मणिपूरच्या विधान सभेमध्ये भूमिपुत्रांच्या संरक्षणासाठी नवीन विधेयके संमत केल्याने उपऱ्या ठरलेल्या नागरिकांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यामध्ये पाच जण ठार झाले असून २७ जण जखमी झाले आहेत. आंदोलकांनी पोलीस ठाण्यालाही लक्ष्य केले आहे. चुडाचंद्रपूर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या १२ तासांच्या बंदला सोमवारी सायंकाळी हिंसक वळण लागले. या वेळी संतप्त जमावाने मणिपूरच्या कुटुंब कल्याण मंत्र्यासह पाच आमदारांची घरे जाळली. या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागल्याचे समजते. दरम्यान, मृत आंदोलकांपैकी तिघांना  गोळ्या लागल्याचे समोर आले आहे. तर जखमींपैकी २० जणांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळीही काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. खासदार थांग्सो बैते, मंत्री फुंग्झफांग तोन्सिम्ग व इतर पाच आमदारांची घरे जाळण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मणिपूरमध्ये १९५१ पूर्वीपासून राहणाऱ्या नागरिकांना मालमत्तेचे हक्क देण्याबाबतची विधेयके सोमवारी मणिपूर विधान सभेमध्ये संमत
करण्यात आली. याला १९५१ नंतर आलेल्या नागरिकांनी विरोध दर्शविला होता. यासाठी तीन विद्यार्थी संघटनांनी १२ तासांचा बंद पुकारला होता.