मध्यप्रदेशातील ‘व्यापम’ घोटाळ्याप्रमाणे बिहारमधील ‘सृजन’ घोटाळ्यातील एका आरोपीचा तुरुंगात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. बिहार सरकारच्या कल्याण विभागाचा अधिकारी महेश मंडल याचा रविवारी मध्यरात्री तुरुंगातच मृत्यू झाला. भागलपुरचे पोलिस अधीक्षक मनोजकुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मंडल किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘सृजन’ या स्वयंसेवी संस्थेच्या खात्यात सरकारी निधीचे झालेले हस्तांतरण पाहून २००८मधील येथील जिल्हाधिकारी विपीन कुमार यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्यानंतर या एनजीओकडे देण्यात आलेले काम तत्काळ थांबवण्याचे आदेश त्यांनी दिले. याप्रकरणी आत्तापर्यंत १८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये ११ सरकारी अधिकाऱ्यांचा तर ४ सृजन महिला विकास सहयोग समिती लिमिटेडच्या आणि ३ बँकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

बिहारच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आरोपी महेश मंडल याला त्याच्या गावातील आलिशान बंगल्यातून ताब्यात घेतले होते. तेव्हापासूनच त्याची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली होती. मात्र, त्यानंतर एसआयटीने त्याची कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती बाहेर आली त्यानुसार, कल्याण अधिकारी अरुणकुमार गुप्ता यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर पोलिस आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला या दोघांनी अनेक बड्या अधिकाऱ्यांची आणि घोटाळेबाजांची नावे सांगितली होती.

दरम्यान, महेश मंडलला तुरुंगात पाठवण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती ठीक होती. मात्र, पोलीस अधीक्षकांच्या मते, त्याला पूर्वीपेक्षा गंभीर आजार होता. तसेच वर्षातून तीन वेळेला त्याला डायलिसिसची गरज भासत होती. त्यामुळे रात्री अचानक त्याची प्रकृती खूपच बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला. हे खरे वाटत असले तरी, पोलिसांचा जबाबावर नागरिकांचा विश्वास नाही. मात्र, याप्रकरणी मंडलचा शवविच्छेदन अहवाल आल्यांनतरच खरी माहिती समोर येऊ शकणार आहे.

या प्रकरणात ‘सृजन’ महिला सहयोग समितीने सरकारी विभाग आणि दोन बँकेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरत घोटाळ्याचा कट रचला होता. त्याद्वारे ८८४ कोटी रूपयांचा चुना सरकारला लावण्यात आला होता. अशाच पद्धतीचे आणखी प्रकार उघड होण्याची शक्यता आहे. कारण बिहार सरकारच्या इतरही काही विभागांचे लेखापरिक्षण करण्यात येत आहे. सृजनचे धागेदोरे झारखंडच्या रांचीपर्यंत पोहोचले आहेत. सृजनच्या संस्थापक मनोरमा देवी आणि त्यांची सून प्रियाकुमार यांचे माहेर रांची हेच आहे.

दरम्यान, प्रिया कुमारच सृजनच्या सचिव असून सध्या फरार आहे. त्यांचे वडिल काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळे या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसही निशाण्यावर आहे. रांचीतील काँग्रेसचे एक बडे नेतेही यात अडकल्याचे सांगण्यात येत आहे.