‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लिबिया’ (इसिल) या दहशतवादी संघटनेकडून ओलीस ठेवण्यात आलेल्या ‘येझिदी’ या अल्पसंख्याक समुदायाच्या हजारो नागरिकांची सुटका करण्यासाठी अमेरिकेने आणखी १३० लष्करी जवान उत्तर इराकमध्ये पाठवले आहेत. अध्यक्ष बराक ओबामा यांनी तशी मंजुरी अमेरिकन लष्काराला दिली.
संरक्षणमंत्री चक हेगेल यांच्या शिफारशीनंतर ओबामा यांनी लष्कराला हा हंगामी अधिकार बहाल केला आहे. इराकमध्ये दाखल होणाऱ्या अमेरिकन तुकडय़ांमध्ये नौदल आणि विशेष मोहीम दलातील जवानांचा समावेश आहे. उत्तर इराकमधील सिंजार पर्वत रांगांमध्ये ‘इसिल’चे वर्चस्व आहे. गेल्या आठवडय़ात ‘इसिल’चे दहशतवादी इर्बिल शहराकडे कूच करत असल्याच्या माहितीनंतर अमेरिकन लष्कराने त्यांच्यावर हवाई हल्ले केले होते. अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी ‘इसिल’च्या रणगाडय़ांवर थेट हल्ला चढवला होता.
त्यामुळे या प्रांतातील नागरिक हल्ल्यांपासून स्वत:चा बचाव करण्याच्या प्रयत्नात पर्वतीय प्रदेशात अडकले होते. त्यानंतर दहशतवाद्यांकडून त्यांना ओलीस ठेवण्यात आले होते, अशी माहिती संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.