बुरहान वाणीच्या वारसदाराला टिपण्यात सुरक्षा दलांना यश; २४ तासांत दहा दहशतवाद्यांचा नि:पात

बुरहान वाणी याचा साथीदार, त्याच्यानंतर काश्मीर खोऱ्यात हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेची धुरा सांभाळणारा कमांडर सबझार अहमद भट याला ठार मारण्यात सुरक्षा दलांना शनिवारी यश आले. पुलवामा जिल्ह्य़ातील त्राल भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सबझार व त्याचा साथीदार असे दोघेही ठार झाले. काश्मीरमध्ये मोठय़ा प्रमाणात हिंसक कारवाया होत असताना सुरक्षा दलांची ही कामगिरी लक्षणीय आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत विविध भागांत लष्कराकडून दहा दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले.

त्राल भागातील सोईमोह येथे हिजबुलचे काही अतिरेकी दडून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलांना शनिवारी सकाळी मिळाली. त्यानुसार सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली. सोईमोह येथील एका घरातच हे अतिरेकी लपल्याचे समजताच सुरक्षा दलांनी या घराला वेढा घातला. लपलेल्या दहशतवाद्यांत हिजबुलचा कमांडर सबझार अहमद असल्याचे स्पष्ट होताच सुरक्षा दलांनी मोठय़ा प्रमाणात घराला वेढा घालत सबझारला शरण येण्याचे आदेश दिले. मात्र, सबझार व त्याच्या साथीदाराने सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. तुफान चकमकीनंतर सबझार व त्याच्या साथीदाराला ठार मारण्यात सुरक्षा दलांना यश आले. गेल्या वर्षी जुलैमध्ये लष्कराच्या कारवाईत हिजबुलचा कमांडर बुरहान वाणी ठार झाला होता. बुरहानच्या मृत्यूनंतर हिजबुलच्या काश्मीर खोऱ्यातील कारवाया मोठय़ा प्रमाणात वाढल्या होत्या. या सर्व कारवायांचे नेतृत्व बुरहाननंतर सबझार याच्याकडेच आले होते.

फुटीरतावादी नेत्यांचे बंदचे आवाहन

सबझारच्या मृत्यूनंतर निदर्शने करणाऱ्यांविरुद्ध ‘बळाचा वापर करण्यात आल्याच्या’ निषेर्धात काश्मीर खोऱ्यातील फुटीरतावादी नेत्यांनी दोन दिवसांच्या बंदची घोषणा केली आहे. नि:शस्त्र असलेल्या नागरिकांविरुद्ध बळाचा वापर करण्यात आल्याने त्यांच्यापैकी शेकडो लोक जखमी झाले आहेत. आम्ही याचा निषेध करत असून रविवार व सोमवारी बंद पाळण्याचे आवाहन करत आहोत, असे हुर्रियत कॉन्फरन्सच्या दोन्ही गटांचे नेतृत्व करणारे सय्यद अली शाह गिलानी आणि मिरवाईझ उमर फारुक, तसेच जेकेएलएफचा प्रमुख यासिन मलिक या फुटीरतावादी नेत्यांनी एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

खोऱ्यात संताप

सबझार अहमद चकमकीत ठार झाल्याचे वृत्त काश्मीर खोऱ्यात वाऱ्यासारखे पसरले. सबझारच्या मृत्यूमुळे काश्मिरींमध्ये संतापाची लाट उसळली. अनेक ठिकाणी लोकांनी रस्त्यावर उतरून सुरक्षा दलांच्या वाहनांवर दगडफेक केली. तसेच काही ठिकाणी वाहनांची नासधूसही केली. हिंसाचार आणखी पसरू नये यासाठी जम्मू-काश्मीर सरकारने तातडीने इंटरनेट व मोबाइल सेवा बंद केल्या. अनेक ठिकाणी शाळाही बंद ठेवण्यात आल्या.

दहा दहशतवादी ठार

दरम्यान, शुक्रवारपासून सुरू केलेल्या मोहिमेत आतापर्यंत दहा दहशतवाद्यांना ठार मारण्यात आल्याचे लष्करी सूत्रांकडून सांगण्यात आले. नियंत्रण रेषेनजीक रामपूर भागात सुरू असलेल्या घुसखोरीविरोधी मोहिमेत सहा घुसखोरांना अडवून ठार करण्यात आले, तर अन्यत्र चार जणांना टिपण्यात आले.