बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि प्रमुख विरोधी पक्षनेत्या खलिदा झिया यांच्या याचिका बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळल्या. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत त्यांच्याविरुद्ध खटला सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्या दोषी ठरल्यास त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
सर्वोच्च न्यायालयाच्या अपिलीय विभागाने झिया यांच्या याचिका फेटाळल्याने आता त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपांचे खटले चालविण्यात कोणताही कायदेशीर अडसर नाही, असे डेप्युटी अ‍ॅटर्नी जनरल इक्रमुल हक तुतूल यांनी सांगितले.
मुख्य न्यायाधीश एम. मुझम्मील हुसेन यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या पीठाने उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला. भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत त्यांना कनिष्ठ न्यायालयात सुनावणीला सामोरे जावेच लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. एका अनाथालयाला खलिदा यांचे पती झिया-ऊर-रेहमान यांचे नाव देण्यात आले असून त्याबाबत खलिदा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत.
भ्रष्टाचारविरोधी आयोगाने २००९ मध्ये झिया अनाथालय ट्रस्ट भ्रष्टाचार खटला दाखल केला. बनावट ट्रस्ट स्थापन करून झिया यांनी मोठय़ा रकमेची अफरातफर केल्याबद्दल हा खटला दाखल करण्यात आला. तर सत्तेचा गैरवापर करून ट्रस्ट स्थापन केल्याप्रकरणी २०११ मध्ये खटला दाखल करण्यात आला. या दोन्ही खटल्यांमध्ये झिया यांचा पुत्र तारिक रेहमान आणि अन्य सात जण आरोपी आहेत. झिया आणि त्यांच्या पुत्राविरुद्धचे आरोप सिद्ध झाल्यास त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.