केंद्रीय गृहमंत्रालयानं एकूण ४२ राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. त्यात काँग्रेसच्या १५ नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेस नेते अजय माकन, गुजरात काँग्रेसचे नेते अर्जुन मोढवाडिया, शशी थरुर, श्रीप्रकाश जयस्वाल यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांना वाय (-) दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

केंद्र सरकारनं गुप्तचर यंत्रणांकडून सुरक्षेसंदर्भात आढावा घेतल्यानंतर सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या १५ नेत्यांबरोबरच राज्यसभेचे खासदार राजीव शुक्ला यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर काँग्रेसच्याच गिरिजा व्यास, प्रिया रंजन दासमुन्शी आणि आरपीएन सिंह यांच्यासह आठ नेत्यांची एक्स दर्जाची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे.

व्हीआयपी सुरक्षा कुणाला?

प्रतिष्ठित व्यक्ती अथवा एखाद्या राजकीय नेत्याच्या जीवाला धोका असल्यास त्याला केंद्र सरकारकडून सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात येते. संबंधित व्यक्ती याबाबत सरकारकडे अर्ज करतात. त्यानंतर सरकारकडून गुप्तचर यंत्रणांकडून आढावा घेऊन खरोखरच या व्यक्तींच्या सुरक्षेला धोका आहे का याची खात्री करून घेतली जाते. धोका असल्यास त्यांना सुरक्षा दिली जाते. कोणत्या व्यक्तीला कोणत्या दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली जावी, याचा निर्णय गृह सचिव, महासंचालक आणि मुख्य सचिव यांची समिती घेते. पोलिसांसह एसपीजी, एनएसजी, आयटीबीपी, सीआरपीएफ, सीआएसएफ आदी सुरक्षा यंत्रणांकडून व्हीआयपी, व्हीव्हीआयपी सुरक्षा कवच दिलं जातं. विशेष व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी एनएसजीच्या जवानांवर असते. पण झेड प्लस सुरक्षा दिल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत वाढ झाल्यास सीआयएसएफवरही जबाबदारी सोपवली जाते. सध्याच्या घडीला एनएसजीकडून १४ व्यक्तींना झेड प्लस सुरक्षा पुरवली जाते.