरीचं वय. घरातल्यांपेक्षा मित्रमैत्रिणींना अधिक मानणारं. स्वातंत्र्याच्या अध्र्याकच्च्या संकल्पनांना उराशी कवटाळणारं. काहीतरी नवीन करून पाहायची इच्छा असणारं. एखाद्या नव्या गोष्टीचा लगेच प्रभाव पडणारं वय. त्यातच जर कुटुंबात संवादापेक्षा विवादच अधिक असतील आणि बाहेरच्या व्यक्तीने त्यांच्या भावना गोंजारल्या तर मग तिचं ऐकून काही तरी प्रयोग करायला हमखास बळी पडणारं असं हे वय. मग त्या प्रयोगाची परिणती काय आणि कशी होणार याची तमा बाळगायची गरजच नाही. तथाकथित डॉ. सुनील कुलकर्णीनं हे सारं जोखलं होतं. त्याचे डावपेच अगदी अचूक पडत गेले. हळूहळू त्याच्या जाळ्यात एकएक जण जमा होऊ लागले. त्याचा गोतावळा वाढू लागला. पण एका जागरूक पालकामुळे प्रकरण उघडकीस आलं. तक्रार नोंदवल्यानंतरदेखील पोलिसांनी तपासात चालढकल केली. पण मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर तपास चक्राला गती आली आणि डॉ. सुनील कुलकर्णी हा बोगस डॉक्टर असल्याचं स्पष्ट झालं. शिफू संक्रितीवर चर्चा झडू लागल्या. आज पोलीस तपास सुरू असल्यामुळे पोलीस त्यावर कसलीच प्रतिक्रिया देत नाहीत. त्यांच्या पूर्ण तपासानंतरच या प्रकरणातले तपशील कळतील.  पण समजलेल्या आणि समोर दिसणाऱ्या बाबींवरून एकंदरीतच हे प्रकरण वाटते तितके सरळ नाही. किंबहुना त्यामुळेच या प्रकरणाचे गांभीर्य पोलिसांना नसल्याचे न्यायालयाने नमूद केलं आहे.

ज्या वयोगटातील तरुण-तरुणींच्या बाबतीत या घटना घडल्या त्या वयोगटातील इतर तरुण-तरुणींना हे प्रकरण धक्कादायक वाटतेय; पण हे सर्व आपल्याशी निगडित नाही असंदेखील वाटतेय. किंबहुना समाजातील एका मोठय़ा गटाला अजून तरी याची फारशी जाणीवदेखील झालेली नाही. त्यामुळेच हे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेणं आणि त्याचबरोबर एक समाज म्हणून आपण कोठे चाललो आहोत हे तपासणे गरजेचे आहे.

मुळात कसलेही वैद्यकीय शिक्षण नसताना सुनील कुलकर्णी जी काही कामं करत होता ती सर्वच बेकायदेशीर म्हणावी लागतील. त्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार तो अडचणीत असलेल्या व्यक्तींना मार्गदर्शन करून त्यांना मुक्त जगण्याचा मार्ग दाखवत असे. त्याच्या वक्तव्यानुसार १८ ठिकाणी त्याचे प्रतिनिधी शिफू संक्रितीच्या प्रसाराचे काम करत होते. सुळे भगिनींवर आपण कोणतेही संमोहन केले नसून उलट त्यांचे पालक त्यांना छळत असल्यामुळे त्यांच्यापासून सुटका केल्याचे तो सांगतो. आपण कोणतेही औषध घेण्याचा सल्ला देत नाही असा त्याचा दावा आहे. असे असले तरी शिफू संक्रितीच्या प्रसारासाठी त्याने अगदी पद्धतशीर जाळे विणल्याचे लक्षात येते. एकतर त्याने यासाठी आजची तरुणाई हमखास सापडण्याचे ठिकाण म्हणजे सोशल मिडियाचा वापर केला. ब्लॉगस्पॉट आणि फेसबुक  पेज, ई-मेल या माध्यमांचा त्याने आधार घेतला. त्याच्या फेसबुक पेजवरील वेगवेगळ्या पोस्ट पाहिल्या असता त्यातून आकर्षित करण्यासाठी दिशाभूल करून भुरळ पाडण्याची भाषा स्पष्टपणे जाणवते. आपण खूप काही तरी मोठं तत्त्वज्ञान सांगतोय, जे तुम्हाला सर्व त्रासातून मुक्त करेल. स्वत:चा शोध घेण्यास प्रवृत्त करेल असं काहीसं त्या पोस्ट सांगतात. त्यासाठी विशेष कार्यशाळांचे आयोजनदेखील तो करायचा.  फेसबुक पोस्ट आणि कार्यशाळांच्या एकंदरीत भाषेमध्ये लैंगिकता आणि लैंगिक संबंधांविषयी विविध प्रकारच्या चमत्कृतीपूर्ण विषयांचा समावेश दिसून येतो.

