भारताविरुद्ध सतत वेगवेगळ्या कारवाया करून खोटेनाटे आरोप करण्यात पुढे असलेल्या पाकिस्तानने शुक्रवारी आणखी एक पाऊल पुढे टाकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ यांच्या धूर्त चालींना आता पाकिस्तानी लोक ओळखू लागले असल्याचा आरोप पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी केला. गिलगिटमध्ये चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्राशी संबंधित एका परिसंवादात राहिल शरीफ सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केल्याचे ‘डॉन न्यूज’ने म्हटले आहे.
राहिल शरीफ म्हणाले, देशाच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी आतापर्यंतच्या मर्यादा ओलांडून पुढे गेले पाहिजे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असू दे की त्यांची गुप्तचर संस्था रॉ किंवा आणखी कोणीही असू दे. त्यांच्याकडून खेळण्यात येणाऱ्या धूर्त चालींना आम्ही ओळखतो. पाकिस्तानविरुद्ध रचण्यात येणारी कारस्थानेही आम्हाला माहिती आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
याच भाषणामध्ये त्यांनी दहशतवादी आणि भ्रष्ट व्यक्तींचे जाळे उखडून टाकले पाहिजे. त्याचबरोबर देशवासियांना चोख सुरक्षा पुरविण्यात आली पाहिजे, असेही सांगितले. पाकिस्तानातील दहशतवाद उखडून टाकण्यासाठी तेथील लष्कराने आतापर्यंत जे प्रयत्न केले आहेत. ते इतर कोणत्याही देशातील लष्कराने केले नसतील. दहशतवाद्यांविरोधात गेल्यावर्षी सुरू करण्यात आलेली कारवाई योग्य दिशेने पुढे जात असल्याचा विश्वासही त्यांनी उपस्थितांना दिला.