डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरुमित राम रहीम सिंग यांच्यावर सुरू असलेल्या बलात्काराच्या खटल्याचा उद्या (शुक्रवार) पंचकुला सीबीआय न्यायालयात निकाल लागणार आहे. निकालानंतर हिंसाचार उसळण्याची शक्यता असल्याने हरियाणा आणि पंजाबमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. हरियाणाच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. मोठ्यासंख्येने निमलष्करी दल तैनात करण्यात आले असून लष्करालाही अलर्ट ठेवण्यात आले आहे. या दोन्ही राज्याला छावणीचे रूप आले आहे. दरम्यान, उत्तर रेल्वेने गुरूवारी ६ आणि शुक्रवारी पंजाब व हरियाणाकडे जाणाऱ्या २२ रेल्वे रद्द केल्या आहेत. सुमारे ७१ तास येथील रेल्वे सेवा बंद राहणार आहे. या निकालावर केंद्र सरकारचेही लक्ष असून गृहमंत्रालयाने आज बैठक घेऊन परिस्थिती जाणून घेतली. दरम्यान, राम रहीम यांनीही ट्विट करून समर्थकांना शांत राहण्याचे अपील केले आहे. पाठ दुखत असली तरी आपण न्यायालयात जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. राम रहीम यांच्यावर त्यांच्या आश्रमातील दोन साध्वींवर १६ वर्षांपूर्वी बलात्कार केल्याच्या आरोपाखाली खटला सुरू होता. दरम्यान ७२ तासांसाठी हरियाणा व पंजाबमधील मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हरियाणा सरकारने डेरा समर्थकांना समजवण्याची सर्व मंत्र्यांना जबाबदारी दिली आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सर्व मंत्र्यांना आणि आमदारांना उद्या आपापल्या मतदारासंघात राहण्याचा सल्ला दिला आहे. सरकार सध्या मोबाइल इंटरनेट सेवेवर बंदी घालून सोशल मीडियावरून होणाऱ्या अफवांवर नियंत्रण ठेवण्याचा विचार करत आहे. गुरमीत राम रहीम यांचे सुमारे २ लाखांहून अधिक अनुयायी पंचकुला आणि दोन्ही राज्य आणि आजूबाजूच्या परिसरात निकालाअाधीच पोहोचले आहेत. निकालाच्या पार्श्वभूमीवर हरियाणामध्ये तीन दिवसांसाठी काही शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे.

न्यायालयानेही पंजाब आणि हरियाणा सरकारला सुरक्षेसाठी अतिरिक्त कुमक तैनात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जाट आंदोलना वेळी निर्माण परिस्थिती पुन्हा उद्धभवू  नये त्यासाठी आधीच परिस्थिती नियंत्रणात आणा, असे न्यायालयाने म्हटले आहे.