एकंदरीतच यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. एक म्हणजे हा सुनील कुलकर्णी मुळातच बनावट डॉक्टर. त्याच्यावर दिल्लीमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. त्यात तो जामिनावर सुटला होता. तो मूळचा नागपूरचा आणि नंतर काही काळ दिल्लीत राहिलेला. साधारण वर्षभर तो मुंबईत राहतोय. विविध महाविद्यालयात मानद व्याख्याता म्हणून काम करतो असं तो सांगतो. पण ही बोगस प्रमाणपत्रधारी व्यक्ती पोटापाण्यासाठी नेमके काय करते हे गौडबंगालच होते. त्यातच कसलेही प्रवेश शुल्क न घेता अशी संशयास्पद कामं तो करत होता.  त्याच्या जाळ्यात सापडलेल्या तीन मुली त्याच्याबरोबरच राहत आहेत. शिफू संक्रितीच्या प्रसारासाठी काही मुलं विविध महाविद्यालयांत कार्यरत आहेत असं तो सांगतो. हे सर्व नेमकं कशाच्या जोरावर तो पुढे नेतो याचा तपास सुरु आहे.

हे सगळं बोगस असलं तरी त्यात त्याने नीट डोकं लावलं होतं असं दिसतं. एका मुलाखतीमध्ये तो सांगतो की, मी ‘न्यूरोप्लास्टी रिझिलियन्स’ या प्रक्रियेचा वापर करतो. याबाबत वैद्यक शाखेतील तज्ज्ञ सांगतात की सुनील कुलकर्णी न्यूरोप्लास्टी संदर्भात जे काही सांगतोय ते सर्व अत्यंत निर्थक आणि चुकीचं आहे. न्यूरोप्लास्टी ही पूर्णपणे वैद्यकशास्त्रावर आधारित अशी उपचार प्रक्रिया आहे. मेंदूला इजा झाल्यानंतर तिचा वापर केला जातो. पूर्वी वैद्यकशास्त्रामध्ये असे समजले जाई की मेंदूच्या चेतापेशींची (नव्‍‌र्ह सेल्स) एकदा वाढ झाली की त्यामध्ये नंतर बदल होत नाहीत. मेंदूची वाढ एका मर्यादेपर्यंतच होत असते. पण काही वर्षांपूर्वी यावर संशोधन झाले आणि या चेतापेशींमध्ये बदल करता येतो, त्या बदलतात असे सिद्ध झाले. एखाद्या अपघातात मेंदूला इजा झाली असता, त्यामुळे एखादा अवयव काम करत नसेल तर त्यासाठी न्यूरोप्लास्टीचा आधार घेतला जातो. वाढ न होणाऱ्या चेतापेशींचे काम दुसऱ्या पेशी स्वीकारतात आणि काही प्रमाणात तरी निकामी अवयव कार्यरत होऊ शकतो. मानसोपचारांमध्ये जे काही सिद्धांत आहेत त्यामध्येदेखील काही प्रमाणात याचा वापर होऊ लागला आहे. नैराश्यावर याचा वापर केला जात आहे. पण त्यासाठीचे एक शास्त्र विकसित केले आहे आणि अजूनही विकसित होत आहे. अशा वेळी सुनील कुलकर्णी न्यूरोप्लास्टीच्या नावाखाली लोकांना नग्न होऊन स्वत:च्या शरीराची ओळख करून घ्या वगैरे जे काही सांगतो, त्यात विकृती तर आहेच, पण त्याचबरोबर लोकांना बहकवण्याचा डावदेखील दिसून येतो. वैद्यकीय उपचार प्रक्रियेचं नाव वापरून त्याभोवती एक मायाजाल निर्माण करण्याच्या या त्याच्या कृत्यामुळे सुनील कुलकर्णीच्या इतर वैद्यकीय दाव्यांबाबत आणखीन तपास करण्याची गरज प्रकर्षांने दिसून येते.

