विविध व्याघ्र अभयारण्यातील ५९ वाघांना रेडिओ कॉलर लावण्यात आल्या आहेत व त्यामुळे त्यांची सगळी माहिती टिपली जात असते. व्याघ्र संवर्धनासाठी त्याचा उपयोग होईल अशी माहिती सरकारने मंगळवारी दिली.

लोकसभेत पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले, की मध्य प्रदेशातील ३५ व राजस्थानातील १४ वाघांना रेडिओ कॉलर्स लावण्यात आल्या आहेत. रेडिओ कॉलर्सची किंमत ही त्याचा वापर कुठल्या कारणासाठी होणार आहे यावर अवलंबून असते. व्हीएचएफ रेडिओ कॉलरच्या बॅटरीचे आयुष्य चार वर्षे असते. त्यांची किंमत नगाला २५ ते ३० हजार रुपये असते. प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांचे संवर्धन करण्यासाठी त्यांचा उपयोग असतो. रेडिओ कॉलर जर जीपीएस, व्हीएचएफ, यूएचएफ व इतर सुविधांनी युक्त असेल तर त्याची किंमत ३ ते ४.५० लाख रुपये असते ते संशोधन कार्याशीही निगडित असू शकते. व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने अजून वाघांना रेडिओ कॉलर्स लावण्याने काही हानी होते की नाही याचा अभ्यास केलेला नाही. पन्ना व सारिस्कामधील व्याघ्र प्रकल्पात ज्या वाघिणी आहेत  त्यांना रेडिओ कॉलर्स लावलेल्या आहेत व त्यांना काही अपाय झालेला नाही. रेडिओ कॉलर्सच्या माध्यमातून जी माहिती मिळते त्यातून वाघांच्या संवर्धनात फायदा होतो असे त्यांनी सांगितले.