मागील जून महिन्यात अफगाणिस्तानात झालेल्या निवडणुकीचा आता पुरता विचका झाला आहे.
या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार झाल्याच्या आरोपांनंतर मतदान प्रक्रियेची व मतपत्रिकांची पाहणी करण्याचा घाट घालण्यात आला होता. परंतु हा ‘पुनर्तपास’ म्हणजे निव्वळ विनोद आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत या निवडणुकीतील प्रमुख उमेदवार अब्दुल्ला अब्दुल्ला त्यातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानातील संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच धोक्यात येण्याची चिन्हे असून परिणामी अफगाणिस्तानात पुन्हा नव्याने वांशिक हिंसाचाराचाही धोका उभा ठाकत आहे.
जूनमध्ये झालेल्या निवडणुकीतील गैरप्रकारांमुळे मतदान प्रक्रियेत अडथळा येऊन ती ठप्प झाली होती. त्यावर उपाय म्हणून नेमका गैरप्रकार काय झाला हे शोधण्यासाठी मतपत्रिकांची तपासणी करण्याचा उपाय सुचविण्यात आला. त्यानुसार सुमारे ८० लाख मतपत्रिकांची तपासणी करण्यास सुरुवात झाली. परंतु मतपत्रिकांची तपासणी करण्याची प्रक्रिया म्हणजे निव्वळ विनोद आहे, असा आरोप अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी केला.
हा आरोप करीत त्यांनी बुधवारी या प्रक्रियेवर बहिष्कारच टाकला. आम्ही आज या प्रक्रियेत सहभागी होणार नाही आणि कदाचित पुन्हा सहभागी होणारच नाही, असा इशारा त्यांच्या प्रतिनिधीने दिला.
दरम्यान, अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्या या पवित्र्यामुळे अफगाणिस्तानातील निवडणूक प्रक्रियाच धोक्यात आली आहे. त्याचबरोबर तेथे पुन्हा मोठय़ा प्रमाणावर वांशिक हिंसाचार उसळण्याचाही धोका निर्माण झाला आहे. १९९०च्या दशकातील यादवीसारखीच स्थिती पुन्हा उद्भवण्याची ही चिन्हे असल्याचे बोलले जात आहे.
या निवडणुकीतील दोन प्रमुख प्रतिस्पर्धी अब्दुल्ला अब्दुल्ला आणि अश्रफ घनी यांच्या समर्थकांमध्ये घमासान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी हमीद करझाई यांचे चुलतभावाची एका मानवी बॉम्बच्या मदतीने हत्या घडवून आणण्यात आली होती.
पराभव दिसू लागल्याने खुसपट
अश्रफ घनी यांचे समर्थक प्रामुख्याने पश्तून असून अफगाणिस्तानच्या दक्षिण आणि पूर्व भागांत त्यांचे प्राबल्य आहे, तर अब्दुल्लांना ताजिक आणि उत्तर भागातील अन्य टोळ्यांचा पाठिंबा आहे. अब्दुल्ला यांना आपला पराभव दिसत असल्यानेच त्यांनी हे खुसपट काढले आहे, असा आरोप घनी यांच्या गटाकडून केला जात आहे.