मानवता हाच खरा धर्म अशी शिकवण शाळेत दिली जाते. मात्र शालेय शिक्षण पूर्ण होताच मनाच्या फळ्यावरील ही शिकवण हळूहळू पुसली जाते आणि अनेकदा प्रत्येक घटनेकडे पाहताना धर्माचा, जातीचा चष्मा डोळ्यासमोर येतो. राजकीय पक्ष तर स्वत:च्या स्वार्थासाठी समाजातील दोन घटकांमध्ये संघर्ष निर्माण करतात, अशी उदाहरणे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार विपीन कुमार डेविड यांनी त्यांच्या एका कृतीतून माणसुकी हा सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचे दाखवून दिले आहे.

उत्तर प्रदेशाच्या एटा मतदारसंघाचे आमदार विपीन कुमार यांनी एका अपघातग्रस्त मुस्लिम कुटुंबाच्या मदतीसाठी सर्व बैठका रद्द केल्या. अपघातग्रस्त कुटुंबाच्या मदतीला कोणीच येत नसल्याचे पाहून विपीन कुमार जखमींच्या मदतीसाठी धावून गेले. आग्रा-लखनऊ द्रुतगती महामार्गावर हा संपूर्ण प्रकार घडला. अपघातानंतर एक मुस्लिम कुटुंब मदतीसाठी याचना करत होते. मात्र कोणीही त्यांच्या मदतीसाठी पुढे आले नाही. यावेळी विपीन कुमार कामासाठी गाडीतून जात होते. प्रवासादरम्यान रस्त्याच्या कडेला गर्दी जमल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी गाडी थांबवून तातडीने अपघातग्रस्तांची मदत केली. पुढील सर्व बैठका रद्द करुन कुमार जवळपास तीन तास जखमींसाठी थांबले. जखमींवर वेळेत उपचार व्हावेत, यासाठी त्यांनी केजीएयू रुग्णालयाशी संपर्क साधला. यानंतर रुग्णवाहिकेला एस्कॉर्ट करत त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखवण्याची जबाबदारीदेखील पार पाडली.

उन्नव जिल्ह्यातील हसनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अलियारपूर पिलखाना गावाजवळ सोमवारी ही घटना घडली. एका गाडीतून एकाच कुटुंबातील पाचजण कनौज जिल्ह्यातून बाराबांकीला देवा शरीफच्या यात्रेला जात होते. यावेळी गाडी दुभाजकाला आदळून उलटल्याने अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य चारजण जखमी झाले. ‘अपघातानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. मात्र गर्दीतील कोणीही जखमींच्या मदतीसाठी पुढे आले नाही. ही बाब अतिशय धक्कादायक होती,’ असे आमदार विपीन कुमार यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्रासोबत बोलताना सांगितले.