दिल्लीत एका महिलेला वाहतूक पोलीस अधिकाऱयाने दगड फेकून मारल्याप्रकरणाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर आता या प्रकरणाशी संबंधित एका ऑडिओ क्लिपमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या ऑडिओमध्ये महिलेनेच पोलीस अधिकाऱयाला अपशब्द वापरल्याचे समोर आले आहे. तसेच रमनजीत कौर ही महिला आपल्यासोबत गैरवर्तन करत असल्याची तक्रार देखील सर्वप्रथम वाहतूक पोलीस अधिकाऱयाने पोलीस नियंत्रण कक्षाला(पीसीआर) दुरध्वनी करून कळवल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तर, त्याच्या अवघ्या तीन मिनिटांनंतर रमनजीत कौरने देखील पीसीआरला दूरध्वनीकरून पोलीस अधिकाऱयाची तक्रार दाखल केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
या प्रकरणाचा समोर आलेला धक्कादायक व्हिडिओ-
दिल्लीच्या रस्त्यावर एका महिलेला वाहतूक पोलीस अधिकारी सतिश चंद याने दगड फेकून मारल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या प्रकरणी ताबडतोब सतिश चंद याला अटक देखील करण्यात आली. संबंधित वाहतूक पोलीस अधिकाऱयाने आपल्याला विनाकारण थांबवून आपल्याजवळ वाहतूकीचे नियम तोडल्याचे दाखवून २०० रुपयांची मागणी केली. ते देण्यास नकार दिल्यानंतर त्याने आपल्याशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली आणि आपल्यावर दगड भिरकावून दिल्याचा आरोप रमनजीत कौरने केला. मात्र, योगायोग असा की संबंधित प्रकरणाचा ऑडिओ सतिश चंद या अधिकाऱयाने पोलिसांकडे सुपूर्द केल्याने नवे वळण मिळाले आहे. महिलेकडे केवळ वाहन परवाना आणि कागदपत्रे दाखविण्याची मागणी करत असल्याचे या ऑडिओतून समोर येते. यामध्ये महिलेकडे २०० रुपये मागितल्याचा उल्लेख देखील समोर आलेला नाही. उलट महिलाच तेथून पळ काढण्याच्या प्रयत्नातून पोलीस अधिकाऱयाला अपशब्द वापरण्यास सुरूवात करत असल्याचे ऑडिओतून स्पष्ट होत आहे.
व्हिडिओनंतर पोलीस अधिकाऱयाने सुपूर्द केलेला ऑडिओ-