भाजप पुढील ५-१० नव्हे तर ५० वर्षांसाठी सत्तेवर आला आहे. हीच भावना कार्यकर्त्यांमध्ये असेल तरच देशात परिवर्तन शक्य आहे, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बोलून दाखवला. तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी भोपाळ येथे आलेले शहा हे पक्षाच्या प्रमुख सदस्यांसह पदाधिकारी, खासदार व आमदारांसमोर बोलत होते. कार्यकर्त्यांना आता आराम करण्याचा अधिकार नाही. देशात जर सकारात्मक बदल पाहायचे असतील तर न थकता, न थांबता ठरवलेल्या दिशेने पुढे जावे लागेल, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले, आपण सत्तेत ५-१० वर्षांसाठी आलेलो नाहीत. पुढील किमान ५० वर्षे आपले आहेत. हेच ध्येय व विश्वासासह आपल्याला पुढे जायचे आहे. येत्या ४० ते ५० वर्षांत सत्तेच्या माध्यमातून देशात व्यापक परिवर्तन करायचे आहे. आज आपल्याकडे केंद्रात पूर्ण बहुमतातील सरकार आहे. ३३० खासदार आणि १३८७ आमदार आहेत. आज पक्ष सर्वोच्च स्थानी आहे. परंतु, २०१४ मधील आपला विजय सर्वोच्च नव्हता हे एक चांगला कार्यकर्ता आजही मानतो. यापेक्षाही चांगली कामगिरी करण्यासाठी आपल्याला पुढे मार्गक्रमण करायचे आहे.

कार्यकर्त्यांना आवाहन करताना ते म्हणाले, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आणि कामरूप ते कच्छपर्यंत असे एकही बुथ नसेल जिथे भाजप नाही. देशाने आपल्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे आपल्यावरही नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आहे.

या वेळी संघटन मंत्री रामलाल, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, थावरचंद गेहलोत, प्रभात झा, कैलास विजयवर्गीय आदी नेते उपस्थित होते.

बैठकीतील कोणतीही माहिती बाहेर गेली नाही पाहिजे, अशी तंबीच शहा यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिली होती. मोबाइलचा वापर करण्यासही त्यांनी मनाई केली होती.