नोटाबंदीनंतर सर्वसामान्य व्यक्तींना नवीन नोटा मिळवण्यासाठी बँका आणि एटीएमसमोरील रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे. तरीही त्यांच्या हाती केवळ काही हजारच रुपये लागतात. पण बंगळुरूमध्ये तब्बल ४ कोटी रुपयांच्या नवीन नोटा जप्त केल्या आहेत. आयकर विभागाने छापे टाकून दोघांकडून नवीन नोटा असलेली रोकड जप्त केलेली आहे.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघांकडून ४ कोटींची रोकड जप्त केलेली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जप्त केलेल्या रकमेतील नोटा नवीन आहेत. आयकर विभागाने त्याची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात बँक कर्मचारीही सामील असू शकतात, असे सांगितले जाते. त्यादृष्टीने आयकर विभागाने तपास सुरू केला आहे. चौकशीनंतरच यामागील सत्य समोर येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चेन्नई आणि तामिळनाडू पोलिसांनीही शनिवारी २०.५५ लाखांची रोकड पकडली होती. त्यात नवीन नोटा होत्या. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन देणाऱ्या भाजपच्या युवा नेत्याकडून ही रोकड जप्त करण्यात आली होती.

दरम्यान नव्या नोटा सापडल्याची ही पहिलीच घटना नाही. एका आठवड्यापूर्वी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिल्लीत हजरत निजामुद्दीन स्थानकाच्या बाहेर असलेल्या एका कारमधून २७ लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या होत्या. त्या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. जप्त कऱण्यात आलेल्या रकमेत २००० रुपयांच्या नव्या नोटाही होत्या. तसेच हरियाणातील पंचकुलामध्येही काही दिवसांपूर्वी ८ लाख रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.