भारताच्या सरकारी उद्योगक्षेत्रातला ‘महाराजा’ म्हणवल्या जाणाऱ्या एअर इंडियाने ५७ कॅबिन कर्मचाऱ्यांना त्याचं वजन वाढल्याचं कारण देत ग्राऊंड ड्यूटी दिली आहे. या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यात वजन कमी करा असा इशारा देत एअर इंडियाने ही कारवाई केली आहे. तीन महिन्यात या कर्मचाऱ्यांनी आपलं वजन कमी केलं नाही तर ग्राऊंड ड्यूटीसाठी त्यांची रवानगी होऊ शकते. कॅबिन क्रू पेक्षा ग्राऊंड स्टाफचा पगार ३५ ते ५० हजारांनी कमी असतो. या कर्मचाऱ्यांचा बाॅडी मास इंडेक्स म्हणजेच बीएमआय जास्त झाल्याचं आढळल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं एअर इंडियाने म्हटलंय.

वजन वाढल्याचं कारण देत कर्मचाऱ्यांना केबिन ड्यूटीवरून काढायची एअर इंडियाची ही पहिली वेळ नाहीये. याआधीही यासारखे प्रकार झाले आहेत. याविरूध्द अनेक कर्मचारी कोर्टात गेले आहेत आणि कोर्टाने एअर इंडियाच्या विरोधात निर्णयही दिले आहेत.

डीजीसीएच्या नियमानुसार पुरूष केबिन कर्मचाऱ्यांचा बीएमआय १८ ते २५ दरम्यान असावा तर महिला कर्मचाऱ्यांचा बीएमआय १८ ते २३ दरम्यान असावा. याच्यापुढे बीएमआय असणाऱ्यांचं वजन वाढलं आहे असा जाहीर करत अनेकदा विमान कंपन्यांकडून त्यांना ग्राऊंड स्टाफमध्ये पाठवलं जातं. यावेळी कारवाई झालेल्या केबिन कर्मचाऱ्यांचा बीएमआय ३० पेक्षा जास्त असल्याचं एअर इंडियाकडून सांगण्यात आलं.

केबिन क्रूमध्ये काम करणाऱ्या पुरूष आणि महिला कर्मचाऱ्यांनी रूबाबदार दिसणं अपेक्षित असणं. पण एअर इंडियाकडून आपल्या कर्मचाऱ्यांवर अनेकदा वजन वाढल्याचं कारण देत कारवाई केली गेली आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेनुसार एअर इंडिया जगातली तिसरी सर्वात वाईट विमानसेवा ठरली आहे. एअर इंडियाची विमान लेट होण्यासाठी प्रसिध्द आहेत. विमानामधल्या स्वच्छतेबाबतही प्रवाशांकडून अनेकदा तक्रारी येतात. या पार्श्वभूमीवर आपला कारभार सुधारण्याकडे लक्ष देण्यापेक्षा कर्मचाऱ्यांवर वजनाचं कारण देत सरसकट कारवाई करणं किती योग्य आहे असा प्रश्न विचारला जातोय.

कॅबिन क्रू कर्मचाऱ्यांनी रूबाबदार दिसण्याची किमान अपेक्षा एखाद्या विमानकंपनीने ठेवणं रास्त आहे. पण मुळात या कर्मचाऱ्याचं काम प्रवाशांच्या देखभालीचं आहे तसंच संकटाच्या काळात परिस्थिती हाताळणं हे आहे. अशा वेळी आपल्या सेवेच्या दर्जा उंचावण्याकडे लक्ष पुरवणं एअर इंडियासाठी जास्त महत्त्वाचं आहे.