05-lp-shifu

एकंदरीतच सुनील कुलकर्णीच्या या साऱ्या कृत्यांमुळे समाजाच्या वागण्यावर काही महत्त्वाची प्रश्नचिन्हं निर्माण होताना दिसतात. मुळातच अशा मोहजालाचं आकर्षण का निर्माण होतंय हे पाहावं लागेल. यासंदर्भात ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी सांगतात, ‘‘सध्या आपल्याकडे मानसिक आरोग्याची बाजारपेठ खूप मोठी झाली आहे. जागतिकीकरणानंतर आपण दारं-खिडक्याच नाहीतर छप्परदेखील उघडं केलंय. त्यातूनच आज एक प्रकारचा प्रचंड गोंधळ वाढलाय. एकाकीपणा निर्माण झाला आहे. ताण आहे. घरी मोकळीक नाही, मग जायचं कुठे?

याच परिस्थितीत सुनील कुलकर्णीसारखे उपचार करणारे बनावट व्यावसायिकदेखील वाढत आहेत. सुनील कुलकर्णीकडे आकर्षित झालेले तरुण-तरुणी परंपरावादी कुटुंबातील आहेत. अशा ठिकाणी एक प्रकारची पोकळी तयार झाली आहे. कोणाला तरी भेटायचंय, बोलायचंय ही गरज वाढलेली असते. मग अशा वेळी तुम्ही योग्य तो दरवाजा ठोठावलाच असे होत नाही. चुकीचा दरवाजा ठोठावला आणि त्याने सहानभूती दाखवली आणि मग प्रवचनं दिली की तुम्ही आपोआप जाळ्यात ओढले जाता. त्यातूनच मग सुनील कुलकर्णीसारख्यांचे आणखीनच फावते. आज अगदी अशाच समांतर कार्यपद्धती राबवणारे अनेक जण समाजात दिसून येतात.’’ असे आकर्षण नेमकं का आणि कसे तयार होत असावे हा प्रश्न त्यातून निर्माण होतो. त्यावर डॉ. हरीश शेट्टी सांगतात की, हे दोन्ही बाजूंनी होत असते. तुम्ही चुकीचा दरवाजा ठोठावता आणि तो माणूस तुमच्यावर कब्जा करतो. लोक स्वत: जाऊन आपला पैसा, अब्रू त्याच्या हाती देताना दिसतात. लोक असे जातात कारण त्यांच्यामध्ये एक प्रकारची पोकळी असते. ताणतणाव, आजार त्यांना कोणता दरवाजा ठोठावायचा याचे नेमके ज्ञान मिळू देत नाही. अशांत-अस्वस्थ अशी रचनाही तशाच म्हणजे अशांत- अस्वस्थ लोकांना आकर्षित करते हे यामागचे सूत्र आहे. मग ती व्यक्ती कितीही हुशार असो. प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक ब्लॅकहोल असतो. तो ब्लॅकहोल गोंजारणाऱ्याच्या मागे लोक  जातात. बाबाबुवांच्या मागे जाणाऱ्यांमध्ये आपल्याकडे शास्त्रज्ञांची देखील उदाहरणे त्यामुळेच दिसत असल्याचे डॉ. शेट्टी नमूद करतात. त्याचबरोबर दुसऱ्या एका महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे ते लक्ष वेधतात तो म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध जाणाऱ्या गोष्टीचे आकर्षण. लोकांच्या मनात  विज्ञानाविरुद्ध एक सुप्त राग आहे. त्याऐवजी एखादा पर्यायी व्यवस्थेचा, उपचारांचा मार्ग सुचवला की तो लोकांना लगेच आकर्षित करतो. मग हे पर्यायी उपाय सुचवणारे व्यक्तिमत्त्व सायकोपॅथिक (विकृत मानसिकतेचे) असेल तर मात्र त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. असे अनेक प्रकार समाजात सध्या कार्यरत आहेत. सुनील कुलकर्णी हे समोर आलेलं एक उदाहरण आहे. पण आज समाजात असे अनेक लोक आहेत जे असे पर्यायी उपचार सुचवतात याकडे डॉ. शेट्टी आपले लक्ष वेधतात.

