दगडफेकीपासून वाचण्यासाठी तरुणाला जीपच्या समोर बांधून नेणाऱ्या मेजर नितीन गोगोई यांना भारतीय सैन्याने सन्मानित केले आहे. घुसखोरीविरोधी मोहिमांमध्ये सातत्यपूर्ण प्रयत्नांसाठी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी मेजर नितीन गोगोई यांना प्रशंसनीय सेवेचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

जम्मू काश्मीरमधील श्रीनगर मतदारसंघात गेल्या महिन्यात पोटनिवडणुकीदरम्यान सैन्याच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती. बडगाम जिल्ह्यात दगडफेकीपासून बचाव करण्यासाठी जवानांनी लष्करी जीपच्या पुढील भागावर एका युवकाला बांधून नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावरुन टीका सुरु होताच मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी राज्य पोलिसांकडून सविस्तर अहवाल मागवला. लष्करानेही या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू केली होती. सैन्याने चौकशीनंतर या घटनेत सहभागी असलेले मेजर गोगोई यांना क्लिन चीट दिली होती.

भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल बिपीन रावत हे काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये गेले होते. या दौऱ्यात त्यांनी मेजर गोगोई यांना घुसखोरीविरोधी मोहिमांमध्ये सातत्यपूर्ण प्रयत्नांसाठी प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. सोमवारी सैन्याचे प्रवक्ते अमन आनंद यांनी ही माहिती दिली.

गेल्या महिन्यात जीपच्या समोर एका काश्मिरी तरुणाला बांधल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.  जमावाने ताफ्यावर दगडफेक करु नये यासाठी त्याला बांधण्यात आले होते. ‘दगडफेक करणाऱ्यांचे असे हाल केले जातील’ असे इशारा दिला जात असल्याचे या व्हिडीओत दिसत होते. या तरुणाचा वापर ढाल म्हणून करण्यात आला होता. निवडणूक पथकाला ४०० च्या जमावाने घेरले होते. अशा परिस्थितीत तिथून निघण्यासाठी सुरक्षा दलांना नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला होता असा दावा सैन्याकडून केला जात होता. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीदेखील या घटनेवर नाराजी व्यक्त करत चौकशीची मागणी केली होती.

लष्कराच्या जीपला बांधलेल्या तरुणाचे नाव समोर आले होते. फारुख अहमद दार असे या तरुणाचे नाव असून २६ वर्षीय फारुखने तो दगडफेकीत सहभागी नव्हता असा दावा केला होता. मी दगडफेक करत नव्हतो. मी कारपेंटर असल्याचे त्यांनी म्हटले होते. मी याप्रकरणात तक्रार दाखल करणार नाही. आम्ही गरीब असून तक्रार करुन काय मिळणार असा उद्विग्न प्रश्न त्याने विचारला होता.