एरवी रेल्वेगाडीतील अनारक्षित सामान्य श्रेणीचा डबा म्हणजे तुटलेले बाक, नादुरुस्त पंखे, मिणमिणत्या प्रकाशाचे दिवे असे चित्र असते. मात्र आता कुशनयुक्त खुच्र्या, अ‍ॅल्युमिनियमचे कंपोझिट पॅनल व एलईडी दिवे यांनी युक्त असलेली ‘अंत्योदय एक्स्प्रेस’ ही सामान्य लोकांसाठी असलेली नवी संपूर्णपणे अनारक्षित गाडी सुरू होत असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी तिचे अनावरण केले.

खास करून तयार करण्यात आलेले रंगीत डबे असलेली ही गाडी वर्दळीच्या मार्गावर चालवली जाणार आहे. पहिली अंत्योदय एक्स्प्रेस मुंबई ते टाटानगर आणि दुसरी गाडी एर्नाकुलम व हावडादरम्यान धावणार आहे.

चार प्रकारच्या नव्या प्रवासी गाडय़ा सुरू करण्याची घोषणा आम्ही रेल्वे अर्थसंकल्पात केली होती. यापैकी हमसफर एक्स्प्रेस सुरू झाली असून आता अंत्योदय सुरू होत आहे, असे नव्या रंगसंगतीसह तयार झालेल्या नव्या सामान्य श्रेणींच्या डब्यांची पाहणी केल्यानंतर प्रभू यांनी सांगितले. या डब्यांमध्ये वॉटर प्युरिफायर, मोबाइल फोनसाठी चार्जिग पॉइंट्स आणि अग्निशमन उपकरणे यांसारख्या अनेक सोयी आहेत. ‘अंत्योदय’ ही ‘आम आदमी’करिता (सामान्य माणूस) असलेली गाडी आहे. तिच्या डब्यांमध्ये देण्यात आलेल्या सोयी प्रथम श्रेणीच्या डब्यासारख्या आहेत. सामान्य माणूस हा आमच्या सरकारचा केंद्रबिंदू असल्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी अनेक सोयींनी युक्त अशी ही गाडी सुरू केली, असे प्रभू म्हणाले.

अंत्योदय एक्स्प्रेसच्या भाडेरचनेबद्दल विचारले असता, त्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असे रेल्वेमंत्री म्हणाले; तथापि या नव्या अनारक्षित गाडीचे भाडे मेल/एक्स्प्रेस गाडय़ांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याचे कळते.