मानसिक आरोग्याबाबतचे आपले दुर्लक्ष अधोरेखित करताना डॉ. शेट्टी सांगतात की, एखाद्या व्यक्तीला ताप आला, काही दुखापत झाली तर ती योग्य त्या वैद्यकाकडे जाते, तसेच मन दुखावलं असेल तर आपण का करत नाही? पालकांना जेव्हा असं काही वाटते, तेव्हा आपल्याला कळत नसेल तर व्यावसायिक सल्ला घ्यावा, पण स्वत:च्या मनाने काहीतरी करायचा प्रयत्न करू नये. पण आपण आज असे करत नाही. त्यातच संवादाची दरी असते. मग ही दरी सुनील कुलकर्णीसारखे लोक भरून काढतात.

असा विषय आला की आपण कायम पाश्चात्त्य देशांची, अमेरिकेशी तुलना करतो. डॉ. शेट्टी सांगतात की अमेरिकेत कुटुंब व्यवस्था मजबूत नाही, पण तेथील इतर शासकीय यंत्रणा मजबूत आहेत. आपण अतिशय कमकुवत, दुर्बळ अशा यंत्रणेसह जागतिकीकरण स्वीकारल्याचेदेखील हे परिणाम असल्याचे ते नमूद करतात.

एकंदरीतच आपल्या बदलत्या कुटुंबव्यवस्थेत आणि पर्यायाने त्यातून निर्माण झालेल्या समाजरचनेत याची काही बीजं दडली आहेत का याचा शोध घेणं महत्त्वाचे ठरते. टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसमधील कुटुंबव्यवस्थेचे अभ्यासक प्रो. देवीप्रसाद सांगतात की, अशा गोष्टी आपल्या समाजात अधूनमधून घडत असतात. धार्मिक बाबतीत अशी उदाहरणं हमखास दिसतात. मुलींनी अशा गोष्टींकडे आकर्षित होण्याची उदाहरणेदेखील झाली आहेत. पण सध्या हे आपल्याकडे का होते हे पाहताना कुटुंबव्यवस्थेतील बदल पाहावे लागतील. ९०च्या दशकात पाश्चात्त्यांकडे विभक्त कुटुंबव्यवस्था आली. त्यांच्याकडे या व्यवस्थेत पूर्णत: स्वतंत्र राहणे दिसून येते. भारताच्या बाबतीत विभक्त कुटुंबव्यवस्था निर्माण झाली तरी असं संपूर्णपणे तुटणे झाले नाही. आपण काही प्रमाणात का होईना आपल्या विस्तारित कुटुंबांशी निगडित होतो. या व्यवस्थेमुळे एखाद्या व्यक्तीच्या निर्णय स्वातंत्र्यावर घाला येऊ नये हे मान्य करावे लागेल. पण सध्या ही रचनादेखील बदलत जातेय असं म्हणता येऊ शकते. ‘माझं आयुष्य माझं स्वत:चं आहे’ हा विचार आताच्या तरुणाईमध्ये रुजत चालला आहे. भारतीय पाश्र्वभूमीवर हे तितकेसे योग्य ठरणारे नाही.  पाश्चात्त्यांकडे वयाच्या अठराव्या वर्षांनंतर प्रत्येकजण स्वत:च्या जगण्यासाठी स्वत:वर अवलंबून असतो. त्यामध्ये कुटुंबाचा सहभाग असतोच असे नाही. पण आपल्याकडे असे होत नाही, हे वास्तव आहे. पण त्याच वेळी समाज माध्यमांमुळे माझं आयुष्य माझं स्वत:चं आहे हा विचारदेखील बळावत चालला आहे. त्यामुळे एकाच वेळी या दोन वास्तवांमध्ये आपण अडकलो आहोत. त्यामुळेच मुलांना स्वातंत्र्य देताना, त्याच्या जबाबदारीची जाणीवदेखील देणे महत्त्वाचे आहे.

