दूरचित्रवाणी पत्रकार हमीद मीर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेप्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी महत्त्वाची माहिती देणाऱ्यांना १ कोटी रुपयांचे इनाम देण्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केली. शिवाय या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय न्यायालयीन आयोगही स्थापला जाईल, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे, की सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना या हल्ल्याच्या चौकशीसाठी तीन न्यायाधीशांची नावे सुचवण्याची विनंती करण्यात येईल.  
हमीद मीर (वय ४७) यांच्यावर कराची येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. त्यांना पायावर गोळ्या लागल्या. कराची विमानतळावरून ते कार्यालयाकडे निघाले असता नथा खान पुलाजवळून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून तीन तास शस्त्रक्रिया करण्यात आली.
त्यांच्या हल्लेखोरांबाबत माहिती देणाऱ्यास सरकारने १ कोटी रुपयांचे इनाम सरकारने जाहीर केले आहे.
माहितीमंत्री परवेझ रशीद यांनी मीर यांची रुग्णालयात भेट घेतली त्यांनी सांगितले, की सरकार देशातील लोकशाही मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. मीर यांच्यावरील हल्ल्याच्या चौकशीची जबाबदारी सिंध सरकारवर आहे. तरीही पाकिस्तान सरकार प्रादेशिक सरकारला चौकशीत मदत करील. मीर यांच्या भावाने असा आरोप केला, की आयएसआयच्या लोकांनी हा हल्ला घडवून आणला पण लष्कराने या आरोपाचा इन्कार केला आहे.