केंद्र सरकारतर्फे मिळणाऱ्या प्रत्येक सोयी-सुविधेसाठी आता आधारकार्डची आवश्यकता असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ अनुदानच किंवा सुविधाच नव्हे तर ड्रायव्हिंग लायसन्स ( वाहन परवाना) मिळवण्यासाठी किंवा तुमच्या जवळ ते असेल तर त्याच्या नूतनीकरणासाठी आधारकार्डाची आवश्यकता असेल असे वाहतूक विभागाने सांगितले आहे. नूतनीकरणासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. ते नसल्यास नोंदणी करावी आणि तो क्रमांक वाहतूक विभागाला द्यावा असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. याआधी केंद्र सरकारने विविध सुविधांवर आधारकार्ड अत्यावश्यक आहे असे सांगितले होते. सुरुवातीला, शाळेतील मुलांजवळ आधारकार्ड असेल तरच माध्यान्ह भोजन मिळेल असे सरकारने सांगितले होते. त्यानंतर नव्या गॅस कनेक्शनसाठी आधारकार्ड अनिवार्य असेल सांगण्यात आले होते.

तसेच त्यानंतर मोबाइल नंबर हे आधारकार्डासोबत जोडून घ्यावेत असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक सुविधेसाठी आधारकार्ड असणे अनिवार्य झाल्याचे दिसत आहे.  यापुढे सरकारने दिलेल्या सवलतीचा किंवा सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर आधारकार्ड अनिवार्य असेल असे केंद्र  सरकारने म्हटले आहे. परंतु, आधारकार्ड नसेल तर कोणत्याही सेवेपासून कुणीही वंचित राहणार नाही असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे. आधारकार्ड नोंदणी केली असेल तर त्या पावतीच्या आधारेही सर्व सेवांचा लाभ मिळेल असे सरकारने म्हटले आहे. याआधी, सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर आधारकार्ड असणे आवश्यक आहे असे महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने म्हटले होते. या विधानाचा अर्थ काही जणांनी असा घेतला की ज्यांच्याजवळ आधारकार्ड नाही त्यांना सेवा दिली जाणार नाही.

परंतु कुणालाही कोणत्या सेवेपासून वंचित ठेवले जाणार नाही असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे. त्याचबरोबर ज्यांच्याजवळ आधारकार्ड नाही त्यांनी त्वरित अर्ज करावा असे देखील त्यांनी म्हटले आहे. दारिद्र्य रेषेखाली असलेल्या महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन हवे असेल तर त्यांच्याकडे आधारकार्ड असणे अनिवार्य राहील अशी घोषणा केंद्र सरकारने केली होती. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमार्फत पाच कोटी महिलांना एलपीजी कनेक्शन देण्यात येईल असे सरकारने जाहीर केले होते. तीन वर्षांच्या कालावधीमध्ये पाच कोटी महिलांना गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे. ज्या लोकांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांच्याकडे आधारकार्ड असणे अनिवार्य राहील असे पेट्रोलियम मंत्रालयाने म्हटले आहे. ज्या महिलांकडे आधारकार्ड नाही त्यांनी ३१ मे अगोदर अर्ज करावा असे त्यांनी म्हटले. जर आधारकार्डासाठी अर्ज केला तर या योजनेचा लाभ घेता येईल.