उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचा (बसप) उडालेला धुव्वा आणि पक्षांतर्गत कलह वाढू लागल्याच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील ‘भीम आर्मी’ संघटनेचा राष्ट्रीय पातळीवर उदय झाल्याने बसप प्रमुख मायावती यांच्यासमोर मोठे राजकीय आव्हान उभे ठाकले आहे. विधानसभा निवडणुकीत फक्त १९ जागा मिळवून बसपा तिसऱ्या स्थानावर फेकल्याने पराभवाच्या गर्तेतून बाहेर येण्याआधीच ‘भीम आर्मी’ला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे मायावतींसह बसप नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

सहारणपूरमधील जातीय हिंसाचारानंतर ‘भीम आर्मी’ राष्ट्रीय पातळीवर प्रकाशझोतात आली. दोन वर्षांपूर्वी तरुण वकील चंद्रशेखर यांनी स्थापन केलेल्या दलित तरुणांच्या ‘भीम आर्मी’ने उत्तरेतील सात राज्यांत हातपाय पसरले आहेत. ‘भीम आर्मी’ने हाती घेतलेल्या सामाजिक उपक्रमांपासून सुरुवात केली. दोन वर्षांपूर्वी सहारणपूरच्या भदो गावात शाळा स्थापन करून दलित मुलांना नि:शुल्क शिक्षण देण्याचा उपक्रम संघटनेने हाती घेतला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक राजपूतांनी रोखल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर ‘भीम आर्मी’ चर्चेत आली. या संघटनेला बसपचा प्रभाव असलेल्या उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात चांगला पाठिंबा मिळाल्याने बसपची अडचण झाली आहे. सहारणपूरप्रकरणी ‘भीम आर्मी’ने गेल्या रविवारी दिल्लीत केलेल्या मोठय़ा आंदोलनाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या आंदोलनाद्वारे संघटनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

बहुजन समाजाच्या एकमात्र प्रभावशाली नेत्या म्हणून मायावती यांनी देशापुढे स्वत:ला सादर केले आहे. देशातील कोणत्याही जातीय अत्याचार किंवा हिंसाचाराचा मायावती यांनी नेहमीच प्रकर्षांने निषेध केला आहे. मात्र, सहारणपूरच्या हिंसाचारग्रस्त शब्बीरपूरला मंगळवारी स्वत: भेट देऊन त्यांनी पीडितांची विचारपूस केली, हे राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जात आहे. सहारणपूरमध्ये बसप कार्यकर्त्यांचे जाळे अधिक घट्ट करून ‘भीम आर्मी’ला टक्कर देण्याचा त्यांचा प्रयत्न असावा, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.