सैन्यामध्ये निकृष्ट जेवण मिळत असल्याची तक्रार करणारा जवान तेज बहाद्दूर यादव यांचा आणखी एक खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनाच इशारा दिला आहे. “जर, निकृष्ट जेवणप्रकरणी आरोपींवर कारवाई केली नाहीतर मला आता हत्यार उचलण्याशिवाय पर्य़ाय राहिलेला नाही” असे त्यांनी म्हटले आहे. हा व्हिडीओ, २५ जुलै रोजी ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला कॉंग्रेस नेते संजय निरुपमसहित अनेक लोकांनी रिट्विट केले आहे.


दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरात ‘कारगील विजय दिवस’ साजरा केला जात आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छाही दिल्या आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

तेजबहाद्दुर यांनी या व्हिडीओत म्हटले आहे की, “मझा खूपच नाईलाज झाल्यामुळे आपल्यासमोर येणे भाग पडले आहे. आपण सर्वजण जाणता की, मी सर्व भ्रष्टाचाराचा भांडाफोड केला होता. सरकार आणि स्वत: पंतप्रधानांनी हा व्हिडिओ पाहिला होता, तसेच गृहमंत्रालयाने याच्या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, या लोकांनी कसल्याही प्रकारची चौकशी अद्याप केलेली नाही. हे सर्व जण गद्दार आहेत. मी या गद्दारांना इशारा देतो की, “एका महिन्याच्या कालावधीत म्हणजे २५ ऑगस्टपर्यंत जर याप्रकरणी करवाई झाली नाहीतर तेज बहदुर विद्रोह करेन”.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही इशारा देताना तेज बहादूरने म्हटले आहे की, मोदीजी आपल्याजवळ ५६ इंचाची छाती असली तरी मी ५७ इंच छाती असणारा तेज बहादूर आपल्याला आव्हान देतो की, जर एक महिन्यांत याप्रकरणी कुठलीही चौकशी तसेच योग्य कारवाई झाली नाही तर मी हत्यार उचलायलाही तयार आहे. असे झालेच तर याची पूर्ण जबाबदारी सरकारची असेल.

तेज बहादूरने पुढे म्हणाले की, मला सध्या खूपच अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला प्रत्येक वकिल माझ्या बाजूने केस लढण्यासाठी तयार होते. मात्र, आता ते कुठे आहेत. तसेच मी, त्या प्रत्येक सैनिकाला आवाहन करतो ज्याच्यासोबत अन्याय झाला आहे, त्यांनी देखील २५ ऑगस्टला माझ्यासोबत सामिल व्हावे असेही त्यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.