भारताला १२ व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर पुरवणाऱ्या ‘ऑगस्टा वेस्टलँड’ या इंग्लिश-इटालियन कंपनीच्या कारभाराची चौकशी ब्रिटनमध्येही होण्याची शक्यता आहे.
१२ हेलिकॉप्टर पुरवण्याचा ४८ कोटी पौंड रकमेचा व्यवहार व्हावा यासाठी ‘ऑगस्टा-वेस्टलँड’ची मातृकंपनी असलेल्या ‘फिन्मेकॅनिका’ या कंपनीने भारतातील काही वरिष्ठ सेनाधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप आहे. या आरोपावरून भारताने मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये हा व्यवहार प्रथम स्थगित केला तर यंदा जानेवारी महिन्यात तो रद्द केला. या आरोपांची चौकशी सध्या इटलीमध्ये सुरू आहे. मात्र ऑगस्टा – वेस्टलँड ही कंपनी इंग्लिश- इटालियन आहे. या व्यवहारामध्ये ब्रिटिश लाचप्रतिबंधक कायद्याचा भंग झाला आहे का, या अनुषंगाने इटालीमधील चौकशीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे ब्रिटिश परराष्ट्रखात्यातर्फे सांगण्यात आले. आम्ही ऑगस्टा-वेस्टलँडविरोधात तपास सुरू केलेला नाही मात्र आम्ही इटलीतील तपासावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले. फिन्मेकॅनिकाने या व्यवहारातील मध्यस्थाला तब्बल २ कोटी ५४ लाख पौंडाची लाच दिल्याचा आरोप असून त्यापायी फिन्मेकॅनिकाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अटक झाली आहे. मात्र आपण कोणताही गैरव्यवहार केलेला नाही, असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे.

गोव्याच्या राज्यपालांना पदावरून हटविण्यास राष्ट्रवादीचा विरोध
 पणजीगोव्याचे राज्यपाल बी. व्ही. वांछू यांना पदावरून हटविण्याची मागणी गोवा भाजपने केली असली तरी त्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यात वांछू यांचा संबंध असल्याचे सीबीआयकडून जोपर्यंत स्पष्ट  होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.वांछू यांना राजीनामा देण्यास का सांगावे, केवळ सीबीआयने त्यांची चौकशी केली म्हणून, सीबीआयने प्रथम त्यांच्याविरुद्ध पुरावे द्यावे आणि त्यानंतरच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करता येईल, असे गोवा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रोजानो डीमेलो यांनी म्हटले आहे. वांछू यांच्या राजीनाम्याची मागणी करून भाजप राजकीय खेळी खेळत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी खरेदी करण्यात आलेल्या हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी सीबीआयने वांछू यांची चौकशी केली. त्यामुळे गोवा भाजपने राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली. वांछू यांची या प्रकरणात साक्षीदार म्हणून चौकशी करण्याचा सीबीआयचा हेतू आहे.