गणेशोत्सवापूर्वी इंदापूर-पनवेल महामार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याची सूचना केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. इंदापूर-पनवेल व इंदापूर-झारप महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. रुंदीकरणाचे काम पुढील वर्षभरात पूर्ण करा. त्यासाठी सर्वतोपरी साहय़ करण्याचे आश्वासन गडकरी यांनी या वेळी दिले.
अवघ्या दोन ते तीन गावांमध्ये जमीन अधिग्रहणात अडथळा आल्याने इंदापूर-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. रखडलेले जमीन अधिग्रहण पूर्ण करणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली. या रस्त्याच्या कडेला मोठी पाइपलाइन आहे. त्यामुळे विकासकामात अडथळा येत आहे. त्यावर तोडगा काढण्यावर फडणवीस व गडकरी यांच्यात चर्चा झाली. मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीसाठी लवकरात लवकर निविदा काढा, काम सुरू झाले की, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे अधिकारी त्याची पाहणी करतील, असे गडकरी म्हणाले.
इंदापूर-झारप महामार्गाचे दुरुस्तीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी यासंबंधी राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील कामाची पाहणी केली होती. दुरुस्तीच्या कामावर राज्य व केंद्र सरकार समाधानी नाही. त्यामुळे २०१६ पर्यंत रुंदीकरणाचे, तर गणेशोत्सवापूर्वी दुरुस्तीचे काम संपवा, अशी सूचना गडकरी यांनी फडणवीस यांना
केली.