बॉम्बस्फोटाने मोटार उडवून देत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध
सीरियासाठी पाश्चिमात्य देशांमध्ये हेरगिरी करण्याचा आरोप असलेल्या तिघाजणांना अवघ्या चार वर्षे वयाचा एक ब्रिटिश मुलगा कार बॉम्बस्फोटाने उडवून देत असल्याचा व्हिडीओ इस्लामिक स्टेटने (आयसिस) प्रसिद्ध केला आहे.
इस्लामिक स्टेटने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओतील मुलगा हा लंडनच्या नैर्ऋत्य भागात राहणाऱ्या आणि धर्मातर करून मुसलमान झालेल्या ग्रेस ‘खादिजा’ डेअर हिचा मुलगा असल्याचे मानले जात आहे. २०१२ साली पळून सीरियात गेलेल्या खादिजाने स्वीडन येथील अतिरेकी लढवय्या अबु बकर याच्याशी लग्न केले होते. अबु बकर हा नंतर मारला गेल्याचे सांगितले जाते.
‘इसा डेअर’ नावाच्या या मुलाची ओळख त्याचे आजोबा हेन्री डेअर यांनी पटवली. आयसिसने महिनाभरापूर्वी जारी केलेल्या प्रचारकी व्हिडीओमध्येही तो दिसला होता, असे वृत्त ‘दि इंडिपेंडंट’ने दिले आहे.
आयसिसची ओळख असलेले आवरणबद्ध कपडे घातलेला आणि काळ्या रंगाचा हेडबँड बांधलेला हा मुलगा एका डिटोनेटवर हात ठेवून उभा असल्याचे ताज्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
त्याने डिटोनेटरचा स्फोट करण्यापूर्वी नारिंगी रंगाचे कपडे घातलेल्या तीन कैद्यांना कारला बांधून ठेवल्याचे दिसत आहे.
चेहरा झाकून घेतलेला आणि ब्रिटिश उच्चार असलेला एक इसम ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांना धमकी देत असल्याचे व्हिडीओमध्ये चित्रित करण्यात आले आहे. कारच्या स्फोटाने हा व्हिडीओ संपतो.