मग अशा या सर्व गोंधळात समाजाचा घटक म्हणून आपण काय करायचा असा प्रश्न निर्माण होतो. मुलांना वाढवायचं तर कसं? अतिसंरक्षण पण विपरीत परिणाम घडवतंय, मोकळं सोडलं तर स्वातंत्र्याचा स्वैराचार कधी होईल हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. घरातील संवादाचं महत्त्व माहितीय, पण करिअरच्या वेगात संवाद लांबच राहतोय. मग कधी कधी अति मोकळीक किंवा अति लाड होतात. हे असं का होतंय त्याचा आपणच शोध घ्यायला हवा. यासंदर्भात डॉ. लता काटदरे सांगतात की, आज मुलांना घरच्यांपेक्षा बाहेरच्यांचा विश्वास अधिक वाटतो ही गंभीर बाब आहे. आज त्या दोन्ही पिढीत मुली घरच्यांऐवजी बाहेरच्यांची बाजू घेताना दिसतात. आई-वडील आणि मुलं यांचं आज काय नातं आहे हे तपासावं लागेल. मी माझ्या पालकांना सर्व काही सांगू शकतो, असा किती मुलांना-मुलींना विश्वास आहे, असे प्रश्न त्यानिमित्ताने अभ्यासावे लागतील असे त्या सांगतात.

मुलांना वाढवताना स्वातंत्र्याच्या व्याख्या, त्यांची स्पेस, स्त्री स्वातंत्र्य यामुळे अनेक वेळा त्यांना काही बोलायचेदेखील अवघड झाल्याचे   डॉ. काटदरे नमूद करतात. पण असं जरी असलं तरी आपण कसे जगतोय याचा विचार आपण करतो का? आपण काही अर्थपूर्ण जीवन जगतोय असं कधी मुलांना दिसते का? आधुनिक व्हायचे म्हणजे काय, आधुनिकपणाची व्याख्या काय? हे प्रश्न स्वत:ला पडायला हवेत.  तंत्रज्ञानानं आपल्या जगण्यात असंख्य बदल केले आहेत. पण आपलं शरीर आणि मूल्य हे तंत्रज्ञान बदलू शकणार नाही याची खात्री आपली आपल्यालाच असली पाहिजे याची जाण आज किती लोकांना आहे. पुढारलेपणाच्या नावाखाली सध्या सारा भर सादरीकरणावरच देताना दिसतो. मग हे पुढारलेपण म्हणजे सुसंस्कृतपणा की बॉलीवूडची कॉपी करणे? असे अनेक मुद्दे स्वत: पडताळून पाहणे गरजेचे आहे. आपल्या हातात काही नाही असं म्हणण्यापेक्षा आपलं शरीर आणि मूल्य ही कधीही बदलणार नाहीत. ती सांभाळणे हे आपल्या हातात असते. ते आपण कसे पुढे नेतो त्यावर सारं काही अवलंबून आहे.

या सर्वाच्या अनुषंगाने शिफू संक्रितीच्या उपद्व्यापाकडे पाहावे लागेल. आपल्या समाजरचनेत अशा गोष्टी अधूनमधून येत असतात. जागतिक पातळीवर पाहिले असता हिप्पी, बिटल्स असे प्रकार झाले आहेत. अमेरिकेत तर ७०च्या दशकात अशाच एका मोठय़ा समूहाने देव येणार अशा वेडगळ समजुतीपोटी सामूहिक आत्महत्या केली होती. या सर्व उपसंस्कृती म्हणाव्या लागतील. अशा उपसंस्कृती सर्वच समाजात तयार होत असतात. आपल्याकडे जातीपातींवर आधारित अशा अनेक उपसंस्कृती अस्तित्वात आहेत. याबद्दल डॉ. शेट्टी सांगतात की, काही उपसंस्कृती या मैत्रीपूर्ण, हितकारक असतात. तर काही अहितकारक. या उपसंस्कृतीतून होणारे नुकसान टाळण्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक अशा दोन्ही स्तरांवर काम करावे लागेल. वैयक्तिक स्तरावर योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. जागतिकीकरणात कुटुंबाचं पाठबळ कमी झालं आहे, पण वैद्यकीय मदत जी काही उपलब्ध आहे तिचा आधार घ्यावा लागेल. तर सामूहिक स्तरावर आपल्या गल्लीतील, इमारतीतील अशी कोणतीही व्यक्ती जाणवल्यास तिच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. जी काही उपलब्ध व्यवस्था तिला हलवणे गरजेचे आहे. तिचा वापर करणे गरजेचे आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिफूचा सध्या माहीत असलेला विस्तार हा तुलनेने मर्यादित आहे. पण सातआठ महिन्यांच्या कालावधीत ज्या वेगाने आणि तीव्रतेने सुनील कुलकर्णीने हा विस्तार केलाय ते पाहता त्याचे गांभीर्य वाढते. डॉ. हरीश शेट्टी या अनुषंगाने पुढे सांगतात की, शिफू संक्रिती हा आपल्या समाजातील आजार नाही तर आपल्या समाजाच्या ‘डिसकनेक्शन सिंड्रोम’चे लक्षण आहे. जेव्हा तुमचा संवाद संपतो, तुम्ही समाजापासून तुटता तेव्हा पुन्हा हा संवाद जोडताना नेमका राँग नंबर लागतो. समाजातील निरोगी धागे नाहीसे झाले की असे विकृत धागे जोडले जाते.

