पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला. ही घटना गुरूवारी सकाळी आरएस पुरा आणि अर्निया सेक्टर येथे घडली. मृत जवानाचे नाव जितेंद्र कुमार असून तो बिहारचा आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात सहा स्थानिक नागरिकही जखमी झाले आहेत.
भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची ही ३० वी वेळ आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात आतापर्यंत एक बीएसएफचा जवान आणि सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

आरएस पुरा आणि अर्निया येथे बुधवारी रात्रीपासून गोळीबार सुरू आहे. सुमारे २० किलोमीटरपर्यंत गोळीबार आणि उखळी तोफांच्या मारांचा आवाज येत होता. आतापर्यंत पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

सुरक्षा दलाने या भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. परिसरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. परंतु येथील शेतकऱ्यांची मोठी समस्या झाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक काढता येत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सुरू असलेल्या गोळीबारामुळे नागरी भागाचेही नुकसान झाले आहे.