मुख्यमंत्री ओमेन चंडी यांचा आरोप
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘ऑर्गनायझर’ या मुखपत्राच्या दिवाळी विशेषांकातील एका लेखात केरळच्या लोकांचा अपमान करण्यात आला असून त्याबाबत बिनशर्त माफी मागावी असे केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी म्हटले आहे. या विशेषांकातील लेखात केरळविषयी गरळ ओकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
‘ऑर्गनायझर’च्या संपादक मंडळाला लिहिलेल्या पत्रात चंडी यांनी म्हटले आहे की, एम. सुरेंद्र नाथ यांच्या ‘गॉडस् ओन कंट्री ऑर गॉडलेस कंट्री’ या लेखात केरळबाबत वादग्रस्त विधाने केली आहेत. या नियतकालिकातील लेखात केरळ आणि इतरत्र असलेल्या मल्याळी लोकांचा अपमान केला आहे, मल्याळी म्हणून मला अभिमानच आहे, केरळचा मुख्यमंत्री म्हणून लोकांचा आत्मसन्मान राखणे, हे माझे काम आहे, ‘ऑर्गनायझर’मधील लेखात केरळ आणि मल्याळी लोकांचा अपमान केला आहे. दिवाळी विशेषांकात हा लेख प्रसिद्ध व्हावा हे दुर्दैवी आहे. देशातील असहिष्णुतेबाबत राष्ट्रपतींनी चारदा इशारा दिला असून देशात तशा अनेक घटना घडल्या आहेत, केरळला समाजसुधारक श्री नारायण गुरू यांचा वारसा आहे. त्यांनी जात व वंश पद्धतीला विरोध केला आहे. सहिष्णुता हा मल्याळी मानसिकतेचा अविभाज्य भाग आहे, सातव्या शतकातील हिंदू सत्ताधारी चेरामन पेरूमल यांनी भारतातील पहिली मशीद बांधण्यासाठी जमीन दिली होती, असे ते म्हणाले.