चालत्या बसमध्ये २३ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने अस्वस्थ झालेल्या सर्वसामान्यांच्या मनातील संतापाचा उद्रेक आज दिल्लीच्या रस्त्यांवर पुन्हा उफाळून आला. पीडित मुलीला न्याय मिळावा म्हणून आज संतप्त महिला व मुलींचा रोष आज थेट राष्ट्रपती भवनावरच थडकला. सुरक्षा कर्मचाऱ्यांना न जुमानता स्वाती नावाच्या मुलीने राष्ट्रपती भवनात शिरण्यातही यश मिळविले. गेल्या अनेक वर्षांत राष्ट्रपती भवनाची सुरक्षा प्रथमच भेदली गेली. सामूहिक बलात्काराची बळी ठरलेल्या तरुणीवर उपचार सुरू असलेल्या सफदरजंग इस्पितळापुढेही आज निदर्शने करण्यात आली.
रविवारच्या बलात्काराच्या घटनेविषयी देशातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात रोष आहे आणि तो असायलाही हवा. बलात्काराविरुद्ध कठोर कायदा करण्याची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान, प्रसिद्धी माध्यमांनी आम्हाला बोलण्यासाठी गळ घालू नये, असे आवाहन बलात्काराची बळी ठरलेल्या तरुणीच्या आप्तांनी केले आहे.
गुरुवारी संसदेचे हिवाळी अधिवेशन संपताच इंडिया गेटच्या आसपास शिथिल झालेल्या सुरक्षा व्यवस्थेला गुंगारा देत निदर्शकांनी अतिसंवेदनशील आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या रायसीना हिल्सवर पोहोचून आपल्या उग्र संतापाची झलक पेश करीत थेट राष्ट्रपती भवनाचीच सुरक्षा भेदली. शुक्रवारी दुपारी वायडब्लूसीए, एनएफआयडब्लू, एआयडीडब्लूए आणि जेएनयूएसयू यासारख्या विविध महिला संघटनांच्या नेतृत्वाखाली महिला व तरुणींनी राजपथपासून मोर्चा काढून रायसीना हिल्सवरच कूच केली. बलात्काऱ्यांना फाशी द्या, अशी मागणी निदर्शक महिला करीत होत्या. त्यांच्या अकस्मात आक्रमणामुळे राष्ट्रपती भवन, पंतप्रधानांचे कार्यालय, गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि वित्त मंत्रालय असलेले नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकसमोरच्या सुरक्षारक्षकांची भंबेरी उडाली आणि मंत्रालयांमध्ये गेलेल्या व्हीव्हीआयपींना बाहेर पडणे अवघड झाले आणि विजय चौकातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. निदर्शकांच्या गर्दीने नॉर्थ ब्लॉकमध्ये पोहोचलेले पश्चिम बंगालचे राज्यपाल एम. के. नारायणन यांचीही गाडी रोखली. राष्ट्रपती भवनापुढे जोरदार घोषणाबाजी करून निदर्शक इंडिया गेटकडे रवाना झाले. दिवसभरात आम आदमी पार्टीचे प्रमुख अरिवद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जंतरमंतर येथे बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदविला. इंडिया गेटपाशी गटागटाने पोहोचणाऱ्या निदर्शकांनी सुरक्षा व्यवस्थेची कसोटीच पाहिली. सफदरजंग इस्पितळापुढे निदर्शकांनी घोषणा देत रस्त्यावरची वाहतूक ठप्प केली. सायंकाळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानापुढेही निदर्शने करण्यात आली.