खेळादरम्यान दोघांचा मृत्यू, एका आंदोलकाचा अंत; उद्घाटन न करताच मुख्यमंत्री माघारी

तामिळनाडूने अध्यादेश काढूनही जलिकट्टचा तिढा कायम आहे. ‘कायमस्वरूपी तोडगा’ काढण्याच्या मागणीसाठी रविवारी सलग सहाव्या दिवशी तामिळनाडूत आंदोलन सुरू असून, एकाचा आंदोलनादरम्यान, तर दोघांचा जलिकट्ट खेळादरम्यान मृत्यू झाला. दुसरीकडे मदुराईतील अलंगनल्लूरमध्ये जलिकट्ट खेळाचे उद्घाटन करण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांना आंदोलनामुळे उद्घाटन न करताच चेन्नईला परतावे लागले.

जलिकट्टला परवानगी देणारा अध्यादेश काढल्यानंतर अलंगनल्लूरमध्ये रविवारी या खेळाचे उद्घाटन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी शनिवारी जाहीर केले होते. त्यानुसार ते मदुराईत आले खरे; पण ‘कायमस्वरूपी तोडगा’ काढल्याशिवाय जलिकट्टचे आयोजन करण्यात येणार नाही, अशी ताठर भूमिका अलंगनल्लूरमधील आंदोलकांनी घेतली. यामुळे उद्घाटन न करताच मुख्यमंत्री माघारी परतले. पन्नीरसेल्वम हे नाथम कोविलपट्टीमध्येही जलिकट्टचे उद्घाटन करणार होते, मात्र तिथेही आंदोलन सुरू आहे.    तामिळनाडूच्या काही भागांत हा खेळ आयोजित करण्यात आला असला तरी आंदोलनाची तीव्रता कायम आहे. पुदुकोट्टाईमध्ये या खेळाने दोघांचा बळी घेतला, तर मदुराईत आंदोलन करणाऱ्या चंद्रमोहन (४८) यांचा मृत्यू झाला. जलिकट्ट आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या मरिना बीचवर रविवारीही मोठय़ा संख्येने आंदोलक जमले होते. जलिकट्टवर ‘कायमस्वरूपी तोडगा’ काढण्याबरोबरच ‘पेटा’ या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी आंदोलक करीत आहेत. राज्याच्या इतर भागांतही हीच भूमिका घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत.

जलिकट्टवरील बंदी पूर्णपणे उठली आहे. जलिकट्टसाठी राज्याने जारी केलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात विधेयक मांडण्यात येणार आहे.   – ओ. पन्नीरसेल्वम, मुख्यमंत्री, तामिळनाडू

द्रमुकसह विरोधकांचे केंद्राला साकडे

जलिकट्टसाठी आंदोलन सुरूच असल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. विरोधकांनी केंद्राकडे साकडे घातले आहे. दरवर्षी जलिकट्ट खेळ कोणत्याही अडचणीशिवाय आयोजित करता येईल, यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी द्रमुकसह विरोधकांनी केंद्राकडे केली आहे.