जनतेला खोटी आश्वासने देऊन भाजप सत्तेत आल्याचा आरोप करत काँग्रेस सचिव दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवली. गुजरातच्या विकासाचे मॉडेल नक्की काय आहे? हे कोणाला नक्की माहितच नसल्याचे म्हणत त्यांनी गुजरात मॉडेलची खिल्ली उडवली. नरेंद्र मोदी खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. मोदी गुजरातचे १२ वर्षे मुख्यमंत्री होते परंतु, त्या काळात राज्यात उलट गरीबी आणि कुपोषणाचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप सिंह यांनी केला.
आपली यशस्वी कामगिरी आणि लोकाभिमुख कामे जनतेपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचविण्यात अपयशी ठरल्यामुळे ‘यूपीए’ सरकारला पराभवाला समोरे जावे लागल्याची कबुली यावेळी दिग्विजय यांनी दिली. यूपीए सरकारच्या काळात विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण उद्दीष्टे साध्य केली गेली परंतु, आम्ही केलेल्या कामांचा कधीही गाजावाजा केला नाही. असेही ते म्हणाले.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही सिंह यांनी मोदी सरकारवर तोंडसुख घेतले. ते म्हणाले की, भ्रष्टाचामुक्त भारत करण्याच्या घोषणा ते करतात पण, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तीन वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आलेले बाबूभाई बोकारिआ अजूनही मंत्रीपदी विराजमान आहेत. त्यामुळे मोदी हे केवळ भाषणबाजी आणि खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करण्यात तरबेज आहेत असेही ते म्हणाले. गेल्या साठ वर्षांत काँग्रेसने काय केले? असा सवाल उपस्थित करणारे मोदी सध्या विविध प्रकल्पांचे उदघाटन करण्यात व्यस्त आहेत. मग, हे प्रकल्प त्यांनी सत्तेत आल्याच्या साठ दिवसांत पूर्ण केले की काय? असा प्रतिसवाल करत सिंह यांनी काँग्रेसच्याच कामांची उदघाटने नरेंद्र मोदी करत असल्याचा दावा त्यांनी केला.