आयआयटी कानपूरमध्ये याच वर्षी एम.टेक. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या तारापूरच्या मोहीत नावाच्या अवघ्या २३ वर्षीय विद्यार्थ्यांचा शनिवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा, अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे.
शनिवारी संध्याकाळी तब्बल दोन तास क्रिकेट खेळून मोहीत आपल्या खोलीत विश्रांतीसाठी गेला. त्यानंतर काही वेळाने त्याचे मित्र त्याच्या खोलीत पोहोचले तेव्हा मोहीत बेशुद्धावस्थेत सापडला. तिथून मोहीतला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले.
त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. म्हणून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता प्रा. ए. के. घोष यांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र मोहीतच्या मृत्यूमुळे या प्रकरणास आता वेगळे वळण लागण्याची चिन्हे आहेत.