दिल्लीतील आणि देशाच्या राजकीय पटलावरील बहुचर्चित आम आदमी पार्टी पक्षाच्या आणखी एका आमदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नरेला भागातील ‘आप’च्या शरद चौहान यांना एका महिलेच्या आत्महत्येप्रकरणी अटक केली आहे. शनिवारी रात्री उशीरा शरद चौहान यांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळाली आहे. सदर प्रकरणात दिल्ली पोलिसातील उप पोलीस निरीक्षकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
‘आप’च्या महिला समर्थक सोनी यांच्या आत्महत्या प्रकरणी कारवाई दरम्यान गेले काही दिवस तपास सुरु असतानाच आता शरद चौहान यांच्यासह आणखी सात जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आत्महत्येपूर्वी सोनी यांच्यासोबत छेडछाडीची घटना घडल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केल्याचे उघड झाले आहे. सोनी यांनी प्रसारमाध्यमांसमोर काही व्यक्तिंवर टिका करत रमेश भारद्वाज यांच्यावर शारिरीक संबंधासाठी बळजबरी करण्याचा आरोपही लावला होता.