पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. आप सरकारने कामांची माहिती देण्यासाठी केलेल्या जाहिरांतीवर तब्बल ५२६ कोटी रूपये खर्च केले असून यातील १०० कोटींचा हिशेब त्यांनी दिला नसल्याचे भारताचे नियंत्रक महालेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालातून समोर आली आहे. विशेष म्हणजे केजरीवाल यांनी दिल्लीतील कायदा सुव्यवस्था बिघडण्यास केंद्र सरकारला जबाबदार धरत त्यावर ७० लाख रूपये खर्च केल्याचे उजेडात आले आहे. दिल्ली सरकारने टीव्हीवरील जाहिरातीसाठी जनतेच्या पैशाचा गैरवापर केल्याचे कॅगने आपल्या ५५ पानी अहवालात नमूद केल्याचे एनडीटीव्ही दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
कॅगने आपल्या अहवालात केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीत आप सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मोठ्याप्रमाणात जाहिराती करण्यात आल्या होत्या. केजरीवाल यांनी त्यावेळी आपच्या जाहिरातीसाठी ३३.४ कोटी रूपये खर्च केले असून त्यातील ८५ टक्के रक्कम ही दिल्ली बाहेर खर्च केली आहे.
एका जाहिरातीत एक व्यक्ती झाडू दाखवताना दिसते. झाडू हे आपचे निवडणूक चिन्ह आहे. हे राज्य सरकारने केलेल्या कामाची जाहिरात नसून पक्षाचा प्रचार असल्याचे कॅगने म्हटले आहे. जाहिरातीत राज्य सरकारची उपलब्धी ही केजरीवाल यांच्या वैयक्तिक प्रयत्नांमुळे झाले असल्याचे दाखवण्यात आले आहे. विरोधी पक्षांनीही केजरीवाल सरकारवर यापूर्वी आरोप केले आहेत.