बायोमॅट्रिक तंत्रज्ञानात सुधारणेबरोबरच त्याच्या अंमलबजावणीत भारत जगात अव्वल ठरला आहे. भारतात आपली सत्यता पडताळण्यासाठी डोळ्यांचा वापर करण्याचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत तिप्पट असल्याचे ‘एचसबीसी’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. भारतात हे प्रमाण ९ टक्के तर इतर देशांत ते तीन टक्क्यांवर आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत पाश्चात्य देशांच्या तुलनेत आशिया आणि पश्चिम अाशियातील देश आघाडीवर आहेत. कारण तंत्रज्ञानाबाबत त्यांची समज चांगली आहे आणि याबाबत ते अत्यंत सकारात्मक असतात, असेही या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल ११ देशांतील १२,०१९ लोकांच्या प्रतिक्रियेवरून तयार करण्यात आला आहे. यामध्ये कॅनाडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, हाँगकाँग, भारत, मेक्सिको, सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन आणि अमेरिकेचा समावेश आहे. सरकारही तंत्रज्ञानाचा मोठ्याप्रमाणात प्रसार करताना दिसत असल्याचे यात म्हटले आहे.

भारत सरकारने २००९ मध्ये ‘आधार’ योजना सुरू केली होती. हा जगातील सर्वांत मोठा बायोमॅट्रिक संग्रहण कार्यक्रम होता. बोटांच्या ठशांचे तंत्रज्ञान वापरण्यामध्ये चीन (४० टक्के) आघाडीवर आहे. त्यानंतर भारताचा (३१ टक्के) व संयुक्त अरब अमिरातचा (२५ टक्के) क्रमांक लागतो. बायोमॅट्रिक तंत्रज्ञानात ओळख पटवण्यासाठी त्या व्यक्तीच्या शरीरातील विविध अवयवांच्या डाटाचा उपयोग केला जातो. यामध्ये बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅनिंग आणि रक्ताच्या डीएनएचा समावेश होतो.

सरकारने आपल्या विविध योजना अंमलात आणण्यासाठी ‘आधार’ अनिवार्य केले आहे.