भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी विकास आणि गतिमान प्रशासनाची स्वप्नपेरणी केली असताना आणि ‘कुछ गलती हुई हो तो हम शीष नमाकर माफी माँगते है’, अशी साखरपेरणी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केलेली असतानाही भाजपने सोमवारी जारी केलेल्या जाहीरनाम्यात राममंदिर, कलम ३७० आणि समान नागरी कायदा हेच जुने मुद्दे उगाळले आहेत. या जाहीरनाम्यावर सर्वच राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठविली असली तरी संघ परिवाराने आनंद व्यक्त केला आहे.
भाजपने आपला ४२ पानी जाहीरनामा ज्येष्ठ नेत्यांचा उपस्थितीत पक्ष मुख्यालयात प्रकाशित केला. यात सुशासनाबरोबरच पक्षाच्या दृष्टीने कळीच्या अशा हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर भर देण्यात आला आहे. घटनेच्या चौकटीत राममंदिराच्या उभारणीसाठी प्रयत्न केले जातील, समान नागरी कायदा आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० याबाबत सर्व घटकांशी चर्चा केली जाईल, असे या जाहीरनाम्यात ठळकपणे मांडण्यात आले आहे. काश्मिरी पंडितांना त्यांची जमीन आणि त्यांची प्रतिष्ठा परत मिळवून देण्याचे अभिवचनही जाहीरनाम्यात आहे.
जाहीरनामा मसुदा समितीचे प्रमुख व भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा संकल्पही सोडला. पक्षाने थेट परकीय गुंतवणुकीलाही पाठिंबा दर्शविला असला तरी किरकोळ विक्री क्षेत्रात तिला मनाई करण्याची घोषणा केली आहे. देशात निर्यातीभिमुख उत्पादकता वाढविली जाईल, करपद्धतीत सुसूत्रता आणली जाईल, कृषी क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणूक वाढविली जाईल, असे पक्षाने जाहीरनाम्यात म्हटले आहे.

अल्पसंख्याकांना संधी
देशाच्या प्रगतीची फळे सर्वच समाजघटकांना समानपणे चाखता येतील, अशी हमी भाजपने दिली आहे. शिक्षण आणि नोकऱ्यांत अल्पसंख्यकांना समान संधी मिळेल, अल्पसंख्याकांबाबत कोणताही दुजाभाव ठेवला जाणार नाही, अशी हमीही जाहीरनाम्यात आहे. राष्ट्रीय मदरसा आधुनिकीकरण योजना आणि वक्फ मंडळांचे सबलीकरण यांचीही हमी तसेच आंतरधर्मीय सल्लामसलत यंत्रणा स्थापण्याची कल्पनाही जाहीरनाम्यात आहे.

जाहीर  नामा
* थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता मात्र किरकोळ विक्रीत मनाई.
* १०० आधुनिक नवी शहरे उभारणार
* सार्वजनिक ठिकाणी तसेच व्यापारी केंद्रांमध्ये वाय फाय सुविधा उपलब्ध
* पायाभूत सुविधांवर भर देऊन रोजगारनिर्मिती वाढवणार
* करप्रणालीत सुसूत्रता आणणार
* काळ्या पैशाचा वापर रोखणे, त्यासाठी कृतिदलाची स्थापना
* काळा बाजार रोखण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करणार
* वस्तुंच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी निधी
* गृहनिर्माण क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या संधी निर्माण करणे
* रोजगार क्षमता असलेल्या उत्पादन क्षेत्र, पर्यटन तसेच कृषी उद्योगांवर भर करप्रणालीत सुसूत्रता, ई गव्हर्नसवर भर
* छोटय़ा राज्यांद्वारे विक्रेंदीकरण वाढवणे

भारतीय जनता पक्षाचा  ‘लोकसभा निवडणूक २०१४’ साठीचा जाहीरनामा वाचण्यासाठी खालील छायाचित्रावर क्लिक करा: