काश्मीरमध्ये लष्करी तळावर पुन्हा धुमश्चक्री, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी गुरुवारी उत्तर काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्य़ातील एका लष्करी तळावर शिरून केलेल्या हल्ल्यात सैन्याच्या एका कॅप्टनसह दोन सैनिक शहीद झाले. यानंतर सुमारे ३५ मिनिटे झालेल्या भीषण धुमश्चक्रीत दोन हल्लेखोर मारले गेले.

या चकमकीनंतर लगेच जमावाने सुरक्षा दलांवर दगडफेक सुरू केली. यावेळी झालेल्या संघर्षांत एक वृद्ध नागरिक गोळी लागून मरण पावला. काळ्या रंगाचा पठाणी सूट आणि लढाऊ जाकीट घातलेले तीन दहशतवादी पहाटे ४ वाजताच्या सुमारास कूपवाडा जिल्ह्य़ातील पंझगाम येथे असलेल्या लष्करी गॅरिसनच्या तोफखाना युनिटमध्ये घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पर्वतीय भागात वसलेल्या आणि विस्तीर्ण भागात पसरलेल्या या तळाच्या सुरक्षा व्यवस्थेची दुसरी फळी पार करण्यात ते यशस्वी ठरले, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीत सांगितले.

लष्कराच्या क्विक रिस्पॉन्स पथकाने (क्यूआरटी) आक्रमण करताच दहशतवादी पळू लागले. यावेळी दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले, तर तिसरा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. ही संपूर्ण मोहीम ३५ मिनिटे चालली, असे कर्नल सौरभ यांनी कूपवाडा येथे सांगितले.

सैन्याने नंतर घटनास्थळावरून ३ एके रायफली जप्त केल्या. यावरून तिसरा दहशतवादीही तेथे होता हे स्पष्ट झाले असून, त्याच्या शोधासाठी मोहीम सुरू असल्याचे ते म्हणाले.

स्थानिकांची सैनिकांवर दगडफेक

ही चकमक संपताच, ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आपल्याकडे सोपवावेत अशी मागणी करत स्थानिक रहिवाशांनी निषेधार्थ निदर्शने सुरू केली. महिला आणि वयोवृद्ध यांचा समावेश असलेल्या निदर्शकांनी निदर्शनांचा जोर वाढवूनही सैनिकांनी त्यांची मागणी पूर्ण केली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

दगडफेक करणारा जमाव आणि सुरक्षा दलांचे जवान यांच्यातील चकमकीत मोहम्मद युसुफ भट हा छातीत गोळी लागून जखमी झाला आणि कूपवाडय़ाच्या रुग्णालयात मरण पावला. सुरक्षा दलांच्या गोळीबारात त्याचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

काय घडले

अंदाधुंद गोळीबार करत दहशतवादी तळावरील अधिकाऱ्यांच्या निवास संकुलाकडे निघाले. सुमारे १ हजार सैन्य कर्मचाऱ्यांचे निवासस्थान असलेले हे संकुल पाकिस्तानसोबतच्या नियंत्रण रेषेपासून सुमारे १० किलोमीटरवर आहे. सैनिकांनी हल्लेखोरांवर आक्रमण करून त्यांना तळाच्या प्रवेशद्वारांपैकी एका दाराकडे जाण्यास भाग पाडले. दोन्ही बाजूंनी झालेल्या भीषण गोळीबारात कॅप्टन आयुष यादव, सुभेदार भूपसिंग गुज्जर व नायक बी. वेंकटरमण हे तिघे शहीद झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या पाच जवानांना श्रीनगरच्या बेस रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे.