संतप्त समर्थकांनी बस पेटविली

बसपचे नेते राजेश यादव यांची मंगळवारी अलाहाबाद विद्यापीठ वसतिगृहाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हा प्रकार घडताच यादव यांचे समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी एका बसला आग लावली, असे पोलिसांनी सांगितले.

राजेश यादव आपला मित्र मुकुल सिंह यांच्यासमवेत मंगळवारी सकाळी एका व्यक्तीला भेटण्यासाठी अलाहाबाद विद्यापीठाच्या ताराचंद वसतिगृहात गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. उत्तर प्रदेशांत गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत राजेश यादव यांनी ग्यानपूर मतदारसंघातून बसपच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती.

राजेश यादव यांचे मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमाराला एका व्यक्तीशी वसतिगृहाबाहेर कडाक्याचे भांडण झाले आणि त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, यादव यांच्या पोटात गोळी मारण्यात आली, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनीच जयस्वाल यांनी सांगितले. यादव यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते, मात्र उपचारादरम्यानच ते मरण पावले. त्यानंतर त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. यादव यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीनंतर एफआयआर नोंदविण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच यादव यांच्या समर्थकांनी एक बस पेटविली.