एका २४ वर्षांच्या एमबीएच्या विद्यार्थ्याने एका किडनी रॅकेटचा पर्दाफाश केलाय. पुण्यामध्ये सिंबायसिसमध्ये एमबीए करत असलेल्या एका विद्यार्थ्याने स्वत:चा जीव धोक्यात घालत दिल्लीमधल्या किडनी रॅकेटर्सना त्याने पकडून दिलं आहे. जयदीप शर्मा असं या तरूणाचं नाव आहे.
जयदीपचा एक मित्र अचानक गायब झाला आणि परत येताच किडनी विकण्याचं गुणगान गाऊ लागला तेव्हा तो एका किडनी रॅकेटमध्ये अडकला असल्याचं जयदीपच्या लक्षात आलं त्यातून त्याने या रॅकेटचा पर्दाफाश करायचं ठरवलं. हे काम प्रचंड धोक्याचं होतं. कारण अतिशय नफ्याच्या असणाऱ्या या किडनी मार्केटमधले नफेखोर त्याच्या जिवावरही उठू शकत होते. पण तरीही त्याने हा धोका पत्करायचं ठरवलं. त्याने दिल्लीमधल्या किडनी विकायला मदत करणाऱ्या काही एजंट्सचा पत्ता लावणं सुरू केलं. बऱ्याच प्रयत्नांनी त्याने अशा एजंटचा पत्ता शोधला आणि त्याच्याशी संपर्क साधला. यानंतर त्याने त्या एजंटशी बोलून आपण किडनी विकायला उत्सुक असल्याचं त्यांने सांगितलं.

हे सगळं करत असताना त्याने एका स्थानिक टीव्हीवाहिनीला याविषयी सांगितलं होतं. आपलं ‘सावज’ आपल्या तावडीत योग्य पध्दतीने सापडलं आहे की नाही याविषयी खात्री करून घेँण्यासाठी त्या एजंटने जयदीपसोबत अनेक ‘मीटिंग्ज’ केल्या. नियमांनुसार पेशंटच्या जवळच्या व्यक्तीची किडनी दान करता येते. त्यामुळे आंध्र प्रदेशातल्या एका किडनी पेशंटचा जवळचा नातेवाईक भासवण्यासाठी त्याच्या नावे खोटी कागदपत्रं तयार करण्याचं काम त्या एजंटने सुरू केलं. आपल्या हातात एक चांगलं ‘गिऱ्हाईक’ सापडलं असल्याच्या आनंदात तो किडनी एजंट होता खरा. पण या सगळ्या प्रकाराचं व्हिडिओ चित्रण होत असल्याचं त्याच्या गावीही नव्हतं. स्थानिक वृत्तवाहिनीच्या मदतीने हे होत होतं.

शेवटी ऑपरेशनचा दिवस उजाडला. या ऑपरेशनने जयदीपची किडनी काढून घेण्यात येणार होती. पण ऑपरेशनच्या एक तास आधी त्या चॅनलन पोलिसांना दिलेल्या टिपनुसार दिल्ली पोलिसांच्या एका टीमने त्या ‘बत्रा हॉस्पिटल’ वर छापा टाकत जयदीपची सुटका केली आणि त्या रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या सगळ्यांना रंगेहात पकडलं