नुकतेच झालेले दहशतवादी हल्ले व बहिष्काराच्या धमक्यांना न जुमानता काश्मिरी जनतेने विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. १६ जागांसाठी शांततेत ५८ टक्के मतदान झाले. बडगाव, पुलवामा व बारामुल्ला या जिल्ह्य़ांमधील १६ जागांसाठी हे मतदान झाले. कडाक्याच्या थंडीतही मतदारांच्या रांगा होत्या. मंगळवारच्या मतदानात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला व मुख्यमंत्री अब्दुल रहीम राथेर यांचे भवितव्य निश्चित झाले. गुलमर्ग येथे काही समाजकंटकांनी मतदान केंद्रावर पेट्रोलबॉम्ब फेकला. हा अपवाद वगळता मतदान शांततेत झाले.  मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत या ठिकाणी केवळ ४९ टक्केच मतदान झाले होते. त्यामुळे त्या तुलनेत हे प्रमाण ९ टक्क्यांनी वाढले.
    झारखंडमध्ये ६० टक्के
झारखंड विधानसभेच्या १७ जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात ६०.८९ टक्के मतदान झाले. सिल्ली मतदारसंघात सर्वाधिक ७४.७७ टक्के मतदान झाले. तर रांचीत सर्वात कमी ४४.४४ टक्के मतदान झाले.