बिहारमधील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ‘इसिस’च्या नावाने धमकी देणारे पत्र आल्यामुळे खळबळ माजली आहे. गृहनिर्माण योजनेच्या प्रतीक्षा यादीला त्वरेने मंजुरी द्यावी आणि लेखा विभागातील नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

त्यामुळे हे स्थानिक व्यक्तींचे कारस्थान असल्याचा संशय बळावला आहे. खबरदारी म्हणून अधिकाऱ्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

मुंगेरचे आयुक्त लिऑन कुंगा यांना गुरुवारी धमकीचे हे पत्र पाठविण्यात आले असून, इसिसने संघटनेसाठी ५० लाख रुपयांची मागणीही केली आहे. या पत्रावर पाठविणाऱ्याचे नाव आणि ते कोठून पाठविण्यात आले आहे त्याचा उल्लेख नसला तरी ते पत्र टपालाद्वारे प्राप्त झाले आहे. पत्राची प्रत आयुक्तांच्या निवासस्थानावरही लावण्यात आल्याचे आढळले आहे, असे पोलीस उपमहानिरीक्षक एस. पी. शुक्ला यांनी सांगितले. या प्रकारानंतर पोलीस महासंचालक, जिल्हा दंडाधिकारी अमरेंद्रकुमार सिंग आणि पोलीस अधीक्षक वरुण सिन्हा या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी कुंगा यांच्यासमवेत एक बैठक घेऊन चर्चा केली. इसिससाठी ५० लाख रुपये, इंदिरा आवास योजनेच्या प्रतीक्षा यादीला त्वरेने मंजुरी आणि लेखा विभागात त्वरेने भरती करण्यात यावी, अशा मागण्या पत्राद्वारे करण्यात आल्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या बैठकीत या पत्रावर सविस्तर चर्चा करण्यात आली. हे स्थानिक व्यक्तींचे कारस्थान असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. कुंगा यांच्या निवासस्थानाच्या फाटकावर सदर पत्राची प्रत लावण्यात आल्याचे पहारेकऱ्याला सकाळी आढळले आणि त्याने आयुक्तांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. गेल्या जवळपास ३० वर्षांपासून आपण बिहारमध्ये काम करीत आहोत आणि नागरिकांच्या कल्याणासाठी सदैव काम करीत आहोत, असे कुंगा म्हणाले.