जपानमधल्या अपंग सहाय्य केंद्रावर गुरूवारी पहाटे झालेल्या चाकू हल्ल्यात १९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. यातल्या २० जणांची प्रकृती अधिक गंभीर आहे. जपान शहराची राजधानी असलेल्या टोकियो शहरापासून ५० किलोमीटर लांब असलेल्या सागामिहारा शहरातील अपंग केंद्रात हा हल्ला झाला आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण जपान हादरले आहे. पहाटे अडीचच्या सुमारास हे हत्याकांड घडले.
या हत्याकांडानंतर हल्लेखोराने दोन तासांनी पोलीस स्टेशनमध्ये शरणागती पत्करली. ज्या चाकूने खून केला तो चाकू गाडीत ठेवून पोलीस स्टेशनमध्ये त्याने शरणागती पत्करली. या हल्लेखोराचे वय २६ च्या आसपास सांगितले जात आहे. या केंद्रात तो फेब्रुवारीपर्यंत काम करत असल्याची कबुलीही त्याने पोलिसांना दिली. रात्री २ च्या सुमारास हातोडीने केंद्राच्या खिडक्या तोडून हा हल्लेखोर केंद्राच्या इमारतीत शिरला. या केंद्रातील सगळेच यावेळी गाढ झोपेत होते. गाढ झोपेत असलेल्या अनेकांना त्याने चाकूने भोकसले, तर जे बचावले त्यांची प्रकृती गंभीर आहे. इथल्या कर्मचा-याने हत्याकांडाची माहिती पोलिसांना दिली. हल्ल्याची माहिती समजताच पोलीस केंद्राच्या बाहेर तातडीने दाखल झाले. जपानच्या एका स्थानिक वृत्त वाहिनीच्या माहितीनुसार या हल्लेखोराला कामावरून काढून टाकले होते या रागातूनच त्याने हा हल्ला केल्याचे समजते, परंतु पोलिसांनी या वृत्तला अधिकृत दुजोरा दिला नाही. या अपंग केंद्रात जवळपास १५० हून अधिक अपंग राहतात.
जपानमधले कायदे कडक आहेत त्यामुळे अशा हल्ल्याचे प्रमाण इथे फार क्वचितच घडते. अपंग केंद्रात झालेल्या या हत्याकांडामुळे संपूर्ण जपान शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आधी २००८ मध्ये एका माथेफिरू ट्रक चालकाने १८ जणांना आपल्या ट्रकखाली चिरडले होते. त्यानंतरचे हे मोठे हत्याकांड आहे.