कर्नाटकात २६ जानेवारीला आंदोलन

तामिळनाडूत बैलांच्या खेळाबाबत जलिकट्टूचा वाद शमला नसतानाच आता कर्नाटकात म्हशींच्या कंबाला शर्यतींसाठी परवानगी मिळावी यासाठी मोठे आंदोलन मंगळुरू येथे आयोजित केले जाणार आहे. म्हशींच्या शर्यतींना परवानगीच्या मागणीसाठी हे आंदोलन पुढील आठवडय़ात होणार आहे. कंबाला समितीचे अध्यक्ष अशोक राय यांनी सांगितले की, आम्ही पुढील आठवडय़ात निदर्शने करणार असून त्यात राजकीय नेत्यांसह ५० हजार लोक उपस्थित राहतील. कंबाला हा पारंपरिक खेळ असून किनारी भागातील जिल्ह्य़ात दलदलीच्या शेतात तो खेळला जातो. जलीकट्टूला परवानगी दिली असून त्याचा आदर्श ठेवत आम्ही मंगळुरूत आंदोलन करणार आहोत त्यात ५० हजार लोक येतील. चित्रपट उद्योगातील लोकही त्याला पाठिंबा देणार आहेत. २६ जानेवारीला हे आंदोलन करण्याचा आमचा विचार आहे असे राय यांनी सांगितले.

गेल्या वर्षी मंगळुरूत याच मागणीसाठी झालेल्या आंदोलनात ७५ हजार लोक  सहभागी झाले होते. निदर्शनांच्या वेळी दोनशे म्हशीही आणल्या जाणार आहेत. तीन ते चार तास निदर्शने करून विभागीय आयुक्तांना निवेदन दिले जाईल असे राय यांनी सांगितले.

कंबाला शर्यतींवर बंदी घालणारा अंतरिम आदेश गेल्या वर्षी पेटाच्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयाने जारी केला होता. त्यावर आता पुढील सुनावणी ३० जानेवारीला होणार आहे. बंगळुरू येथे उपआयुक्त कार्यालयावर २४ जानेवारीला कंबाला शर्यतींना परवानगी देण्याच्या मागणीसाठी तुलुनाद रक्षणा वेदिके ही संघटना आंदोलन करणार आहे.