ब्रेग्झिटमुळे ब्रिटनला आर्थिक फटका बसणार असला तरी काही सट्टेबाजांनी त्यातून कमाईही केली आहे. ब्रेग्झिटनंतर सट्टेबाजांनी त्यांना मिळालेल्या पैशांची मोजदाद केली. ब्रेग्झिटचा निर्णय तसा अनपेक्षित होता यात शंका नाही. सट्टेबाजांनी लोक ब्रिटनमध्ये राहण्याच्या बाजूने कौल देतील यासाठी ८०-९० टक्के शक्यता वर्तवली होती व त्यालाच अनुकूलता दाखवली होती. त्यामुळे अनेकांनी ब्रेग्झिटच्या विरोधात पैसे लावले होते. लंडनच्या एका महिलेने प्रथमच ब्रिटन महासंघातच राहील या बाजूने १ लाख पौंड लावले होते, गुरुवारी रात्री मतदान संपले तेव्हा ब्रेग्झिटसाठी ४-१ असा सट्टा चालू होता.

लॅडब्रोकस येथील मॅथ्यू श्ॉडिक या सट्टेबाजाने सांगितले, की आम्हाला यात फायदा झाला यात शंका नाही, त्या दृष्टीने ब्रेग्झिट आम्हाला फायद्यात पडले. सट्टेबाजांनी ब्रेग्झिटच्या विरोधात जो कल दर्शवला होता त्यावर मात्र टीका झाल्याचे त्यांनी मान्य केले. जे लोक सट्टा लावतात ते सुस्थितीतील होते व त्यामुळे त्यांना ब्रिटन महासंघात राहील असेच वाटत होते, त्यामुळे ते हरले. बेटफेअरला गुरुवारी दुपापर्यंत ६० दशलक्ष पौंडाची कमाई झाली.

राजकीय घटनात बेटिंग होते पण इतकी कमाई कधी झाली नव्हती. सट्टेबाजांची कमाई झाली असली, तरी त्यांची प्रतिमा मात्र ढासळली आहे. आतापर्यंत त्यांनी एक्झिट पोलमध्ये बरोबर अंदाज दिले होते. युके इंडिपेंडन्स पार्टीचे निगेल फॅरेज यांनी १००० पौंडाची पैज जिंकली आहे.