दोन विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूसमान शिक्षकाचा भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना दिल्लीत घडली आहे. सततच्या गैरहजेरीमुळे निलंबित करण्यात आलेल्या बारावीतील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी मित्रांच्या सहाय्याने शिक्षकाचा भोसकून खून केला. दिल्लीतील नांगलोई येथील सरकारी शाळेत सोमवारी ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी सुमारे १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुकेश कुमार असे मृत शिक्षकाचे नाव आहे.
दिल्लीतील नांगलोई येथील सरकारी शाळेत बारावीमध्ये शिकत असलेले दोन विद्यार्थी वारंवार गैरहजर राहत असत. याबाबत मुकेश कुमार यांनी दोघांना यापूर्वी समज दिली होती. परंतु, तरीही गैरहजेरीचे प्रमाण जास्त असल्यामुळे मुकेश कुमार यांनी त्यातील एकाला निलंबित तर एकाला ताकीद दिली होती. त्याचा राग मनात धरून या दोघांनी वर्गात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसमोरच आपल्या इतर मित्रांसह त्यांना धारदार शस्त्राने भोसकले. यात गंभीर जखमी होऊन शिक्षकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले असून तपास केला जात आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. पेपर संपल्यानंतर शिक्षक मुकेश कुमार हे विद्यार्थ्यांकडून उत्तरपत्रिका घेत होते. त्याचवेळी अचानक हे या विद्यार्थ्यांनी मुकेश कुमार यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला व ते पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या मुकेश कुमार यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मंगळवारी सकाळी संतप्त शिक्षकांनी शाळेबाहेर आंदोलन करत या घटनेचा निषेध केला. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मृत शिक्षक मुकेश कुमार यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे.
गत आठवडयात पुण्यातील विद्याविलास मंडळ या शैक्षणिक संस्थाचालकाच्या मुलीने एका गेस्ट लेक्चररला चपलेने मारहाण केल्याची घटना घडली होती. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरु असलेल्या वादामधून हा प्रकार घडल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनी पोलीस चौकीवर मोर्चा काढून या मुलीवर कारवाईची मागणी केली होती.