भारत आणि चीनसोबतच्या दृढ संबंधांचा संदर्भ देत इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेत्यानाहू यांनी युरोपिन महासंघावर कडवड शब्दांमध्ये टीका केली आहे. युरोपिन महासंघाची इस्रायलविषयीची भूमिका चुकीची असून त्याचा फटका महासंघाला सहन करावा लागेल, असे नेत्यानाहू यांनी म्हटले. ‘युरोपिन महासंघ हा जगातील एकमेव असा समूह आहे, जो इस्रायलसोबत संबंध प्रस्थापित करताना अटी-शर्ती ठेवतो,’ अशा शब्दांमध्ये त्यांनी महासंघावर तोंडसुख घेतले. विशेष म्हणजे युरोपमधील ४ देशांच्या नेत्यांसोबतच्या एका बैठकीत नेत्यानाहू यांनी ही विधाने केली. मात्र यावेळी खोलीतील मायक्रोफोन सुरु असल्याने नेत्यानाहू यांची सारी विधाने खोलीबाहेर आली.

भारत आणि चीनसोबतच्या तंत्रज्ञानातील भागिदारीचा संदर्भ देत, ‘चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग इस्रायलला तंत्रज्ञान क्षेत्रातील तंत्रज्ञानातील राक्षस म्हणतात,’ असे नेत्यानाहू यांनी म्हटले. ‘चीन आणि भारतासोबत आमचे संबंध खूपच चांगले आहेत. हे दोन्ही देश राजनैतिक मुद्यांची तमा बाळगत नाहीत,’ असे म्हणत नेत्यानाहू यांनी मोदींच्या इस्रायल भेटीचादेखील उल्लेख केला. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत ओल्गा बीचवर असताना पंतप्रधान मोदींनी भारताच्या हितांची काळजी घेण्यास सांगितले. ‘मला जास्त पाण्याची, स्वच्छ पाण्याची आवश्यकता आहे. मी इतके स्वच्छ पाणी कोठून आणू ? रामल्लाहून आणू का ?’, असे मोदी यांनी ओल्गा बीचवर म्हटले होते, असे नेतान्याहू यांनी बैठकीत बोलताना म्हटले. बैठकीच्या खोलीतील मायक्रोफोन सुरु असल्याने नेत्यानाहू यांचे हे विधानदेखील खोलीबाहेर ऐकू आले.

इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी हंगेरी पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन, झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान बोहुस्लाव सोबोत्का, पोलंडचे पंतप्रधान बीटी जिडलो आणि स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी खोलीतील मायक्रोफोन सुरु होता. त्यामुळे नेतान्याहू यांचे सर्व बोलणे खोलीबाहेर ऐकू आले. ‘सध्याची जागतिक स्थिती अजब आहे. युरोपीय महासंघाकडून इस्रायलसोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठी अटी आणि शर्ती घातल्या जातात,’ असे म्हणत नेतान्याहू यांनी युरोपिय महासंघावर जोरदार टीका केली.