थोडक्यात काय तर शिफूसारखे प्रकार टाळायचे असतील, तर आपल्यालाच समर्थ व्हावे लागेल. अन्यथा शिफूच्या बुरख्याआडचे असे  विकृत धागे वारंवार जोडले जातील आणि आपण केवळ सुनील कुलकर्णीसारख्यांना दोष देण्यात धन्यता मानत राहू.

04-lp-shifuनेमके काय घडले?

डिसेंबर २०१६ मध्ये मुंबईतील मालाड येथील सनदी लेखापाल सुळे यांनी पोलिसांकडे तक्रार केली की आमच्या मुली घरं सोडून निघून गेल्या आहेत. थोरली मुलगी एका विधी महाविद्यालयात शिकत आहे, तर धाकटी वास्तूरचना महाविद्यालयात. मात्र थोरल्या मुलीने विधी महाविद्यालयातील एक मानद व्याख्याता व मानसोपचारतज्ज्ञ व्यक्तीच्या प्रभावाने इव्हेंट मॅनेजमेंट या विषयात शिक्षण घेण्याचे ठरवले. विधी महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण होत असतानाच तिचा हा निर्णय पालकांसाठी अनाकलनीय होता. तिच्या हालचाली पालकांना संशयास्पद वाटू लागल्या. त्यानंतर ती घर सोडून निघून गेली. काही दिवसांनी ती घरी आली आणि धाकटय़ा बहिणीलादेखील सोबत घेऊन गेली. दरम्यान पालकांनी संबंधित व्यक्तीची माहिती मिळवली असता ही व्यक्ती उपनगरात एका उच्चभ्रू रेस्ताँरामध्ये अनेक तरुणींसोबत बसत असून या तरुणींचा अमली पदार्थाच्या तस्करीसाठी व उच्चभ्रू सोसायटीतील वेश्या व्यवसायासाठी वापर केला जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. तसेच या व्यक्तीवर दिल्लीत बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याचेदेखील त्यांना समजले. आपल्या मुली या व्यक्तीच्या म्हणजेच सुनील कुलकर्णीच्या प्रभावाखाली असल्याचे त्यांना लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पण दोन्ही मुली सज्ञान असल्यामुळे त्यावर काही कारवाई करता येणार नाही, अशी पोलिसांनी मखलाशी केली. त्यानंतर सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची भेट घेऊन त्यांना सर्व परिस्थिती कथन केली. आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला. पण त्यानंतरदेखील तीन महिन्यांत या तपासात कसलीच प्रगती झाली नाही. त्यामुळे सुळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने मात्र प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस खात्यावर ताशेरे तर ओढलेच, पण तातडीने आणि गांभीर्याने तपास करण्याचे आदेश दिले.

दरम्यान सुळे भगिनींनी मुंबईला मरिन ड्राइव्हवर गांधीगिरीचा मार्ग अवलंबला होता. आम्ही अमली पदार्थ घेत नाही, आम्ही शरीरविक्रय करणाऱ्यापैकी नाही, आमच्या पालकांनीच आमचा छळ केला आहे, आम्हाला न्याय हवा आहे, असे फलक घेऊन त्या मरिन ड्राइव्हला उभ्या राहिल्या.

न्यायालयाच्या आदेशानंतर एका दिवसात पोलिसांनी सुनील कुलकर्णी याची चौकशी केली असता त्याच्याकडील वैद्यकशास्त्राची प्रमाणपत्रे बनावट असल्याचे आढळले. तसेच त्याच्या मोबाइलमध्ये अनेक तरुणींची नग्न छायाचित्रे, चोरून चित्रित केलेली संभोग दृश्ये सापडली. त्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी सुनील कुलकर्णीला अटक केली.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com