देशात ९१ प्रमुख धरणे ही क्षमतेच्या ३८ टक्के भरली आहेत. गेल्या वर्षी याच काळात ती २२ टक्के भरलेली होती, असे केंद्रीय जलसंपत्ती विकास मंत्रालयाने म्हटले आहे. महाराष्ट्रातील धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या याच काळातील साठय़ापेक्षा कमी पाणीसाठा आहे. ४ फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार प्रमुख धरणातील पाणी साठा ५९.३३५ अब्ज घनमीटर आहे. या धरणांची एकूण क्षमता १५७.७९९ अब्ज घनफूट आहे. सध्याचा साठा दहा वर्षांंच्या या काळातील सरासरीच्या ७६ टक्के आहे.
हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, त्रिपुरा या राज्यात पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगला आहे, तर आंध्र-तेलंगण भागात तो गेल्या वर्षीइतकाच आहे. गेल्यावर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असलेल्या राज्यात पंजाब, राजस्थान, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक व केरळ यांचा समावेश आहे