दलित हे भारतातील मुळ रहिवासी आहेत. आर्यसंस्कृतीशी नाते सांगणारे ब्राम्हण आणि इतर उच्च दर्जाच्या जातीतील लोक हे भारताबाहेरून आले आहेत. तसेच दलित जातीमध्ये मुस्लिमांचा समावेश करण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध होता. आग्रा शहरातील दलित मतदारांना संघ परिवाराकडून सध्या अशाप्रकारचे इतिहासाचे धडे गुप्तपणे शिकवले जात आहेत. दलितांसाठी राखीव असलेल्या आग्रा मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी संघपरिवाराकडून अशाप्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. सन २००९मध्ये ब्रिजप्रदेश नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पट्ट्यातील आठ मतदारसंघांपैकी आग्रा मतदारसंघाची एकमेव जागा निसटत्या फरकाने जिंकण्यात भाजपला यश आले होते. या मतदारसंघातील विद्यमान खासदार शंकर कथेरिया हे दलित समाजातील धनुक या जातीचे प्रतिनिधित्व करतात. तर दुसरीकडे या मतदारसंघात मायवतींच्या बहुजन समाज पक्षाचा पारंपारिक मतदार असणाऱ्या जटाव जातीच्या मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे.
तसेच या मतदारसंघात असणारा लाखांपेक्षा जास्त संख्येने असणारा मुस्लिम मतदार समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि बसपा यांच्यात विभागला गेला आहे. मात्र, नरेंद्र मोदींची मुस्लिमविरोधी प्रतिमा बघता येथील मु्स्लिम मतदार बसपच्या नारायण सिंह यांच्या नेतृत्वाखाली एकटवला आहे. त्यामुळे आग्रा मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी जटाव मतदारांवर भाजपची मोठी मदार आहे. यासाठी जटाव मतदारांच्या वस्तीत जाऊन द्रविड आणि दलित हे भारताचे मूळ रहिवासी असल्याचा प्रचार सध्या संघाकडून सुरू आहे. डॉ. आंबेडकरांची मुस्लिमविरोधी प्रतिमा तयार करून दलित मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न संघ परिवाराकडून होताना दिसत आहे. भाजपच्या पारड्यात दलित मतांचे दान आणून टाकण्याची मुख्य जबाबदारी या मतदारसंघातून पूर्वी खासदार राहिलेले केशव मेहरा यांच्यावर सोपविण्यात आली आहे.